सहोक्ति अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
(सहोक्तीचें तिसरें उदाहरण :---)
“शत्रुसहमूहाचा नि:पात करण्याच्या चातुर्याची जी परिसीम (उत्कर्ष) तिच्यायोगानें उग्र असा तूं जेव्हां रागावतोस तेव्हां पर्वतावरील अरण्यांत शत्रुस्त्रियांचे डोळे दिवसासह वर्षण करतात. [मूळ वर्षन्ति हें क्रियावाचक पद श्लिष्ट आहे. तेव्हां त्याचे दोन अर्थ हें :--- (१) अश्रूंची वृष्टि करतात (डोळ्याकडे अर्थ)] (२) वर्षासारखे लांबलचक म्ह० कंटाळवाणे वाटतात (दिवसाकडे अर्थ)].
येथें वृष्टि करणें व वर्षाप्रमाणें वाटणें ह्या दोन क्रियांचा श्लेषानें, अभेदाध्यवसाय केला आहे.
अथवा (श्लेषमूलक अभेदाध्यवसायरूप अतिशयोत्कीच्या अनुप्राणनाचें हें दुसरें उदाहरण) :---
“हे राजा, तुझ्या कृतीची आम्ही फारशी तारीफ करणार नाहीं; कारण तूं विपत्तीबरोबर संपत्तीचेंही दान करतोस, (म्ह० (१) खंडन ब (२) देणें :--- हे दीयन्ते ह्या क्रियापदाचे श्लेषानें दोन अर्थ येथें होतात, ते अनुक्रमें विपत्ति व संपति ह्यांच्याकडे अन्वित करावें.”
पहिल्या उदाहरणांत (त्वयि कुपिते० या) दिवस व लोचन हे दोन कर्ते बरोबर येत असल्याचें सांगितलें आहे; पण या (‘बहुमन्यामहे०’ या) उदाहरणांत विपत्ति व संपत्ति हीं दोन (दीयन्तेया क्रियापदाचीं) कर्मे एकमेकांबरोबर आल्याचें सांगितलें आहे :--- शिवाय येथील सहोक्ति व्याजस्तुति अलंकारानें मिश्रित आहे. (आताम केवळ अभेदाध्यवसानरूप अतिशयोक्तीनें अनुप्राणित अशा सहोक्तीचें हे उदाहरण :---)
“कमळांच्या पांकळ्या, लोकांचे डोळे व त्रैलोक्याची शोभा यांच्यासह विकास पावणारें व संकोच पावणारे, सूर्याचे किरण उत्कर्ष पावतात.”
येथें वास्तविक विकास व संकोच या दोन क्रिया कमळें, डोळे वगैरे आपापल्या आश्रयाच्या भेदामुळें जरी निरनिराळ्या होत असल्या तरी, त्या सर्व ठिकाणच्या विकास व संकोच या निरनिराळ्या क्रियांना, प्रकटत्व (प्रकट होणें) व अप्रकटत्व ह्या (अनुक्रमें) दोन धर्मांनीं युक्त मानून, त्या सर्वांच्या क्रिया एकच विशिष्ट स्वरूपाच्या येथें मानल्या आहेत; म्हणून ह्या श्लोकांत विकास ह्या क्रियेशीं सर्व कर्त्यांचा (किरणें, पाकळ्या, डोळे वगैरेंचा) संबंध आहे. (व संकोच क्रियेचेंही असेंच.) म्हणून अशा रीतीनें विकास व संकोच या क्रियांचा अनुक्रमें प्रकटन व अप्रकटन असा एकच अर्थ असल्यामुळें येथें श्लेष नाहीं. एकाच पदाचे निरनिराळें अर्थ (श्लेषानें) दाखविले असतील व त्या अर्थांचे अवच्छेदक (धर्म) प्रत्येकीं निरनिराळे असतील तरच त्या ठिकाणीं श्लेष होतो, असें मानतात. (येथें प्रकटत्व हा अवच्छेदक धर्म, प्रत्येक ‘विकास’ क्रियेचा एकच असल्यानें, श्लेष होत नाहीं.)
वरील सर्व उदाहरणांत ‘सह’ या अर्थाबरोबर येणार्या तृतीयान्त पदार्थाचा गौणभाव व त्या सहार्थाचा संबंध असणार्या दुसर्या प्रथमान्त पदार्थाचा प्रधानभाव (सहयुक्तेऽप्रधाने या सूत्रानें होणार्या) तृतीयेमुलें सुचित झाला आहे. पण ज्या ठिकाणीं सहार्थक पदानें संबद्ध असलेल्या दोन पदार्थांचा क्रियेशीं प्रधानभावानें (म्ह० दोन्हीही सारखेच प्रधान असा) संबंध येतो, तेथें, जसा येथें जुळेल तसा, तुल्ययोगिता अथवा दीपक अलंकार होतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP