गंगारत्नमाला - भाग ४
कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली.
व०ति०
वंदोनि पाद-कमळी उदयोऽस्तु तीला ॥
ऐसे वदोनि करि विष्णु-पदी-स्तुतीला ॥
माते स-भाग्य मजवांचुनि कोण आहे ॥
जो मस्तकी मि तव पाद-रजांसि वाहे ॥६३॥
ललित
जाणती तुला सुर न दीन मी ॥
जाणुनी असे सुर-नदी नमी ॥
वाटते मला स-फळ आजसे ॥
काक मानसी उतरता जसे ॥६४॥
देवता मुनी नमिति सर्वदा ॥
तुजवाचुनी कवण सर्वदा ॥
ब्रह्मदेव ही तुजसि वानिता ॥
थोर पावला विबुध-मान्य-ता ॥६५॥
गिति
माते सहस्त्र-वदना नाही सामर्घ्य तव गुणा गाया ॥
नागा ही, तुजवाचुनि जाऊ कवणा अभीष्ट मागाया ॥६६॥
तुजवाचुनि मत्पितरां कवणा सामर्थ्य सांग ताराया ॥
रविनेंचि जाय तम जे उगवुनि करितील काय तारा या ॥६७॥
मत्पूर्वज कपिलाच्या शापे गेले मरोनि नरकाला ॥
दैवे करील पर-वश झाल्या प्रतिकूळ काय नर काला ॥६८॥
यास्तव मदर्थ ये तू भूवरि करण्यासि शुद्ध पितरा या ॥
वि-तराया स्वर्गातिला होई सोपान-पद्धति तराया ॥६९॥
शा०वि०
गंगा ऐकुनि भू-प वाक्य वदली राया कसे हे घडे ॥
वेगे कोण धरील सांग मजला जी भूवरी मी पडे ॥
भूमी भेदूनि खालती निज बळे जाईन मी अन्यथा ॥
याचा काय विचार सांग मजला ये भू-पते त्वन्मता ॥७०॥
दिंडी
म्हणे नृ-पती जाईन शं-कराते ॥
भक्ति-योगे मी शरण आजि माते ॥
तूज मुकुटी वाहील शूल-पाणी ॥
भक्त-राज ही जाण सत्य वाणी ॥७१॥
वदोनिया गंगेसि तदा ऐसे ॥
जाउनीया कैलास-नगी बैसे ॥
करी ध्यान चित्तात शं-कराचे ॥
वेद-मंत्रेकरूनि स्तवी वाचे ॥७२॥
पद
ये सज्जन-ह्रदय-कमल-वास शं-करा रे ये ॥ध्रु०॥
दक्षाध्वर-हर हर भव सच्चित्सुख पूर्ण वि-भव ॥
निर्दाळी भय भव-भय ज्ञान सागरा रे ॥१॥ये०॥
जगताचा माय-बाप तूच हरिसि सर्व पाप ॥
निववुनि मच्चित-ताप सुखवि पामरा रे ॥२॥ ये०॥
करिता स्तवनासि राय, प्रगटे शिव स-दय काय ॥
रघुपति-सुत धरुनि पाय; घे म्हणे वरा रे ॥३॥ये०॥७३॥
भु.प्र
उभा राहिला येउनी शूल-पाणी ॥
'वरं' ब्रूहि ऐशी वदे मूळ वाणी ॥
नृपा ऐकता थोर आनंद झाला ॥
जसा मेघ-शब्दे मनी चातकाला ॥७४॥
नृपे देखिला चंद्र-कोटि-प्र-काश ॥
करी जो प्रभू भक्त-हत्ताप-नाश ॥
शिरी चंद्रभाळी शिखी कंठि काळा ॥
चतुर्बाहु शोभे उरी सर्प-माळा ॥७५॥
दिसे कृति-वासा शिव वाम अंगा ॥
तनू-भूषणी लेइलासे भुजंगा ॥
प्रसन्नासि त्या पाहुनी देव-राया ॥
धरी नम्र होवोनि भू-पाळ पाया ॥७६॥
म्हणे राय आणीक ते काय मागू ॥
असे सत्य माझेवरी आनु-रागू ॥
कृपाळू जगन्नायका देव-राजा ॥
म्हणोनीच दृष्टी पडीलासि माझ्या ॥७७॥
परी लागली एक चिंता मनासी ॥
दयाळा तुम्हांवाचुनी कोण नाशी ॥
गती द्यावया पूर्व-जा येत आहे ॥
तया स्वर्नदीचा शिरी भार वाहे ॥७८॥
नृपाची अशी ऐकुनि दीन-वाणी ॥
तथास्तू म्हणे राजया शूल-पाणी ॥
सवे घेउनी तो निघे भूत-संघा ॥
शिरी घ्यावया विष्णु-पादोद-गंगा ॥७९॥
हिमाद्रीवरी शंभु जावाइ आला ॥
श्वशुरासि दावावया वि-क्रमाला ॥
म्हणे हाक मारी नृ-पा स्वर्धुनीते ॥
पहा भार घेतो शिरी आज मी ते ॥८०॥
N/A
References : N/A
Last Updated : April 10, 2013
TOP