या सहोक्तीच्या बाबतींत विचार करतां असें वाटतें कीं :--- केशैर्वधूनां इत्यादि श्लोकांत कार्यकारणभावाची उलटापालट हें जिचें स्वरूप आहे अशा अतिशयोक्तीवर सहोक्ति अलंकार आधारलेला आहे, असें म्हणणें योग्य नाहीं; कारण या सारख्या श्लोकांत अतिशयोक्तीच चमत्कारला कारण होत असल्यानें सहोक्ति नांवाचीच आहे. “तव कोपोऽरिनाशश्च जायते युगपन्नृप” (हे राजा ! तुझा क्रोध व शत्रूंचा नाशा दोन्ही एकाच वेळीं होतात.) या अतिशयोक्ति अलंकाराहून, ‘तव कोपोऽरिनाशेन सहैव नृप जायतें !’ (तुझा क्रोध शत्रूंच्या नाशासह उत्पन्न होतो) या सहोक्तीचा गौणप्रधानभावाचे बाबतींत फरक होत असला तरी दोन्ही अलंकारांतला चमत्कार मात्र निराळा नाहीं; आणि (खरें म्हणजे) चमत्काराच्या निराळेपणावरच अलंकाराचें निराळेपण अवलंबून आहे (चमत्कार निराळा असला तरच अलंकार निराळा मनावा). यावर, कुणाला “असें :--- (म्ह० चमत्काराच्या निराळेपणावर अलंकाराचा निराळेपणा अवलंबून आहे असें) मानल्यास उपमा व रुपक या दोहोंतही साद्दश्यचा चमत्कार एकच असल्यामुळें हे दोन्ही अलंकार एक होऊ लागतील,” असेंही म्हणतां येणारा नाहीं; कारण ‘हा वाक्यांत पूर्वार्धांतील उपमेच्या चमत्काराहून उत्तरार्धांतील रूपकाचा चमत्कार, स्पष्टपणें निराळा अनुभवाला येतो. (अर्थात् या या दोहोंत साद्दश्यामुळें एकच चमत्कार होतो हें म्हणणें योग्य नाहीं.) या दोन्हीही (म्ह० उपमा व रूपक या) अलंकारांच्या चमत्कारांत निराळेपणा असूनही त्यांना एक म्हटलें तर, (अन्यथा) निराळेपणावर आधारलेला व्यतिरेक उभाच राहूं शकणार नाहीं. शिवाय साद्दश्यावर आधारलेल्या रुपक वगैरे अलंकारांत, साद्दश्य हें गौण असल्यानें, चमत्काराच्या विश्रांतीचीं स्थानें जीं रूपकादित्त्वें त्याहून साद्दश्य निरालें आहे, असा व्यवहार जसा होत नाहीं, तसा सहभावामुळें (म्ह० अमक्या बरोबर अमुक अशा सहभावामुळें) प्रकट झालेल्या अतिशयोक्तीहून सहोक्ति निराळी न मानणेंच योग्य आहे (रूपक वगैरेंहून साद्दश्य निराळें न मानणें जसें योग्य तसें). कुणी म्हणतील, ‘असें मानलें तर सहोक्तीला विषयच राहणार नाहीं, आणि शिवाय (कार्यकारणविपर्ययरूप) अतिशयोक्तीनें अनुप्राणित (तिच्यावर आधारलेल्या) सहोक्तीचे बाबतीत तुम्ही जर :--- ही सहोक्ति नसून अतिशयोक्तीच आहे असें म्हणत असाल तर सहोक्तीचे दुसरे प्रकारही, अभेदाध्यवसानरूप अतिशयोक्तीवर आधारलेले आहेत (तेव्हां त्या प्रकारांतही सहोक्ति नसून अतिशयोक्ति आहे असें म्हणावें लागेल.)’ यावर उत्तर असें :--- असें नाहीं, अभेदाध्यवसानमूल सहोक्तींत अभेदाध्यवसानानें सहोक्तीला मदत केली जाते; (तिच्यावर उपकार केला जातो); त्यामुळें (गौणानें प्रधानाचा तिरस्कार (दूर लोटणें) होत नाहीं. (म्हणजे सहोक्तीच प्रधान असल्यानें अलंकार होणार). शिवाय प्रधानानें गौणाचा तिरस्कार होतो असा सर्वसंमत मार्ग आम्ही पूर्वींच सांगितला असल्यामुळें, सहोक्तीला (कार्यकारणविपर्ययरूप अतिशयोक्ति सोडून) इतर ठिकाणीं जरूर वाव आहे. आतां प्रधान कोण व गौण कोण ? (सहोक्ति कां अतिशयोक्ति) या बाबतींत (निर्णय करतांना) आग्रह न राखतां सूक्ष्मद्दष्टीनें (वाचकांनीं) गुणप्रधानभाव ध्यानांत घ्यावा, दुसरी गोष्ट अशी कीं, परस्परांचें अभेदाध्यवसान हा कांहीं अलंकार नव्हे; हा एक केवळ अतिशयच (म्ह० अतिशयोक्तीचें बोलणें) आहे; कारण, असा अतिशय (म्ह० अभेदाध्यवसानरूपी अतिसय) श्लेष वगैरे अलंकारांतही असतो; पण अतिशयोक्ति अलंकार म्हणजे उपमानानें उपमेयाचें निगरण करणें. (तेव्हां अशा द्दष्टीनें पाहतां) ‘वर्षन्ति, उन्मीलन्तो, निमीलन्त:’ इत्यादि ठिकाणीं, एकानें दुसर्याचें निगरण केलें नसल्यानें, तेथें अतिशयोक्ति अलंकाराचा लेशसुद्धां नाहीं. आतां अतिशाय (म्ह. अतिशयोक्तीचें बोलणें) बहुतेक साधारण धर्माच्या अंशांत आढळत असून, तो अनेक अलंकारांना उपस्कारक असतो. (उदा०) ‘शोभते चन्द्रवन्मुखम् ।’ या वाक्यांत चंद्राची शोभा व मुखाची शोभा वस्तुत: निराळी असल्यानें, या दोन शोभांचें अभेदाध्यवसान केल्यावांचून (त्या दोन शोभांना एक मानून त्यांचा एक साधारण धर्म बनविल्यावाचून) उपमा खुलून दिसणारच नाहीं. म्हणून ‘कार्यकारणाच्या क्रमांच्या उलटापालटीवर आधारलेला असा, सहोक्तीचा एक प्रकार आहे’ हे सर्वस्वकारांचें म्हणणें केवळ आग्रहीपणाचेंच आहे. परतुं अभेदाध्यवसानमूलक प्रकार हा मात्र सहोक्तीचाच विषय जरूर माना.
(येथून पुढें पूर्वपक्षाचें म्हणणे :---) “आतां दीपक व तुल्ययोगिता या दोहोंत उपमान व उपमेय यांचें (म्ह० उपमानोपमेयभावाचें) प्राधान्य असून त्या दोहोंचा क्रिया गुण इत्यादि एकधर्माशीं संबंध असतो; पण सहोक्तींत दोन पदार्थांचा क्रियादिरूप एका धर्माशीं अन्वय (पमानोपमेयभावामुळें न होतां) गुणप्रधानभावामुळें होतो.” असा या दोहोंत, (म्ह० दीपक. तुल्ययोगिता हा एक गट व सहोक्ति हा दुसरा गट या दोहोंत) स्पष्ट फरक दिसत असला तरी या फरकांमुळें, या दोन्ही गटांतल्या चमत्कारांत कांहींच फरक पडत नाहीं, (म्ह० दोन्हीही गटांत एकच चमत्कार आहे). तेव्हां सहोक्तीला (म्ह० सहोक्तीच्या पौर्वापर्यविपर्ययातिशयोक्तिमूलक ह्या प्रकाराला) निराळी मानण्याचें कांहीं कारण नाहीं, तिला दीपक व तुल्ययोगिता या अलंकारांचा एक पोटभेद माना. असें जर कुणी म्हणतील, आणि प्राचीनांच्या तोंडाचीही भीड राखणार नाहींत तर, सहोक्तीच्या बाकी राहिलेल्या दोन प्रकारांनाही दीपक व तुल्ययोगिता अलंकारांत द्या की ढकलून (त्यांत एवढा संकोच कशाला ?). एवढा तेवढा फरक असला कीं अलंकारांत फरक होतो असें मानलें तर बोलण्याच्या परी असंख्य असल्यानें अलंकारही असंख्य मानण्याची वेळ येईल.” (येथें पूर्व पक्ष संपला. आतां त्याला जगन्नाथ उत्तर देतात) हें तुमचें म्हणणें खरें आहे; पण गुणप्रधानभावानें युक्त असा सहभाव असल्यास त्याच्या इतर अलंकाराहून निराळ्या प्रकारचा चमत्कार होतो, असें स्वानुभवानें सांगणारे प्राचीनच सहोक्ति हा निराळा अलंकार आहे, असे मानण्याचे बाबतींत प्रमाण आहेत. त्यांनाही प्रमाण मानायचेम नसेल तर अशारीतीच्य (म्ह० आम्ही वर दाखविलेल्या) अडचणीमुळें सगळाच घोंटाळा होईल. “आम्हीं लटकेंच डोळे मिटून बसणार्या प्राचीनांना प्रमाण मानणार नाहीं. तेव्हां ह्या बिचार्या सहोक्तीला द्या ढकलून दुसर्या एखाद्या अलंकाराच्या पोटांत.” असें तुम्ही (पूर्वपक्षी) म्हणाल तर ती निव्वळ दंडेली होईल; तो कांहीं रसिकपणा नव्हें.