गंगारत्नमाला - भाग ८
कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली.
शा०वि०
आकाशापरि तोय त्यांत ढगसे फेनौघ ते चालती ॥
उष्णे अग्नि तशा स-शब्द लहरी विद्युल्लता हालती ॥
नावा त्यात विमान-पंक्ति तळिंची मोती जशा तारका ॥
रामा विष्णु-पदासि याचि धरि तू चित्ती सदा तारका ॥१४०॥
पृथ्वी
नरामर शतावधी पुलिनि बैसुनि ते किती ॥
सुधा-रस-समान त्या अति अ-तृप्त तोया पिती ॥
सु-कांत पुलिनांत ते पसरले दुहो बाजुला ॥
गमे जननि पाजवी पय धरोनि तेथे मुला ॥१४१॥
मृदू सुख-द वालुका लखलखीत शोभे बरी ॥
हिरे चुरुनि वोपिले म्हणुनि स्वच्छ तेजा धरी ॥
सुखे भरित मत्स्य ते वरिवरि उड्या मारिती ॥
सुरा कळविती न ती वरि जळी अम्हा जी रती ॥१४२॥
पृथ्वी
मदांध गज आतुनी करिति जी कराग्रे वरी ॥
करेणु-सह चालता दिसती पंक-जाचे परी ॥
खळाळुनि जलौघ तो करित भोवरे चालला ॥
तयांत फिरती तरी करिति अप्सरांच्या कला ॥१४३॥
हिमाद्रि-भव चालता पवन पत्र-पुष्पे जळी ॥
समर्पण त्रि-वेणीच्या करि म्हणोनि झाला बळी ॥
तटानिकट भू-रुह श्रम-हर स्वये वांकले ॥
जनांसि सुख द्यावया सु-जन संगतीच्या फळे ॥१४४॥
साकी
उभय बाजुने चित्र तरूंची दाट लागली छाया ॥
पांथ-स्थाला सुख-कर मोठी श्रम-हर मार्गी जाया ॥१४५॥
जंबु कंवठ सुरदारु नारळी केळि पोफळि अंबे ॥
फणस पेरु आणि लिंब-तरूंच्या भरले तीर कदंबे ॥१४६॥
सरल कुटज वट-वृक्ष सातवण प्लक्ष दाडिमी चांफा ॥
शाल ताल किति तमाल उंबर घालविती जन-तापा ॥१४७॥
मंदारामल बकुल बिल्व कुट अशोक चंदन जाती ॥
वृक्षि बैसले पक्षि सर्वदा भागिरथी गुण गाती ॥१४८॥
कामदा
दूर जाउनी फारली पुढे ॥
स्वर्ग-वासिनी उत्तरेकडे ॥
उत्तरा मुखी स्नान-दुर्लभा ॥
दर्शने चि दे माय सु-प्रभा ॥१४९॥
शा०वि०
जीच्या पश्चिम-काठि सुं-दर असे वैकुंठ जे भूवरी ॥
की कैलास जयास नाव विलसे वाराणसी यापरी ॥
रामा योग नको तपो-बळ नको यज्ञादि सिद्धी नको ॥
जेथे मुक्ति मृतासि होय सखया वेदांत-विद्या नको ॥१५०॥
उ०जा०
गंगा उदग्वाहिनि ज्या पुरासी ॥
अनंत जन्मार्जित पुण्य-राशी ॥
संपादिलासे पदरात जेणे ॥
ते पाविजे सत्य तरीच तेणे ॥१५१॥
गीति
सर्ग-स्थिति-लय-करा याचे घेता चि नाव भव नाशी ॥
ये काशीत महेश्वर तो चि दिवोदास-भक्त-भवनाशी ॥१५२॥
गीति
तो विश्वेश्वर राहे येउनि भक्तार्थ काशिकेमाजी ॥
त्याच्या वासे पुरवी मनुजाच्या सर्व काशि कामा जी ॥१५३॥
व०ति०
जो काळ-भैरव अशा धरि सत्य नावा ॥
पापासि काळ आणि भैरव दुष्ट-भावा ॥
जे लागती सु-जन येउनि नाथ-पाया ॥
तो त्यावरी करि कृपा-भर पूर्ण छाया ॥१५४॥
भु० प्र०
जिथे अन्न-पूर्णा जगन्माय रामा ॥
जगन्नाथ-राणी करी पूर्ण कामा ॥
वसे काशिका-गेहि जी सर्व-दात्री ॥
धरी द्यावया अन्न हस्तांत पात्री ॥१५५॥
स्वागता
धुंडिराज गण-नायक काशी ॥
मध्यभागी पुर-विघ्न विनाशी ॥
विश्वनाथ जवळी सुख-धामा ॥
दर्शने पुरवि जो जन-कामा ॥१५६॥
शा०वि०
गंगा भारति सूर्य-मनु किरणा बा धूत-पापा तसे ॥
पांची एकवटोनि तीर्थ निपजे तें पंच-गंगा असे ॥
तन्नामे वरि घाट त्यावरि उमा-कांत-प्रिय श्री-पती ॥
बिंद माधव नाव ज्यास पडले मोक्ष-प्र-दा यत्स्मृती ॥१५७॥
लोकेश-स्थिति सर्व-देव-वसती तैशी च भागिरथी ॥
पाहोनी नयनांबु-बिंदुसि त्यजी सानंद लक्ष्मी-पती ॥
झाला यास्तव बिंदु-माधव हरी वि-ख्यात वाराणसी ॥
वासी, धन्य जयासि नित्य नमिती वैकुंठ ते त्या तशी ॥१५८॥
व०ति०
त्याच्या च सन्निध असे मणिकर्णिका हे ॥
ज्या नाव तीर्थ वरि घाट हि रम्य आहे ॥
तीर्थे सदैव वसती अवघी जिथे ते ॥
जो देह त्यांत त्यजि त्या हर-रूप देते ॥१५९॥
भु०प्र०
शिवाचे गणी मुख्य जो दंड-पाणी ॥
हती दंड घेवोनि पापासि खाणी ॥
पुरी-मध्य-भागी उभा दंड-धारी ॥
दिसे, हाक मारोनि पाप्यांसि तारी ॥१६०॥
हे भाषण ऐकून राम म्हणाला-
भु० प्र०
म्हणे राम सांगा कशी काशिकेला ॥
तुम्ही श्री-मुनी-राज सर्वज्ञ गेला ॥
असे ऐकण्याचा अती हेतु माझा ॥
मला काशि-माहात्म्य-पीयूष पाजा ॥१६१॥
त्यावर विश्वामित्र सांगू लागला-
शा०वि०
सांगे कौशिक पूर्व-वृत्त सखया राजा हरिश्चंद्र या ॥
नामे जो तव पूर्व-ज क्षिति-तळी चित्ती जयाचे दया ॥
स्वप्नी अर्पुनि सर्व राज्य मजला जो सत्त्व-शील स्वये ॥
पुत्र-स्त्री-युत दक्षिनेसि सु-कृती देण्यासि काशीस ये ॥१६२॥
त्याचे सत्त्व हरावया बहु तर्हे त्या त्रास केला परी ॥
सत्यापासुनि राय नाहि टळला शांती च चित्ती धरी ॥
जेणे स्त्री-सुत-वि-क्रयासि करुनी डोंबा-घरी वाहिले ॥
पाणी, यापरि सत्त्व अन्य नृ-पतीमाजी न मी पाहिले ॥१६३॥
काशी-वास करोनि मुक्त जहला राजा ऋणापासुनी ॥
माते वास नृपासवे चि घडला आहे जिथे स्वर्धुनी ॥
केले मी तप त्याच मुक्ति-नगरीमध्ये सु-वंशोद्भवा ॥
तू ही जाउनि काशिला नदि-जळी नाहोनि पूजी भवा ॥१६४॥
उ०जा०
एके दिनी मी दिन-कृत्य रामा ॥
विलोकिले जे परि-पूर्ण-कामा ॥
आईक ते तूजसि सांगतो हे ॥
यथा-मती विस्तर फार नोहे ॥१६५॥
उठोनि जेथे सु-कृती प्रभाती ॥
स्नानासि त्या भागिरथीस जाती ॥
स्त्रिया हि घेवोनि कितेक बाळा ॥
गाताति मार्गी हरि-सद्गुणाला ॥१६६॥
कन्या मुळी ती हिम-पर्वताची ॥
तीरासि थंडी म्हणवोनि साची ॥
थंडीमुळे कापति ओठ भारी ॥
शिवाक्षरे ती निघताति सारी ॥१६७॥
कृष्णाजिना दंड-कमंडलूला ॥
काठावरी ठेवुनि भस्म-माळा ॥
मंदाकिनी-वंदन-पूर्व न्हाती ॥
लावोनि देहासि सदैव माती ॥१६८॥
शा०वि०
दुर्गा-घाटि कितेक पंचनदिच्या घाटाप्रती पावती ॥
कोणी श्री-मणिकर्णिकेप्रति किती त्या ब्रह्म-घाटाप्रती ॥
घाटी घाटि वि-चित्र दाटि मिळती वाटा न जाया जना ॥
गंगा-दर्शन सर्व पाप हरुनी आनंद दे तन्मना ॥१६९॥
उ०जा०
देवांत विश्वेश पुरीत काशी ॥
नदीत गंगा भव-मृत्यु नाशी ॥
असोनि ऐसे त्रय एक ठाया ॥
का व्यर्थ हे तापविती स्व-काया ॥१७०॥
कामदा
दक्षिणेकडे काशिचा अशी ॥
उत्तरेकडे वारुणा तशी ॥
देव-सिंधुला मीळती नद्या ॥
पाय पातका सांगती नद्या ॥१७१॥
साकी
पांच कोस त्या अनंत असती तीर्थे गंगेमाजी ॥
ज्यांचे दर्शन घेता हरती दुर्धर पातक-राजी ॥१७२॥
पुढे फिरोनी पूर्व दिशेला स्वर्ग-तरंगिणि चाले ॥
कु-देश असता गंगा-गमने सुदेश अवघे झाले ॥१७३॥
सरयु-गंडकी-नद्यांसि पोटी घेउनि जाता गंगा ॥
मध्ये जन्हु-नृ-प यज्ञ करिता वेगे करि मख-भंगा ॥१७४॥
झाला होता गर्व नदीला नाही वेग धराया ॥
समर्थ कोणी, परी जन्हुने घालविला तो वाया ॥१७५॥
योग-बळे नृप नदीस प्याला तदैव गंगा भ्याली ॥
मुक्त कराया आपणास ती जन्हू-तनया झाली ॥१७६॥
मुखे सोडिली राये तेव्हा जान्हवि-नावा पावे ॥
सगर-जांसि मग पूत कराया प्रेमे गंगा धावे ॥१७७॥
ज्याकरिता बहु-श्रमे भगीरथ घेउनि गंगा आला ॥
पडले असती कपिलाश्रमि ते पूर्व-जल-धि-तीराला ॥१७८॥
कपिल-मुनीच्या नयनाग्नीने भस्म जाहले जेथे ॥
साठ हजार सगर कराया मुक्त पावली तेथे ॥१७९॥
शा०वि०
आली धावत माय जेवि धरि ती तान्ह्या मुला पोटिशी ॥
गंगा भस्म हि जाहल्या सगर-जा पोटात घेई तशी ॥
गेले साठ हजार भस्म असता स्पर्शै जिच्या मुक्तिला ॥
रामा यास्तव नित्य नित्य सखया चित्तांत चिंती तिला ॥१८०॥
भु०प्र०
पुढे धावली स्वामि-भेटीस बा ती ॥
मिठी कंठि घालावय काय जाती ॥
करोनी जगा पूत माहात्म्य ती ते ॥
सहस्त्रानने वर्णि प्रेमे पतीते ॥१८१॥
मालिनी
जल-निधि-नृ-पतीची जान्हवी पट्ट-राणी ॥
पसरुन जणु भेटी घे अ-संख्यात पाणी ॥
जननि-जनक घेता भेटिला हर्ष झाल ॥
सुर-मुनि-गण-सारे टाकिती पुष्प-माला ॥१८२॥
शा०वि०
होता भेट तरंग-पंक्ति मिळती त्या एकमेकीमधे ॥
गंगा-सागर यापरी विधि तया पाहोनि हर्षे वदे ॥
यातायात कशास तीर्थ-गमनी हे मूळ पर्वी मिळे ॥
स्नाना जाति अनंत-कोटि वसती स्वर्गी तयांची कुळे ॥१८३॥
उ०जा०
गंगा-चरित्रांकित-रत्न-माला ॥
करोनि मी अर्पिले सज्जनाला ॥
असे तया हीच विनंति माझी ॥
कंठी धरायासि असोत राजी ॥१८४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 10, 2013
TOP