सहादिक शब्दांचा प्रयोग नसला तरी (केवळ तृतीया विभक्तीच्या अर्थानें सहार्थाचें काम भागत असल्यानें) सहोक्ति संभवते. कारण ‘वृद्धो यूना’ या पाणिनीच्या प्रयोगावरून तृतीया विभक्तीचें सहार्थ दाखविण्याचें सामर्थ्य संपूर्ण आहे (असें सिद्ध होतें). फरक एवढाच कीं, जेथें सह अथवा तत्समनार्थक शब्दांचा प्रयोग असेल त्या ठिकाणीं सहोक्ति वाच्य, पण सहार्थक शब्दावांचूकनची सहोक्ति गम्य. इवादि शब्दावांचूनची उत्प्रेक्षा (वगैरे) जशी गम्या होते तशी ही सहोक्ति पण गम्या होते. पण त्या सहोक्तींतील तृतीयाविभक्त्यंत शब्दार्थाचा अप्रधानभाव भाव मात्र (सहार्थवाचक शब्द नसला तरी नुसत्या तृतीयाविभक्तीमुळेंही) शाब्दच असतो (वाच्यच असतो.)
यावर शंका अशी :--- “सहार्थक शब्दप्रयोग नसतांनाही (सहार्थाबरोबर येणार्या तृतीयाविभक्त्यंत पदार्थाचा) अप्रधानभाव शाब्द कसा ? (म्ह० शाब्द अप्रधानभाव शक्य नाहीं.) कारण तो अप्रधानभाव, कां तर आर्थ असेल; कारण क्रियापदांतील क्रियेशीं अन्वित असणें ह्य रूपानें तो असेल तर तो गौण व म्हणूनच आर्थ असणार; अथवा तो अन्वयाहून निराळा असा अप्रधानभाव नांवाचा एक निराळाच पदार्थ असेल. अप्रधानभावाला या दोहोंपैकीं कांहींही मानलें तरी (उभयाथाऽपि) त्या अप्रधानभावाला सांगणारा एखादा शब्द वाक्यांत नसल्यामुळें अशा अप्रधानभावाला अशाब्द म्ह० आर्थच म्हटलेम पाहिजे.”
या शंकेवर उत्तर असें :--- असें नाहीं. प्रथम (हें ध्यानांत ठेवलें पाहिजे कीं) प्रधानत्व या नांवाचा एक सखंड उपाधिरूप अथवा अखंड उपाधिरूप असा पदार्थ आहे; या प्रधानत्व उपाधीमुळेंच, ‘या शहरांत हा प्रधान आहे, मुख्य आहे.’ वगैरे व्यवहार थेट खालच्या दर्जाच्या लोकापर्यंत चालत आलेला आहे. आतां अप्रधानत्व म्ह० त्या प्रधानत्वाचा अभाव; तेव्हां या अप्रधानत्व या अर्थीं, ‘सहयुक्तेऽप्रधानें (पा. २।३।१९) या व्याकरणशास्त्रानें (म्ह० व्याकरणाच्या नियमानें) तृतीया विभक्तीची शक्ति सांगितली असल्यामुळें (तृतीयाविभक्तीनें अप्रधानत्व हा अर्थ सांगितला जातो, म्हणून) व तृतीया विभक्त्यांत शब्द तर वाक्यांत हजर आहे तेव्हां, अप्रधानभाव हा आर्थ असतो असें कसें म्हणतां ? (यावर शंकाकार म्हणतील,) “वरील पाणिनीच्या ‘सहयुक्तेऽप्रधानें ।’ (तृतीया) - या सूत्राचा खरा अर्थ हा अहे :--- सहार्थानें युक्त म्ह० सहार्थाशीं अन्वय असणारा पदार्थ, खरोखरीचाच अप्रधान (म्ह० लोकांत कमी किंमतीचा म्ह० गौण म्हणून प्रसिध) असेल तरच त्याला तृतीया विभक्ति लागते. तुम्ही म्ह० सिद्धांत्यानें केलेला ‘अप्रधानभाव (म्ह० वाक्यांतील पदार्थांच्या द्दष्टीनें - गौणस्थान असणें) हा अर्थ, वाच्य म्ह० सांगायचा असल्यास, तृतीया विभक्ति होते -’ हा या सूत्राचा खरा अर्थ नाहीं; तेव्हां या आमच्या (म्ह० शंकाकाराच्या) अर्थाप्रमाणें पाहतां, तुम्ही (म्ह० सिद्धान्ती) म्हणतां तो (म्ह० अप्रधानत्वाची वाचक तृतीया हा) अर्थ सिद्ध होत नाहीं.” पण हें शंकाकाराचें म्हणणें बरोबर नाहीं. कारण तुमचा अर्थ (म्ह० वस्तुत: जो अप्रधान दर्जाचा असेल त्याची तृतीया हा) मान्य केलात तर, सूत्रांतील अप्रधान शब्द व्यर्थ होऊ लागले; शिवाय ‘पुत्रेण सहागत: पिता’ इत्यादि वाक्यांत, पिता हा अंतरंगत्वामुळें, (म्ह० वस्तुगत्या प्रधान अथवा) स्वतंत्र असल्यामुळें, त्याचा प्रथमा विभक्तींत प्रयोग (प्रथमोत्पत्ते:) होणें हें योग्यच होतें; (म्हणजे सूत्रांत ‘अप्रधाने’ हा शब्दा नसता तरी, त्याची प्रथमा विभक्ति झालीस असती; म्हणून शंकाकारानें केलेला या सूत्राचा अर्थ मान्य केला तर, अप्रधाने हें पद व्यर्थ होऊं लागेल.) (आता यावर ज शंकाकार म्हणतईल कीं, ‘पुत्रेण सह पितुरागमनम्’ ह्या वाक्यांत ‘दर्जानें गौण असेल त्याची तृतीय’ असा आम्ही केलेल्या सूत्रार्थानुसार अर्थ केला नाहीं तर, पितु:च्या ऐवजीं पित्रा असा प्रयोग करण्याची पाळी येईल. यावर सिद्धांती उत्तर देतात :---) ‘पुत्रेण सह पितुरागमनं’ ह्या वाक्यांत सहार्थयोगानें होणार्या उपपदविभक्तीची प्राप्ति होते असें मानलें तरी, तृतीया या उपपदविभक्तीऐवजीं येथें षष्ठी ही कारक विभक्ति झाली आहे, कारण उपपदविभक्तीपेक्षां कारकविभक्तीचें प्राबल्य असतें. (असा व्याकरणशास्त्राचा नियम आहे;) तेव्हां शंकाकारानें केलेल्या सूत्राच्या अर्थामुळें, पितु: अशी षष्ठी विभक्ति झाली आहे, असें मुळींच नाहीं, म्ह० पित्याचा दर्जा पुत्रापेक्षा मोठा आहे म्हणूच पित्याची षष्ठी झाली आहे असें मुळींच नाहीं, तर वाक्यांत पिता हा शब्द प्रधान आहे म्हणून त्याची षष्ठी झाली आहे,