गंगारत्नमाला - भाग ३
कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली.
उ०जा०
भगीरथे आइकिले स्व-कानी ॥
केले महत्पाप मदे स्वकांनी ॥
पिता परं-धाम-पदास गेला ॥
जाणोनि पुत्रे मग यत्न केला ॥४०॥
देवोनि राज्यासि निजात्मजाते ॥
निघे मुनी वानिति देव ज्याते ॥
गंगा-जळाते पितरांसि द्याया ॥
सु-पुत्र ये काननि राम-राया ॥४१॥
जेथे अ-संख्यात अ-मर्त्य येती ॥
गंधर्व विद्याधर सिद्ध गाती ॥
अ-गम्य जो पातकि-मानवाला ॥
हिमाचळी त्या नर-पाळ आला ॥४२॥
जेथे दिसे उंच पवित्र झाडी ॥
स्व-पल्लवे स्वर्ग-मलासि झाडी ॥
कोंदाटली पक्षि-रवे वने ती ॥
बोलावुनी देव-गतीस नेती ॥४३॥
हिमाचळी जे सुख देव याते ॥
न होय ते नंदनि मंद-वाते ॥
कळेल कोणा महिमा तयाची ॥
रामा, सुता ती गिरि-जा जयाची ॥४४॥
भु०प्र०
करी व्याघ्र शब्दासि एके ठिकाणी ॥
कडेलोट चाले खळाळोनि पाणी ॥
पडे ओघ खाली जळांचा कडाडे ॥
न त्या साहता ती मही ही धडाडे ॥४५॥
कडे तूटले एक ठायासि खाली ॥
मदे मत्त-दंते-कदंबे निघाली ॥
तशा हत्तिंना पाहता शैल-काया ॥
गमे मेघ जाती तळी काय राया ॥४६॥
गुहेमाजि जे नीजले सिंह त्याला ॥
महत्तो-शब्दे गमे शत्रु आला ॥
प्रति स्पर्धितेने स्वये गर्जताती ॥
तया ऐकता श्वापदे दूर जाती ॥४७॥
तपस्वी उभे राहिले एक-पायी ॥
तसे बैसले नेत झाकोनि काही ॥
नसे मांस देही त्वगस्थी च राहे ॥
दिसे एक डोयी जटा-भार वाहे ॥४८॥
किती पर्ण भक्षोनिया राहताती ॥
जितेंद्रीय कोणी सदा ब्रह्म ध्याती ॥
किती वायु-भक्षी किती धूम्र-पानी ॥
किती देह टाकोनि जाती विमानी ॥४९॥
कामदा.
एक ठायि ते वाहती झरे ॥
कूट-तुल्य ही बर्फ पाझरे ॥
तूटले कडे श्वापदा नसे ॥
मार्ग पाहता भीति होतसे ॥५०॥
म्लान दीवसा ज्या वनस्पती ॥
अग्निचे परी रात्रि दीसती ॥
त्या मणि-प्रकाशीत वारुळी ॥
बैसले किती थोर कुंडली ॥५१॥
चंदनाचिये वृक्षि वेष्टना ॥
करुनि डोलवी कुंडली फणा ॥
जो कधी नसे पक्षि पाहिला ॥
नृप विलोकिता स्तब्ध राहिला ॥५२॥
पर्वताचिये शीखरावरी ॥
शरभ बैसुनी ओरडा करी ॥
वनतेय ही त्याच काननी ॥
धरुनिया उडे सर्प आननी ॥५३॥
कामदा.
खालि पाहुनी हस्ति केसरी ॥
वरुनि घे उडी मस्तकावरी ॥
वानरे उड्या वृक्षि मारिती ॥
तनय घेउनी पोटिशी किती ॥५४॥
पायि चालता सर्प थोरले ॥
अजगरादि ते मत्त पाहिले ॥
पाहि जो पुढे व्याघ्र एकला ॥
महिष फाडुनी खात बैसला ॥५५॥
उ०जा०
करी तशा घोर नगी तपाला ॥
भक्षोनिया शुष्क गलीत पाला ॥
जिंकोनि सर्वेंद्रिय-वृत्ति राही ॥
कित्येक संवत्सर पी निरा ही ॥५६॥
शिखरीणी
सहस्त्राब्दे ऐसे भगिरथ करी उग्र तप जे ॥
तया योगे गंगा-ह्रदयि करुणा फार उपजे ॥
धरोनी देहाते सकळ-जनता-पाप-हर ती ॥
उभी राहे भावे नृ-प-निकट रामा प्रहर ती ॥५७॥
जया पाहे त्याते करिल नयने भस्म यतिला ॥
अशा पाहोनी त्या बहुत उपजे वि-स्मय तिला ॥
म्हणे राया पाहे नयन उघडी चिंतिसि जिला ॥
प्रसन्ना मी आहे वद कवण बा कष्ट तुजला ॥५८॥
नृ-पाच्या गंगेचा मधुर श्रवणी शब्द पडला ॥
तृषार्ताच्या जैसा वदनि अमृत-स्त्राव घडला ॥
किती वानू झाला तिजसि बघता हर्ष न मिती ॥
उभी गंगा जेथे विधि-मुख जिला देव नमिती ॥५९॥
सहस्त्रादित्यांची जणु सम रुची एकवटली ॥
जगत्पापांधारा खनन करण्या काय नटली ॥
अशी देखे माता चरणि करि लोटांगण तदा ॥
नृ-प क्षाली प्रेमोद्गत-नयन-तोये मग पदा ॥६०॥
झाला नृ-पासि अति-हर्ष न माय चित्ती ॥
रोमांच-रूप उमटे सकलांग-भित्ती ॥
प्रेमे तदक्षि-युगलांतुनि जाय पाणी ॥
होता स-गद्गद गळा वदवे न वाणी ॥६१॥
पाहोनि माय करिता नमना तयाला ॥
आणी कृतार्थ करणे चि मनात याला ॥
ठेवी भगीरथ-शिरी कर-पंक-जा ती ॥
जेणे सुरेंद्र-पदवीसहि मर्त्य जाती ॥६२॥
N/A
References : N/A
Last Updated : April 10, 2013
TOP