मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक १६१ ते १७०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १६१ ते १७०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा , वेदांनी ज्याची महती गायली आहे , सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो .


नमत्‌ - एकोनपञ्चाशत्‌ - मरुत्‌वर्ग - निरर्गल : ।

पञ्चाशत्‌ - अक्षरक्षेणी पञ्चाशत्‌ - रुद्रविग्रह : ॥१६१॥

९६० ) नमदेकोनपञ्चाशन्मरुद्‌वर्गनिरर्गल--- ( एकोनपञ्चाशत्‌ = ४९ ) ( निरर्गल = अप्रतिहत ) अप्रतिहत ( कोणताही अडथळा नसलेली ) गती असणार्‍या एकोणपन्नास मरुत्‌गणांकडून नमस्कार केला जाणारा . एकोणपन्नास मरुत्‌ संज्ञक देवता पुढीलप्रमाणे - प्राण - अपान - व्यान - उदान - समान - नाग - कृकल - कूर्म - देवदत्त - धनंजय - प्रवह - विवह - शंभू - संवह - परिवह - उद्वह - आवह - शंकू - काल - प्रावह - शास - अनिल - अनल - प्रतिभ - कुमुद - कांत - शिबी - श्वेत - रक्त - कृष्ण - जित - अजित - झंझाद्योत - क्रतू - सिद्ध - पिंग - शुची - सौम्य - काम्य - मारूत - हनू - कंपन - मंडूक - भीम - कपी - संवर्तक - जड - अतिजड - संतत . ( श्रीतत्त्वनिधी )

९६१ ) पञ्चाशदक्षरश्रेणी--- ( पंचाशत्‌ = ५० ) पन्नास अक्षर - मालास्वरूप १६ स्वर आणि क - च - ट - त - प - य - श वर्ग व ळ अशा ५० अक्षरांच्या श्रेणी ( १६ खडय़ा ) स्वरूप .

९६२ ) पञ्चाशद्रुद्रविग्रह---श्रीकण्ठादी पन्नास रुद्र ( शिव ) रूप . ५० रुद्रविग्रहांची नावे पुढीलप्रमाणे - श्रीकण्ठ - अनन्त - सूक्ष्म - त्रिमूर्ती - अमरेश्वर - अधीश - भारभूती - अतिथीश - स्थाणुक - हर - झिण्टीश - भौतिक - सद्योजात - अनुग्रहेश्वर - अक्रूर - महासेन - क्रोधीश - चण्डीश - पञ्चान्तक - शिव - उत्तम - एकरुद्र - कूर्मैकनेत्राह्व - चतुरानन - अजेय - शर्व - सोमेश - लाङ्गलिदारूक - अर्धनारीश्वर - उमाकान्त - आषाढी - दण्डी - स्युरद्री - मीन - मेष - लोहित - शिखी - छगलण्ड - द्वरण्डेश - महाकाल - सवाली - भुजङ्गेश - पिनाकीश - खडगीश - बक - श्वेत - भृगू - ईशा - नकुलिशिव आणि संवर्तक ( शारदातिलक पटल - २ )

पञ्चाशत्‌ - विष्णुशक्ति - ईश : पञ्चाशत्‌ - मातृका - आलय : ।

द्विपञ्चाशत्‌ - वपु :- श्रेणी त्रिषष्टि - अक्षर - संश्रय : ॥१६२॥

९६३ ) पञ्चाशद्विष्णुशक्तीश---केशवादी विष्णुरूपे व कीर्ती आदी शक्ती पन्नास आहेत . त्या सर्वांचा स्वामी . ईश्वर . ५० विष्णुशक्ती पुढीलप्रमाणे - कीर्ती - कान्ती - तुष्टी - पुष्टी - धृती - क्षान्ती - क्रिया - दया - मेधा - सहर्षा - श्रद्धा - लज्जा - लक्ष्मी - सरस्वती - प्रीती - रती - जया - दुर्गा - प्रभा - सत्या - चण्ड - वाणी - विलासिनी - विजया - विरजा - विश्वा - विनदा - सुनदा - स्मृती - ऋद्धी - समृद्धी - शुद्धी - भक्ती - बुद्धी - स्मृती - क्षमा - रमोमा - क्लेदिनी - क्लिन्ना - वसुधा - वसुदापरा - परा - परायणी - सूक्ष्मा - सन्ध्या - प्रज्ञा - प्रभा - निशा - अमोघा - विद्युता ( शारदातिलक ).

९६४ ) पञ्चाशन्‌मातृकालय---५० मातृकावर्णांचे आलय अथवा लयस्थान . नादस्वरूप .

अ , आ , इ , ई , उ , ऊ , ऋ , लृ , ए , ऐ , ओ , औ , अं अ :,

क्‌ , ख , ग्‌ , घ्‌ , ङ , च्‌ , छ्‌ , ज्‌ , झ्‌ , ञ्‌ , ट्‌ , ठ्‌ , ड , ढ‌ , ण्‌ ,

त्‌ , थ्‌ , द्‌ , ध्‌ , न्‌ . प्‌ , फ्‌ , ब्‌ , भ्‌ , म्‌ ,

य्‌ , र्‌ , ल्‌ , व्‌ , श्‌ , ष्‌ , स्‌ , ह्‌ , क्ष्‌ , ज्ञ्‌ , अ ते ज्ञ या ५० वर्णांचे स्थान .

९६५ ) द्विपञ्चाशद्‌वपु : श्रेणी---लिङ्ग पुराणात वर्णन केलेल्या पञ्चपर्व अविद्यारूप पाशांनी ( नाम क्र . ५४५पाहा ) बद्ध केले जाणारे बावन्न शरीरधारीस्वरूपी .

९६६ ) त्रिषष्टयक्षरसंश्रय---अक्षरवर्णांची संख्या त्रेसष्ट अथवा चौसष्ट मानली जाते . यात २१ वर्ण स्वर + २५ स्पर्शवर्ण + ८ यादिवर्ण + ४ यमवर्ण + २ अनुस्वार व विसर्ग , २ पराश्रितवर्ण आणि दुःस्पृष्ट ‘ ल ’ कार असे ६३ वर्ण अधिक प्लुतलकार = ६४ . ( अशा त्रेसष्ट अक्षरांचा आधार .)

चतु : षष्टि - अर्ण - निर्णेता चतु : षष्टि - कलानिधि : ।

चतु : षष्टि - महासिद्ध - योगिनी - वृन्द - वन्दितः ॥१६३॥

९६७ ) चतु : षष्टयर्णनिर्णेता---चौसष्ट वर्णांचा निर्मय करणारा .

९६८ ) चतु : षष्टिकलानिधि---वात्स्यायन कामसूत्रांच्या आधारे ६४ कलांचे वर्गीकरण असे - वाङमयात्मक क्ला - वाचन व पठन - शब्दकोशविद्या व पद्यरचना - गूढकाव्यज्ञान - समस्यापूरी - न पाहिलेल्या वस्तू व अक्षरे ओळखणे - सांकेतिकभाषाज्ञान - अनेकभाषाज्ञान - कूटप्रश्न सोडवणे - तोंडी कूटप्रश्र सोडविणे - नकला करणे - गृह्यकला - शिवणकला - धनुष्यबाण वगैरे करणे - शय्या तयार करणे . पाकशास्त्रकला - विविध भोजनप्रकार - विविधपाकरचना - विविध पेये तयार करणे . स्नानवेषभूषा वगैरे कला - चंदनाची उटी - अलंकार घालणे - सुगंधी द्रव्ये तयार करणे - फुलांचे दागिने - पुष्पमाला बनविणे - दात , वस्त्रे रंगविणे - केशरचना - शिरोवेष्टनप्रकार - वस्त्रांवर कशिदा करणे - हस्तव्यवसायकला - नकाशा काढणे - चित्रकला - विविध दृश्ये दाखविणे - मूर्तिकला - लाकडावरील खोदकाम - रांगोळ्या - पुष्पशय्या तयार करणे - दोर्‍याची कृत्रिम फुले तयार करणे - फुलांच्या गाडया तयार करणे - करमणुकीच्या कला - कारंजे तयार करणे - जादुगिरि - तर्ककर्म - कोंबडे वगैरेंची लढत लावणे - पोपटांना शिकविणे - विविधरीतींनी एकच गोष्ट करणे - हातचलाखी - विविध खेळ - वशीकरणविद्या - विविध वेष धारण करणे - कुचुमाराने शिकवलेली जादू करणे .

शास्त्रीय कला - सोने वगैरेत हिरे बसविणे - गृहशिल्प - सोने वगैरेची परीक्षा - विविध धातूंचे ज्ञान - रत्ने रंगविणे - खाणी कोठे आहेत ते ओळखणे - बागबगीचा - धातूवरील कोरीव काम - मणी , रन्ते वगैरेंना भोके पाडणे .

संगीत कला - गायन - वादन - जलतरंग - शरीर गोंदणे

शारीरिक व्यायाम कला - मुलांचे खेळ - विविध व्यायामांचे ज्ञान - नृत्य आणि युद्धकलांचे ज्ञान .

नाटयकला - अभिनय

शिष्टाचार कला - विविध शिष्टाचारांचे ज्ञान .

( थोडयाफार फरकाने शिवतत्त्वरत्नाकर , भारत शूद्रकमलाकर ग्रंथात ही ६४ कलांचा नामनिर्देश आढळतो .)

९६९ ) चतु : षष्टिमहासिद्धयोगिनीवृन्दवन्दित---महासिद्ध आणि योगिनी समूहांकडून नन्दिला जाणारा . ( वृन्द = समूह , समुदाय ) ६४ मिथुने म्हणजे सशक्तिक देवता . ती मिथुने अशी - ब्राह्मी - नारायणी - माहेश्वरी - चामुण्डा - कौमारी - अपराजिता - वाराही - नारसिंही यांनी होणारी ८ . असिताङ्ग - रुरू इत्यादी भैरवांचे आठा - आठाचे ४ गट ( नाम ९५६ पाहा ) यांनी होणारी ३२ . मङ्गला - पिङ्गला - धन्या - भ्रामरी - भद्रिका - उल्का - सिद्धा - सङ्कटा यांनी होणारी , ८ . अक्षोभ्य - वामदेव - घोर - सदाशिव - पंचवक्त्र यांनी होणारी १० . रमा - शची - रोहिणी - स्वाहा - प्रभा - भद्रकाली यांनी होणारी ६ . अशी सर्व मिळून ६४ योगिनी - गजानना - सिंहमुखी - गृध्रास्या - काकतुंडिका - उष्ट्रग्रीवा - हयग्रीवा - वाराही - शरभानना - उलूकिका - शिवारावा - मयूरी - विकटानना - अष्टवक्त्रा - कोटराक्षी - कुब्जा - विकटलोचना - शुष्कोदरी - ललज्जिह्वा - स्वदृष्टा - वानरानना - रुक्षाक्षी - केकराक्षी - ब्रह्मतुण्डा - सुराप्रिया - कपालहस्ता - रक्ताक्षी - शुकी - सेनी - कपोतिका - पाशहस्ता - दण्डहस्ता - प्रचण्डा - चण्डविक्रमा - शिशुघ्नी - पापहन्त्री - काली - रुधिरा - पापिनी - वसाधया - विद्युत्प्रभा - बलाकास्या - मार्जारी - गर्भभक्षा - शवहस्ता - अन्वमालिका - स्थूलकेशी - बृहत्कुक्षी - सर्पास्या - प्रेतवाहना - दन्दशूककरा - क्रौञ्ची - वसानना - व्यातास्या - धूमनिश्वासा - योमैकचा - रणोर्ध्वदशा - तापनी - शोषणदृष्टी - कोटरी - स्थूलनासिका - कटपूतना - अट्टाट्टहास्या - कामाक्षी - मृगाक्षी , ( भागवत ) यांचा संबंध श्रीचक्रातील दोन वा तीन रेखा ज्या बिन्दूत मिळतात त्या बिंदूंच्या संख्येशी आहे . मध्यस्थ बिंदूच्या ठिकाणी गणेश नादरूपाने स्थित असून हे सर्व त्याला वंदन करतात .

अष्टषष्टिमहातीर्थक्षेत्र - भैरवभावन : ।

चतुर्नवतिमन्त्रात्मा षण्णवति - अधिक - प्रभु : ॥१६४॥

९७० ) अष्टषष्टिमहातीर्थक्षेत्रभैरवभावन---शिवाच्या अडुसष्ट महातीर्थ क्षेत्री असणार्‍या भैरवांना पूज्य असणारा . त्यांच्यात शिवभावना किंवा त्यांना उत्पन्न करणारा . ६४ भैरव - असिताङ्ग - विशालाक्ष - मार्तण्ड - मोदकप्रिय - स्वच्छन्द - विघ्नसंतुष्ट - खेचर - सचराचर - रुरू - क्रोडदंष्ट्र - जटाधर - विश्वरूप - विरूपाक्ष - नानारूपधर - पर ( महाकाय )- वज्रहस्त - चण्ड - प्रलयान्तक - भूमिकम्प - नीलकण्ठ - विष्णू - कुलपालक - मुण्डपालक - कायपाण्डक - क्रोध - पिङ्गलेक्षण - अभ्ररूप - धारापाल - कुटिल - मन्त्रनायक - रुद्र - पितामह - उन्मत्तबटुकनायक - शङ्कर - भूतवेताल - त्रिनेत्र - त्रिपुरान्तक - वरद - पर्वतवास - शुभ्रवर्ण - कापाल - शशिभूषण - हस्तिचर्माम्बरधर - योगीश - ब्रह्मराक्षस - सर्वज्ञ - सर्वदेवेश - सर्वंगतहृदिस्थित - भीषण - भयहर - सर्वज्ञ - कालाग्नी - महारौद्र - दक्षिणमुखर - अस्थिर - संहार - अतिरिक्ताङ्ग - प्रियङ्कर - घोरनाद - विशालाक्ष - योगीश - कालाग्नी - दशसंज्ञित - क्षेत्रभैरव ( स्कन्दपुराण - काशीखण्ड अध्याय )

९७१ ) चतुर्नवतिमन्त्रात्मा---३८ कलामन्त्र + ५० मातृकाकलामन्त्र + हंस , शुचि , प्रतिद्‌विष्णू , विष्णुर्योनी आणि त्र्यंबक आणि तद्‌विष्णो : असे सहा . विष्णुमूलविद्या मन्त्र मिळून चौर्‍याण्णव मूलमन्त्रस्वरूप .

९७२ ) षण्णवत्यधिकप्रभु---तन्त्रराजतन्त्रात श्रीचक्राच्या शहाण्णव देवता सांगितल्या आहेत . त्या देवता गणेशसंयोगाने अधिक होतात म्हणून त्यांचा ईश . शहाण्णवाहून अधिक चक्रदेवता होतात . त्या सर्व देवतांचा अधिपती .

शतानन्द : शतधृति : शतपत्र - आयत - ईक्षण : ।

शत - अनीक : शतमख : शतधारा - वरआयुध : ॥१६५॥

९७३ ) शतानन्द---मानुष आनन्दापेक्षा शतगुणोत्तर वाढत जाणारे ब्रह्मानन्दापर्यंतचे आनन्द तैत्तिरीय उपनिषदात वर्णिलेले आहेत ते असे - मानुषानन्द गन्धर्वानन्द - चिरलोकानन्द - देवानन्द - कर्मदेवानन्द - आजानजानानन्द - इन्द्रानन्द - बृहस्पत्यानन्द - प्रजापत्यानन्द - ब्रह्मानन्द हे सर्व आनंद गणेशस्वरूप आहेत .

९७४ ) शतधृति---अनन्त ( शेकडो ) ब्रह्माण्डांना धारण करणारा .

९७५ ) शतपत्रायतेक्षण---शतपत्र म्हणजे कमळ , आयत म्हणजे मोठे , दीर्घ , ईक्षण म्हणजे डोळे , कमळाप्रमाणे प्रफुल्लित डोळे असणारा .

९७६ ) शतानीक---अनीक म्हणजे सैन्य . पुष्कळ सैन्यबल असणारा .

९७७ ) शतमख---मख म्हणजे यज्ञ , शेकडो यज्ञांचे अनुष्ठान करणारा .

९७८ ) शतधारावरायुध---तीक्ष्ण धार असलेल्या शेकडो वज्रांपेक्षाही उत्तम ( वर ) आयुधे धारण करणारा .

सहस्रपत्रनिलय : सहस्रफणभूषण : ।

सहस्रशीर्षापुरुष : सहस्राक्ष : सह्स्रपात्‌ ॥१६६॥

९७९ ) सहस्रपत्रनिलय---ब्रह्मरन्ध्रगत सहस्रारचक्रात ( सहस्रदल कमळात ) राहणारा .

९८० ) सहस्रफणभूषण---सहस्र फणाधारी नागांनी विभूषित .

९८१ ) सहस्रशीर्षापुरुष---विराट पुरुष . हजारो ( असंख्य ) मस्तके धारण करणारा . परमात्मा .

९८२ ) सहस्राक्ष---सहस्र नेत्र असलेला . असंख्य नेत्र असणारा .

९८३ ) सहस्रपात्‌---सहस्र पाय असलेला .

सहस्रनामसंस्तुत्य : सहस्राक्ष - बल - अपह : ।

दशसाहस्र - फण - भृत - फणिराज - कृतासन : ॥१६७॥

९८४ ) सहस्रनामसंस्तुत्य---सहस्र नामांनी ज्याची स्तुती करावी असा .

९८५ ) सहस्राक्षबलापह--- ( सहस्राक्ष = इन्द्र ) इंद्रसैन्याचा किंवा इंद्रबलाचा फडशा पाडणारा . विध्वंस करणारा .

९८६ ) दशसाहस्रफणभृत्‌फणिराजकृतासन---दहा हजार फणा धारण करणार्‍या नागराज वासुकीचे ज्याने आसन केलेले आहे असा .

अष्टाशीतिसहस्र - आद्यमहर्षि - स्तोत्र - यन्तित : ।

लक्षाधीश - प्रियाधार : लक्ष्याधारमनोमय : ॥१६ ८ ॥

९८७ ) अष्टाशीतिसहस्राद्यमहर्षिस्तोत्रयन्त्रित---अठ्ठयाऐंशी हजार आद्यमहर्षीनी स्तवन केल्यावर वशीभूत झालेला . किंवा अठ्ठयाऐंशी हजार आद्यमहर्षिरचित स्तोत्रांनी वश होणारा .

९८८ ) लक्षाधीशप्रियाधार---धनवंतांचे आवडते अधिष्ठान असलेला किंवा सर्वश्रेष्ठ धनवान्‌ असा जो कुबेर त्याचा आधार असलेला .

९८९ ) लक्ष्याधारमनोमय---लक्ष्यावर एकाग्र चित्त करणारा . लक्ष्यावर चित्त एकाग्र करण्यास आधार असणारा .

चतुर्लक्ष - जपप्रीत : चतुर्लक्ष - प्रकाशित : ।

चतुर्‌ - अशीति - लक्षाणां जीवानां देह्संस्थित : ॥१६९॥

९९० ) चतुर्लक्षजपप्रीत---चार लक्ष मन्त्रजपाने प्रसन्न होणारा .

९९१ ) चतुर्लक्षप्रकाशित--- चार लक्ष श्लोकसंख्या असणार्‍या १८ पुराणांनी ज्याचे वर्णन केले्ले आहे असा . चार लक्ष मन्त्रजपाने प्रकट होणारा .

९९२ ) चतुरशीतिलक्षाणां जीवानां देहसंस्थित---चौर्‍याऐंशी लक्षयोनी जीवांच्या देहांमध्ये विराजमान असणारा .

कोटिसूर्यप्रतीकाश : कोटिचन्द्रांशुनिर्मल : ।

शिवोद्‌भव - अध्युष्टकोटि - अष्टकोटि - विनायक - धुरन्धर ॥१७०॥

९९३ ) कोटिसूर्यप्रतीकाश--- ( प्रतीकाश = सारखा , सदृश ) कोटीसूर्याप्रमाणे तेजस्वी .

९९४ ) कोटिचन्द्रांशुनिर्मल---कोटी चन्द्रकिरणांप्रमाणे निर्मल .

९९५ ) शिवोद‌भवाध्युष्टकोटिविनायकधुरन्धर---शंकर आणि पार्वती यांनी अधिष्ठित अशा कोटयावधी विनायकांचा धुरंधर नेता .


References : N/A
Last Updated : April 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP