सहोक्ति अलंकार - लक्षण ४

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


(शंकाकाराच्या मतें सूत्रांतील अप्रधान हें पद व्यर्थ नाहीं, ते तात्पर्यग्राहक आहे. यावर सिद्धांती म्हणतो :--- अप्रधानपद व्यर्थ नसून तात्पर्यप्राहक आहे, असें मानलें व आमचा अर्थ मान्य न केला तर) ‘षष्ठी शेषे’ (पा. २।३।६०) या सूत्रांतही (कारण नसतां) विशेषणस्य हें पद प्रथम घालून, मागाहून ‘हें पद तात्पर्यग्राहक आहे’ असें म्हणण्याची पाळी येईल. (तेव्हां शंकाकारानें स्वत: जो सूत्राचा अर्थ केला आहे त्यामुलें अप्रधान हें पद व्यर्थ होईल, असें मुकाटयानें कबूल करावें हेंच बरें.)” (अशारीतीनें शंकाकारानें अथवा पूर्वपक्षानें केलेला सूत्राचा अर्थ चुकीचा ठरवून, आतां सिद्धांती स्वत: केलेल्या सूत्रार्थाचें समर्थन करतात :---)
म्हणून ‘हेतौ ।’ (‘पा० २।३।२३)  (तृतीया) या सूत्राचा ज्याप्रमाणें, ‘हेतु हा तृतीया विभक्तीचा वाच्य अर्थ’ हा अर्थ (सर्वसंमत आहे,) त्याप्रमाणें, ‘सहयुक्तेऽप्रधाने’ या सूत्राचाही अर्थ, ‘सहार्थाशीं संबद्ध अशा नामाची तृतीया विभक्ती करावी व त्या तृतीयेचा वाच्यार्थ पप्रधान’, असा करावा. आतां ‘हेतौ’ या सूत्राप्रमाणें होणार्‍या वाक्याचा (उदा० :--- अध्ययनेन वसति या वाक्याचा) शाब्दबोध ज्याप्रमाणें ‘प्रकृत्यर्थाशीं’ (उदा ० :--- अध्ययनार्थाशीं) अभिन्न जो हेतु (त्यामुळें होणारी वासरूपी क्रिया) असा केला जातो, त्याप्रमाणें प्रस्तुत तृतीया विभक्तीच्या बाबतींत ही शाब्दबोध होणें शक्य आहे.
[षष्ठी शेषे’ (पा. २।३।५०), (कारक हा अर्थ सोडून बाकीच्या अर्थीं षष्ठी होते) या सूत्रानें राज्ञ; पुरुष; या ठिकाणीं स्वस्वामिभावसंबंध ह्या षष्ठीचा कारकेतर संबंधाची प्रतीति होत असतां, त्यांतील विशेषणाची - राजा या पदाची - षष्ठी होते, म्हणजें विशेष्याहून षष्ठी न होतां विशेषणाहून होते, हें सिद्धच आहे. तरी पण शंकाकारानें ‘सहयुक्तेऽप्रधाने’ या सूत्रांतील अप्रधान हे पद तात्पर्यग्राहक मानलें तर ‘षष्ठी शेषे’ या सूत्रात विशेषणस्य हें पद घालून त्या पदाला तात्पर्यग्राहक मानावयाची वेळ येईल. तेव्हां (सारांश हा कीं) ज्याप्रमाणें ‘हेतो’ (तृतीया) हा व्याकरणसास्त्राचा नियम, तृतीयेचा अर्थ (म्ह० तृतीयेची शक्ति) हेतु या अर्थावर आहे असें सांगतो; त्याप्रमाणें येथेंही तृतीया विभक्तीची शक्ति अप्रधान या अर्थावर आहे (असें मानावें); व ज्याप्रमाणें ‘हेतौ’ या सूत्रानें होणार्‍या तृतीयेच्या उदाहरणांत (दण्डेन घट; इ० वाक्यांत) प्रकृतीच्या (म्ह० दण्ड या पदाच्या) अर्थाचा तृतीया विभक्तीच्या अर्थाशीं (म्ह० हेतु या अर्थाशीं) अभेदानें अन्वय होतो, (व दण्डाभिन्नहेतुको घट: असा ‘दण्डेन घट:’ या वाक्याचा शाब्दबोध होतो,) त्याप्रमाणें, प्रस्तुत ‘पुत्रेण सह आगत: पिता’ या वाक्यांतही पुत्र या प्रकृत्यर्थाचा तृतीयेच्य अप्रधान या अर्थाशीं अभेदानें अन्वय होतो. (उदा० :--- ‘पुत्रेण सह आगत: पिता’ या वाक्याचा, ‘पुत्राभिन्नाप्रधानसहित: भूतकालिकगमनानुकूलव्यापाराश्रय: पिता असा शाब्दबोध होतो).] आतां (कुणी म्हणतील,) या सूत्रांतील अप्रधान ह्या शब्दानें अप्रधानत्व या धर्मावर तृतीयेची शक्ति कशी मानतां येईल ? ती शक्ति तर येथें धर्मीवर (म्ह० अप्रधान या धर्मीवर) आहे, धर्मावर नाहीं; यावर उत्तर :--- येथें धर्मीवर (या अर्थावर) शक्ति असली तरी ज्याप्रमाणें कर्मणि द्वितीया वगैरे ठिकाणीं द्वितीया विभक्तीची शक्ति कर्म या धर्मीप्रमाणें कर्मत्व या धर्मावरही मानली जाते त्याप्रमाणें, येथें अप्रधानत्व या धर्मावरही तृतीयेची शक्ती मानून अप्रधानत्वाचें शाब्दत्व (वाच्यत्व) मानायला कांहीं हरकत नाहीं. तुम्ही म्हणाल, अप्रधानत्व या धर्माला जर व्याच्य मानतां तर मग ‘षष्ठी शेषे’ यांतील तात्पर्यग्राहक म्हणून आक्षिप्त मानलेल्या विशेषणांतील विशेषणत्वालाही वाच्य मान कीं ! (यावर उत्तर :--- ) ‘षष्ठी शेषे’ या ठिकाणीं विशेषणत्व या अर्थावर षष्ठी विभक्तीची शक्ति मानता येणार नाहीं. (म्ह० षष्ठी विभक्तीनें विशेषणत्व हा अर्थ वाच्य आहे, असें म्हणतां येणार नाहीं, कारण) विशेषण हें तेथें पदच नाहीं. (म्हणून त्यांतील विशेषणत्व या धर्माला वाच्य मानतां येणार नाहीं.) (म्हणून त्यांतील विशेषणत्व या धर्माला वाच्य मानतां येणार नाहीं) उलट येथें अप्रधान हें पद सूत्रांत असल्यानें तें जसें वाच्य होतें तसा त्याचा धर्मही वाच्य होणार, असा या दोहोंत स्पष्ट फरक आहे. वरील सर्व विवेचनावरून, ‘अप्रधानग्रहणं शक्यमकर्तुं’ (सहयुक्तेऽप्रधाने या सूत्रांतील अप्रधान हें पद घेतलें नाहीं तरी चालणें शक्य आहे) ह्या मनोरमाकारांच्या (भट्टोजी दीक्षितांच्या) म्हणण्याचें खंडन झाले. कारण वर आम्ही सांगितलेल्या पद्धतीनें, तें अप्रधान पद सूत्रांत सार्थ आहे, असें सिद्ध करतां येत असल्यानें, पाणिनिमुनीच्या शब्दाला (अप्रधान या शब्दाला) व्यर्थ मानणें ही अन्यायाची गोष्ट आहे. तुम्ही (पूर्वपक्षी) म्हणाल ‘पुत्रेण सह आगत: पिता’ या वाक्याचा ‘पुत्राभिन्नाप्रधानसहित:’ पुत्राहून निराळा नसलेल्या अप्रधान अशा पुत्रासहित) असा शाब्दबोध होतो. याला प्रमाण नसल्यामुळें, तुम्ही (म्ह० सिद्धांत्यानें) सांगितलेल्या अर्थाची सिद्धि (म्ह० सहयुक्तेऽप्रधाने या सूत्रांतील अप्रधान याचा अर्थ वाक्यांतील गौण स्थानीं असलेल्या शब्दाहून तृतीया होते :--- सहार्थाचा संबंध आल्यास, या अर्थाची सिद्धि) होणार नाहीं. पण हें (पूर्वपक्षाचें) म्हणणें बरोबर नाहीं. कारण ‘दण्डेन घट:’ या वाक्याचा ‘दण्डजन्यतावान् घट:’ (म्ह० दण्डाची जन्यता ज्यांत आहे असा घट, म्ह० दण्डामुळें उत्पन्न होणारा घट) असा शाब्दबोध सर्वं लोकांत प्रसिद्ध असला तरी ‘हेतौ’ (तृतीया) या पाणिनि मुनीच्या सूत्राचा आधार (म्ह० मनोरमाकार भट्टोजी दीक्षितांनीं) घेऊन ‘दण्डाभिन्नहेतुको घट: ’ असा शाब्दबोध करता येईल असें म्हणणार्‍या तुम्ही (म्ह मनोरमाकर भट्टोजी दीक्षितांनीं) स्वत:च आमच्या ‘पुत्राभिन्नाप्रधानसहित: पिता’ या शाब्दबोधाचा मर्ग दाखवून ठेवला आहे. (आम्ही या बाबतींत मनोरमाकारांच्याच पावलावर पाऊल टाकून जात आहोंत.) शिवाय, भावप्रधानमाख्यातम्’ (निरुक्त) यासारख्या यास्क मुनींच्या अनेक वचनाशीं तुम्ही केलेल्या शाब्दबोधाच्या विरुद्धपणाची उअपपत्ति तुम्ही लावूं शकत नाहीं. (म्ह० भावप्रधानमाख्यातम् या निरुक्तांतील वाक्याच्या यास्कमुनींनीं केलेल्या अर्थाच्या विरुध अर्थ तुम्ही केला आहे, त्यची तरी संगति तुम्हांला कुठें लावतां येते ? तेव्हां ‘द्ण्डेन घट:’ या वाक्याच्या दण्डजन्यतावान् घटा: या सर्वजनीन शाब्दबोधाच्या विरुद्ध जाऊन, दण्डाभिन्नहेतुको घट: असा शाब्दबोध तुम्ही केला तसा प्रस्तुतस्थलीं आम्ही केला म्हणून बिघडलें कोठें ?) प्रस्तुत नसलेल्या विषयाचा विचार आतां पुरें झाला.
प्रकृत व अप्रकृत हीं (अनुक्रमें) उपमेय व उपमान यांचा निर्णय करणारीं (म्ह० प्रकृत तें उपमेय व अप्रकृत तें उपमान) असतातच असें नाहीं असें आम्हीं पूर्वीं सांगितलें असल्यानें, ह्या सहोक्तींत प्रकृत व अप्रकृत यावरून उपमेय व उपमानाचा निर्णय होणार नाहीं. (हें म्हणणें ओघानेंच आलें); कारण ह्या अलंकारांत सहार्थानें जोडलेले दोन्हीही पदार्थ प्रकृत असण्याचा संभव आहे. (म्ह० दोन प्रकृत पदार्थही ‘सहित’ असणें शक्य आहे) तेव्हां या अलंकारांत उपमेय व उपमान यांची कसोटी प्रधानत्व व अप्रधानत्व ही मानावी (म्ह० सहोक्तींत सहार्थयुक्त तृतीयेचा अर्थ अप्रधान असल्यानें त्याला उपमान मानावें व प्रथमांत शब्द प्रधान असल्यानें त्याला उपमेय मानावें.) ह्या अलंकारांतील रमणीयत्व अतिशयोक्तीमुळें आलेले असतें हें पूर्वीं सांगितलेलेंच आहे. अर्थात्‍ ज्या वाक्यांत अतिशयोक्ति नसेल. अशा ‘पुत्रेण सह आगत: पिता’ इत्यादि वाक्यांत सहोक्ति अलंकार होणारा नाहीं. (हें उघड आहे).

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP