गंगारत्नमाला - भाग २
कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली.
शा०वि०
गंगा ही हरि-पाद-पंक-ज-भवा स्वर्गावरी राहिली ॥
तेथे स्वर्ग-नदी म्हणोनि पहिले नावाप्रती पावली ॥
तेथोनी मग शं-करे निज-जटा-जूटांतरी वाहिली ॥
आली भूमिवरी हरी अघ जरी पाप्यांनि ही गाहिली ॥२३॥
शा०वि०
रामा पुण्य हरी-पदांबु-लहरी-बिंदू शरीरा जरी ॥
स्पर्शे तत्क्षणि जो असेल पदरी तत्पाप-वृंदा हरी ॥
घेता नाव जिचे अनंत जनुचे जे पाप देही असे ॥
गंगा त्या सकलासि घालवितसे ती भूवरी ही वसे ॥२४॥
हे ऐकून राम विचारतो-
उ०जा०
भागीरथी का इजला म्हणावे ॥
कशी वदा जान्हवि नाव पावे ॥
आश्चर्य माते बहु होत आहे ॥
दीनार्थ जी भूवरि माय वाहे ॥२५॥
विश्वामित्र सांगतो-
उ०जा
मुनी म्हणे आयिक राम-राया ॥
जो लागला मृत्यु-करा मराया ॥
सकृत जरी घे नर नाम वाचे ॥
तात्काळ नाशी भय ते भवाचे ॥२६॥
शा०वि०
साकेताधि-प-नंदना हरि-पदी गंगा जगन्माउली ॥
ऐके सांगतसे सख्या तुज कशी स्वर्गाप्रती पावली ॥
जीच्या सानुज आयिकोनि सकला हो सच्चरित्रा सुखी ॥
नित्य श्री-कर सर्वदा हि तुझिया तन्नाम राहो मुखी ॥२७॥
प्रल्हादात्म-ज जो विरोचन तया सत्पुत्र झाला बळी ॥
नामे सर्व सुरांसि जिंकुनि करी राज्य त्रि-लोकी बळी ॥
तत्त्त्रासे स्तविला रमेश अमरी जो भक्त-चिंता-मणी ॥
घे तो कश्यप-गेहि जन्म अदिती-पोटी जगाचा धणी ॥२८॥
गीति.
र्हस्वांकृति धरि म्हणुनी, वामन हे नाव ठेविले बाळा ॥
उप-नयन योग्य झाला, तेचि क्षणि देव शिक्षि जो काळा ॥२९॥
मग तो ब्रह्मचारी वामन बळी यज्ञ करित होता तेथे गेला; तेव्हा-
उ०जा०
बळी तया पाहुनि देव-राया ॥
प्रेमे नमी होउनि नम्र पाया ॥
म्हणे मला धन्य तु आजि केले ॥
स्वद्दर्शने कल्मष सर्व गेले ॥३०॥
सिंहासनी बैसवि वामनाला ॥
सं-तोष झाला बळिच्या मनाला ॥
ब्रह्मादिकी यद्यश शुद्ध गावे ॥
पूजी तया दैत्य-पती स्व-भावे ॥३१॥
कामदा.
माग जे तुला पाहिजे असे ॥
राय घे म्हणे सर्व देतसे ॥
ऐकुनी तया बोलिला हरी ॥
सांग कोण त्वत्तुल्य भुवरी ॥३२॥
पूर्वजांचिये नाव राखिले ॥
एक मागतो पाहिजे दिले ॥
मत्पदे धरा तू त्रि-पाद दे ॥
ऐकुनी बळी बोलिला मदे ॥३३॥
कामदा.
गाव आथवा राज्य माग की ॥
काय पाहिजे सांग आणखी ॥
देव बोलिला इतुके पुरे ॥
लोभ केलिया काय ही नुरे ॥३४॥
पृथ्वी.
नको म्हणत आसता 'गुरु धरा तयाला दिली ॥
विरोचन-सुते, तदा वचन-सत्य-ता राखिली ॥
तदैव जगदीश्वरे निज-विराट-रूप-च्छले ॥
अनंत हि पद-द्वये जग समग्र ही व्यापिले ॥३५॥
स्त्रग्धरा
गेला जो ऊर्ध्व-पाद त्रि-भुवन-गुरुचा तन्नखें रंध्र झाले ॥
ब्रह्मांडाच्छादनाला तदुपरि जळ जे शुद्ध ते आत आले ॥
पाद-स्पर्शे प्रभूच्या सकल-जगदघ-ध्वंस-कर्तृत्व त्याते ॥
ये स्वर्गी ब्रह्मदेवाद्यमर-नुत पडे घोर तौयौघ पाते ॥३६॥
गीति.
विष्णु-पद-स्पर्शाने विष्णु-पदी-नाव पावली राया ॥
तेथुनि स्वर्गी राहे गंगा-नामे सुरांसि ताराया ॥३७॥
देव-मुनि स्तविति जिला गाती गंधर्व सर्वदा राया ॥
सुर-सिंधु ती भूवरि आली कलुषौघ सर्व दाराया ॥३८॥
मालिनी
सगर-तनय रामा मत्त होवोनि गेले ॥
कपिल-नयन वन्हीमाजि पोळोनि मेले ॥
शुभ-गति पितरांते द्यावया दीन-बंधु ॥
भगिरथ नृप आणी भूवरी स्वर्ग-सिंधु ॥३९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 10, 2013
TOP