श्लेष अलंकार - लक्षण ४
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां प्रकृत व अप्रकृत अशा उभय अर्थांना विषय करून होणारा श्लेष असा :---
“अत्यंत मानी, बाणींनी ज्याचीं गात्रें विदीर्ण झालीं आहेत, अर्जुनाची गांठ पडतांच जो मृयुशय्येवर पडला; व जो कृष्णाच्या येण्याची सारखी वाट पाहत होता, तो महात्मा भीष्म माघ महिन्याप्रमाणें वाटला.” (वरील श्लोकांत भीष्माला माघाची उपमा दिली असून श्लोकांतील सर्व विशेषणें माघ महिन्यालाही लागू पडतात तीं अशीं :---)
अत्यंत थंडीमुळें ज्यांत लोकांची अंगें फाटून जातात; जो फाल्गुन महिना जवळ आला असतां समाप्त होतो; व ज्यांत अग्नीची लोकांना अत्यंत आवश्यकता भासते. अशा माघ महिन्याप्रमाणें, महात्मा भीष्म भासला.’
ह्या श्लोकांत प्रकृत भीष्म व अप्रकृत माघ महिना यांचीं वाचकपदें म्ह० विशेष्यवाचकपदें श्लिष्ट नसल्यानें, पण ह्या दोघांची विशेषणे श्लिष्ट असल्यानें हा श्लोषाचा तिसरा प्रकार होतो. परंतु हा प्रकार उपमेशीं मिश्रित असतो. ‘माघो महात्माजनि हन्त भीष्प:’ (भयंकर माघ महिना हा महत्मा भीष्म झाला.) असा, अप्रकृताच्या पूर्वीच्या श्लोकांतील माघ हें जें अप्रकृत त्याचा, भाग, (म्ह० भीष्म हा भाग) श्लेषयुक्त करुन (कारण भीष्म या शब्दाचा दुसर अर्थ भयंकर असाही आहे) या श्लेकांत रूपक केलें तरी, आतां प्रक्रुत झालेलें विशेष्य जें माघ पद, तें अश्लिष्ट राहिल्यानें येथें श्लेष शाबूत (अखंड) राहिला. (म्ह० शब्दशक्तिमूलध्वनीनें त्याचें उच्चाटन होऊ शकलें नाहीं) ह्या ठिकाणीं, समासोक्ति आहे अशी भ्रांति करून घेऊ नये, कारण येथें (श्लोकांतील) अप्रकृत धर्मी भीष्म हाही शब्दानें सांगितला आहे. जेथें केवळ अप्रकृत व्यवहारच शब्दांची अनेकार्थप्रतिपादक शक्ति सहन करतो (म्ह० एकच शब्दानें अनेक अर्थ सांगितले जाणें, हा प्रकार सहन करतो) पण अप्रकृत धर्मी वाच्य होतच नाहीं, त्या ठिकाणीं समासोक्ति मानणें इष्ट आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP