[आतांपर्यंत क्रिया साधारणधर्म असल्यानें होणार्या सहोक्तीचीं उदाहरणे दिलीं. आतां गुण, साधारणधर्म असल्याने होणार्या सहोक्तीचें उदाहरण हें :---
“बालपणाबरोबर चालण्याची गतिही संथ (होत चालली); मनाबरोबर खालचा ओठही रक्त झाला [रक्त :--- (१) प्रेमयुक्त हा मनाकडे अर्थ ९२) लाल हा ओठाकडे] तसेंच त्या सुंदरीचा (हरिणाच्या पाडसाच्या डोळ्यासारखे डोळे असणारणीचा) नितंब मदनासह सर्वात जास्त गुरु झाला [गुरु :--- (१) जड, वजनदार असा शरीराचा भाग (२) गुरु म्ह० विलास शिकविणारा गुरु - मदनाकडे]”
ह्या ठिकाणीं ‘आप्’ ही क्रियासुद्धां मान्थर्य ह्या गुणाप्रमाणेंच साधारणधर्म झाली आहे तरी, ती क्रिया वाक्यार्थाकरितां अत्यंत आवश्यक (नान्तरीयक - अविनाभावी - अवश्यंभावी) असल्यानें ती साधरणधर्म होण्यांत कांहींच मजा नाहीं; तेव्हा येथें शेवटीं गुणालाच साधारणधर्म होण्याचा सगळा भार सहन करावा लागत आहे. रक्तत्व शब्दाचे दोन अर्थ - शोणत्व व आसक्तत्व (लालपणा व प्रेमळपणा). ह्या जोडींत व गुरुत्वाचे दोन अर्थ अधिक भार, वजन वाढणें व उपदेश करणें - या जोडींत, अर्थाच्या द्दष्टींने निराळेपणा असला तरीं, हे, उपमान (मन व मदन) व उपमेय (ओठ व नितंब) या दोहोंत असलेले गुण, श्लेषाच्या योगानें एक मानून (शोणत्व व आसक्तत्व हा एकच धर्म; व जडपणा व उपदेशक होणें हा एकच धर्म मानून) सहभाव (मनांसह ओठ; नितंबासह मदन अससा सहभाव) जुळवितां येतो. याचप्रमाणें श्लेष नसतांनाहीं, केवळ अभेदाध्यवसानानेंही सहभाव जुळवितां येतो असें समजावें.
ज्या ठिकाणीं एकच उपमेय निरनिराळ्या सहभावांचा (म्ह० सहार्थयुक्त तृतीयान्त उपमानांच्या सहभावांचा) विषय (आश्रय) होतें, त्या ठिकाणीं साद्दश्याची माळ ओत असल्यानें, मालसहोक्ति म्हणावी. आतां या मालासहोक्तींत व पूर्वींच्या साध्या सहोक्तींत अंतर हेंच कीं, साध्या सहोक्तींतल्या उपमानांतील व उपमेयांतील साधारणधर्म एकच असतो; तर मालासहोक्तींत उपमेय एक असूनही प्रत्येक उपमानाबरोबर उपमेयाचा साधारणधर्म निरनिराळा असतो. पण ‘केशैर्वधूनाम्०’ ह्या साध्या सहोक्तीच्या उदाहरणांत केशासह, कोशासह, प्राणासह अशा निरनिराळ्या उपमानांमुळें सहभाव जरी निरनिराळा (अनेक प्रकारचा) होत असला तरी, कर्षण ह्या एकच साधारधर्मामुळें सहोक्ति एकच झाली आहे. (कुणी म्हणेल, उपमानें अनेक असल्यामुळें सहोक्तींतही भेद होणारच. यावर सिद्धांत्याचें उत्तर :--- समजा, कसेंतरी करुन अनेक उपमानांमुळें भेद दाखविला तरी कांहीं फारसा फरक होत नाहीं; कारण (केशैर्वधूनाम्० यांत) कर्षण हा धर्म एकच आहे; आणि मालासहोक्तींत धर्म व उपमान यांच्या निरनिराळेंपणामुळें, फरक होतो, असा (साध्या सहोक्तींत व मालासहोक्तींत) आम्हाला भेद सांगायचा आहे. ‘उन्मीलन्तो निमीलन्त:’ यांत धर्म निराळें असले तरी प्रत्येक धर्माचीं उपमानें निराळीं नाहींत. कारण, उन्मीलन ह्या धर्मानें उभरलेल्या सहोक्तींतलीं जीं उपमानें पाकळ्या, डोळे वगैरे, तींच निमीलन या धर्मानें उभारलेल्या सहोक्तींत उपमानें आहेत. तेव्हा (उपमानें भिन्न नसल्यानें) ही मालासहोक्ति आहे असें म्हणतां येणार नाहीं. आतां ‘भाग्येन सह रिपूणाम्०’ हें मात्र मालासहोक्तींचें उदाहरण खरें. (कारण ह्यांतौपमानेंही निराळीं व धर्मही निराळे आहेत).
अथवा मालासहोक्तीचें हें दुसरें उदाहरण :---
“इन्द्राच्या मदासह जोरानें मुळासकट उपटून काढलेला, बलवान लोकांच्या कौतुकासह उचालेला, व निळ्या छत्रीच्या रत्नजडित दांडीच्या कांतीसह गिरिधारी कृष्णानें हातावर धरलेला गोवर्धन पर्वत तुम्हांला पावन करो.
येथें निळ्या छत्रीच्या रत्नजडित दांडीची कांति गोवर्धन उचलून धरल्यानंतर हातांत आली. (म्ह० गोवर्धन उचलल्यावर दांडीसारखा हात दिसूं लागला. असें असतां ती कांति गोवर्धन उचलतांनाच आली असें श्लोकांत म्हटल्यानें) उत्तरार्धांतील सहोक्ति, कार्यकारणाच्या क्रमाची उलटापालट ही जी अतिशयोक्ति तिच्यावर आधारलेली आहे; व ती, (हातानें रुचि धारण केली ह्या) निदर्शनेवरही आधारलेली एक व पौर्वापर्यविअपर्ययावर उभारलेली एक, अशा दोन प्रकारांनीं होतात.
येथें रसगंगाधरांतील सहोक्ति प्रकरण समाप्त झालें.