भाग २ - लीळा २६१ ते २७०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा २६१ : स्थानांतर देवताकथन
(रामेश्वरबास) एकुदीसीं गोसावीयांसि उदयाचा पुजावसर जालेया नंतरें काचराळेयाचां मार्गीं बारव वीहीरि होती : तेथ करंजखेडीची देवता आली होती : तेणें मार्गें बीजें करीतां : गोसावी वीहीरी पूर्वे उभे राहीले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ते स्थानीची देवता एथ आली गा : ते एथ असे’ : ॥

लीळा २६२ : माहात्मयां दीवाळी सणु करणें
वीळीचां महादाइसीं गोसावीयांसि वीनवीलें : ‘जी जी : गोसावीयाचां ठाइं दीवाळुं सणु करीन’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आवघेयांसि करा : बाइ : माहात्मेया सहीत करा : तुमतें असे तें तुम्हीं करा : न पुरे तें बाइसां मागा’ : ‘हो जी’ : ॥ मग माहादाइसीं सांजवेळे पाणियाची सामग्री केली : चीकसा : तेल : उमाइसाचिए घरूनि आणिलें : मग थोरे पाहानपटीं गोसावीयांसि उपहुड : गोसावी परिश्रयो सारीला : उदका विनयोगू करूनि : मग आसनीं उपविष्ट जाले : मग गोसावीयांसि बरवें आसन रचिलें : भक्तजनां बैसों घातलें : तथा पाट पासवडिला : भक्तजन गोसावीयां पुढें बैसले : मग महादइसी गोसावीयांसि वोवाळणी केली : भक्तजनांतें वोवाळीलें : गोसावीयांसि वीडा वोळगवीला : मग गोसावीयांसि मर्दना दीधली : उरला चिकसा : तेयांतु आणिकु घालुनि भक्तजनासि दीधला : भक्तजनीं एकेमेकांची आंगे उटिलीं : श्रीमूगुटीं तेल वोळगवीलें : उरलेयां तेलां आंतु आणिक तेल घालुनि भक्तजनांसि दीधलें : एकमेकीं भक्तजनीं माथे राखीले : मग गोसावीयांसि सोंडीयेवरि आसन : उत्तरामुखू : श्रीमूगुटीं भोगी वोळगवीली : पीळा नीगाला : तेयांतु आणिक भोगी घातली : मग भक्तजनासि दीधली : मग एकमेकीं माथां भोगी घातली : गोसावीयांसि मार्जनें जालें : महादाइसें गाडु ढाळिति : बाइसें श्रीमूगुट चोखीति : श्रीमूर्ति प्रक्षाळीति : भक्तजन सोंडीये तळि रीगौनि : गोसावीयांचेनि उद्रकें न्हाति : मार्जनेयाचां अवसानीं श्रीमुगुटावरि गाडु ढाळीतां : गोसावी दोन्ही श्रीकर श्रीमुगुटावरि ठेवीति : दोहीं कोपराचेनि पाणियें भक्तजन न्हाति : ऐसें गोसावीयांसि मादनें जालें : मग आणिके पाणियें भट न्हाणीलें : तेयां केस बहुत असति ह्मणौनि : मग महादाइसीं अक्षेवाणें आणिलें : गोसावीयांतें वोवाळीलें : मग गोसावी वस्त्रें वेढीलीं : महादाइसीं पाट पासवडिला : गोसावी आसनीं उपवीष्ट जाले : चंदनाचा आडा रेखीला : मग गोसावीयांसि वोवाळणी जाली : भक्तजनां टीळे केले : वोवाळणी केली : गोसावीयांसि वीडा वोळगवीला : भक्तजनां तांबोळें दीधलीं : मग तांबोळ घेयावेया अनोज्ञा दीधली : मग भक्तजनीं तांबोळे घेतलीं : मग दीसू नीगाला : मग बाइसीं आपुला नेमस्त पुजावसरू केला : मग गोसावी वीहरणा बीजे केले : महादाइसीं उपाहारू निफजवीला : गोसावी बीढारा बीजें केलें : महादाइसीं पुजावसर केला : गोसावीयांसि ताट केलें : भक्तजनां ठाये केले : गोसावीयांसि आरोगण : भक्तजनां सह पांतीं जेवणें जालीं : वीडे तांबोळे जालीं : महादाइसीं गोसावीयांसि वोवाळीलें : भक्तजनांसि वोवाळीलें : ऐसा गोसावीयांसि भक्तजनां सहीत दीवाळिसणु केला : ॥

लीळा २६३ : भट : महादाइसे : रिघपुरां पाठवणें
बीजेचां दीसीं : भट : महादाइसें : हंसराज : देव : परमेश्र्वरपुरासि पाठवीलीं : गोसावीयांसि मढाभीतरि आसन : गोसावी महादाइसा आणि हंसराजा सांघातु लाविला : हंसराजा श्रीप्रभुचिये सेवेलागि पाठवीलीं : विधि वीहीला : ‘बाइ : तेथ भितरि निद्रा न कीजे : तेथीची प्रवृति भंगो नेदीजे : माहात्मेया सांघातें यइजेना : माहात्मेया सांघातें जाइजेना’ : तैसींचि महादाइसें बाहिरि निगालीं : गोसावी हंसराजातें बोलावीलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हंसराजा या आरूतीं : एथीचेया प्रवृति एकत्र उठीती बैसती : झणी कांहीं आणुनि आनघेया : या दोन्हीं सकरडीया गाइ असति हो’ : महादाइसीं बाहीरि आइकों ठेलीं होतीं : गोसावी हंसराजासि विशेखें निरोपु देत असति : ह्मणौनि आइकों ठेली : आइकीलें : मग ह्मणों लागलीं : ‘गोसावीयांसि आमची कणव थोर असे’ : तैसींचि हंसराज आलीं : दुख करूं लागलीं : महादाइसीं पूसीलें : ‘हा हंसराजा : गोसावी काइ नीरोपु दीधला’ : ‘काइसा निरोपु आइ : माझी प्रकृति दोखरूप : ह्मणौनि गोसावीयांसि तुमचा परिहारू दीधला’ : सर्वज्ञें ह्मणीतलें तें अवघेंचि सांघीतलें : मग भटोबासासि आणि महादाइसां थोर सूख जालें : ‘गोसावीयांसि आमची थोर कणव असे’ : मग ते निगालीं : गोसावी अनुवर्जीत बीजें केलें : ॥

लीळा २६४ : भाउबीजे मोदक
येल्हाइसे महादाइसातें बोळाउनि आली : गोसावीयांसि गावां निगावीयाची प्रवृति : गोसावी बाइसांकरवि आइत करवीली : ग्रामांतराची : गोसावीयांतें अवघींचि राहावीतें होती : पर गोसावीयांसि निगावयाची प्रवृति : महादाइसीं एल्हाइसातें ह्मणीतलें होतें : ‘येल्हो : एल्हो : तुं गोसावीयांतें  राहावीजसू’ : मग यल्हाइसीं वीनवीले : ‘जी जी : मीं गोसावीयांचां ठाइं भाउबीज करीन’ : ह्मणौनि फुटेया पीळा घेतला : ‘जी जी : आजि गोसावी राहावें जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें ‘लाडु कराल तरि हें राहील’ : ‘करीन जी’ : मग तेयांसि वीधि वीहीला : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आपणचि करावें : पुसों लाभे : पर करउं न लभे’ : ‘हो कां जी’ : ह्मणौनि तेहीं मानिलें : जें जें करीती : तें तें दाखवीतें जाति : ऐसे लाडु बांधले : मग दुरडीए घालौनि : पालवें झांकौनि घेउनि आलिं : गोसावीयां पुढें दुरडी ठेविली : दंडवते घातलीं : श्रीचरणा लागलीं : मग बाइसीं हात पाहीले : तवं दोन्ही हात फोडी भरलें : कुंकु ऐसे जाले असति : बाइसीं ह्मणीतलें : ‘बाबा : बटिकीचे दोन्हिं हात फोडी भरले असति’ : मग गोसावी तेयांचां हातीं श्रीमुखीची पीक घातली : दोन्हीं हात घासविले : इतुलेनि जाळु नीवर्तला : निके जाले : मग ते लाडु गोसांवी आपुलेया वीनयोगा नेले : ॥

लीळा २६५ : मार्गीं वेधें भारद्वाजगमन
मग गोसावी तीजेचां दीसी बीजें केलें : खवणापुरीये वायव्ये काटीयेतळीं आसन : बाइसें आणि नाथोबा भिक्षे खवणापुरीये गेलीं : गोसावीयां जवळि लखुदेवोबा होते : दोघें भिक्षा करूनि आलीं : झोळिया दृष्टपुत केलीया : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पुण्यमाहात्मे हो : अवघा जनु थकला ठेला असे : कव्हणी यांचें थक फेडिता नाहीं : तूं कां थकलासि ऐसें कव्हणीं ह्मणतें नाहीं’ : ‘जी जी’ : ह्मणौनि उगेचि होते : मग तेथौनि गोसावी बीजें केलें : भारद्वाज कांटीयेवरि बैसला होता : तथा मार्गीं बैसला होता : मग गोसावी बीजें केलें : आणि उडौनि मागुता मार्गीं बैसला : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पुण्य माहात्मे हो : हें पाखीरू कवणिए ठाइचें : ऐसें जाणा’ : ‘जी जी : तीयें कांटीयेचें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथ मासूसें : गोरूवां तरि गोरूवां पाखीरूवां तरि पाखीरूवां वेधु आति’ : ‘तें कांइ पा’ : (शोधु) ‘तथा वेधें पाखीरू ऐसें माणुसें : गोरूं ऐसें’ ॥ ते उगेचि राहीले : ॥

लीळा २६६ : भाटेपुरीये वस्ति : लखुदेवोबा : नाथोबा : भिक्षे पाठवणें
मग तेथौनि गोसावी बीजें केलें : भाटापुरीये : महालक्ष्मीचा धाबां आसन : दुपाहाराचा पुजावसर : आरोगण : पहुड : उपहुड : मग गांवांतु शारंगधराचेया देउळा बीजें केलें : वस्ति जाली : नाथोबा लुखदेवोबा : भिक्षे पाठवीले : मग ते भीक्षे निगाले : भिक्षा करूनि आले : दृष्टपुता झोळीया केलीया : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ भिक्षा घेवों नेणतिचि’ : ‘जी जी’ : मग बाइसीं पुजा केली : आरोगण जाली : बाइसीं पदार्थु निवडीला : मग गोसावीयांसि आरोगण दीधली : वीडा : ॥

लीळा २६७ : मनोर्थु पाठवणी
गोसावी पश्चात पाहारीं पहुडले : गावां दक्षीणे मळा : तेथ परिश्रया बीजें केलें : परिश्रयो सारूनि गावां दक्षीणे पूर्वामुख धाबें : मळेया आंतु : तेथ आसन : तथा धाबेया एउनि परिश्रया बीजें केलें : परिश्रयो सारूनि मग धाबां आसनीं बैसले : ॥ लखुदेवोबायें रात्रीं मनोर्थु केला : ‘बहुत दी लागले : गावां जावों : कांहीं तेया वरो घालावी : निश्चेती करावी : मग यावें’ : गोसावी दंतधावन करीत असति : एकें श्रीकरीं शिळीक घेतली : मग ह्मणीतलें : ‘काइ पुण्यमाहात्मे हो : मनोर्थु वर्तता’ : ‘बहुत दी निगालेयां भरले : कुटुंब वरोविण सीणत असे जी’ : मग गोसावीयांसि गुळळा : पुजावसर : मग तेंहीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : पाठवीले : मग गोसावी बीजें केलें : ॥

लीळा २६८ आहीरमाला बीजें करणें
(रामेश्र्वरबास) आहीरमालासि बीजें केलें : चौकीं उभे राहीले : भट निगाले : ॥ वांकेफळीं वस्ति :॥

लीळा २६९ : अनु अनोज्ञात मंडळिका जाणें
तेथौनि गोसावी बीजें केलें : मार्गीं नाथोबायें म्हणीतलें : ‘माणीकदंडा अरौतें ऐसें बाइ घेया पोतें : मी जाइन’ : बाइसीं म्हणीतलें : ‘हें काइ रे नाथोबा : जासी कैसा : एथ बाबा एकलें : मी एकलीं : कैसा जासी’ : मागुतें तैसेंचि ह्मणीतलें : ‘बाबापासीं कोण्हीची माणूस नाहीं : मां जासी कैसा : पारूखु’ ह्मणीतलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : बटीकु काइ म्हणतु असें : ‘बाबा हा गावां जाइन ह्मणतु असे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइसे ह्मणतें असति तें कां न करा’ : उगेचि ठेले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : या जें उपनलें असें : तें नेलेया आरूतें न पारूखे : बाइ : माहात्मेया निरोधु न कीजे’ : मग ते मार्गीं जाडि पोतें ठेउनि निगाले : मग बाइसीं तो पुडवाटुवा घेतला : जाडि सागळ घेतली : मग निगाले : मग मार्गीं माणिकदंडाचिया पिंपळातळिं नावेक आसन : बाइसीं चरणक्षाळण केलें : गोसावीयांसि गुळळा : वीडा : तवं वायनायक आले : सकुटुंबी रावसगावां निगाले : कामाइसा आठांगुळें ह्मणौनि : उजुया वाटा गाडा आला : ते आपुले कामठु पडीताळित पडीताळित एत होते : तवं गोसावीयासि तें पींपळातळिं बैसलेया देखीलें : भेटि जाली : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग ह्मणीतलें : ‘हें काइ जी : गोसावी कवणीकडें जात असति’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘या तपोवना हें जात असे’ : मग वायनाएकें वीनवीलें : ‘जी जी : रावसगाउं बरवा जी : तेथ दोनि जगति असति : बरवें सीधनाथाचें देउळ असे : रामनाथाचें देउळ असे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पूर्वीं दृष्ट असे’ : मग तेहीं पुढतीं वीनवीले : ‘जी जी : रावसगावा बीजें करावें जी : माझेया कुटुंबासि दर्शन दीयावें जी’ : मग गोसावी विनवणी स्विकारीली : मग वायनाएकें पोतें घेतलें : ॥

लीळा २७० : सीधनार्थी संगमेश्र्वरीं आबैसा उमाइसां भेटि : पूजास्वीकारू
गोसावी पुढां जेउतें बीजें करिति : वायनायक मार्गीं टाकीत येति : बाइसें मागें राहीली : गोसावी रंगमेश्र्वरा बीजें केलें : वायनाएकें वोटेयावरि जाडिचें आसन रचिलें : गोसावी आसनीं उपवीष्ट जाले : वाएनायक गोसावीया जवळि वोटेया खालि घुंगटु घालुनि बैसलें : तवं बाइसें आलीं : मग बाइसें दारा गेली होतीं : तवं आबाइसें वाती लावावेया आली : तवं वायनाकातें देखीलें : मग वाति लाउनि गेलीं : मग उमाइसां पुढां सांधों लागली : ‘उमै उमै : वाएनायकासि काइ जालें : बाइल एकि आणिली असे : ते वोटेयावरि बैसविली असे : ह्मातारपणीं याचें न पारुखे’ : बाइसें आलीं : बाइसीं ह्मणीतलें : ‘बाबा : ये गावीं मास उपवासीनी असति की’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘असति’ : बाइसें गुंफेसि गेलीं : तवं आबैसें आंगणीं पाटमोरीं उभी असति : बाइसीं आबैसांचे डोळे झांकीले : आबैसीं ह्मणीतलें : ‘हे कोण पां : एथ मज कव्हणासीं रळी नाहीं : हासें नाहीं’ : ह्मणौनि आबैसीं तयांचे हात परवसिले : मग ह्मणीतलें : ‘हे आघात तवं बाइसांसारिखे : आंगुळिया वोळखीलिया’ : मग ह्मणीतलें : ‘हें कवण बाइसें’ : आणि बाइसीं हात सोडीले : मग आबैसीं ह्मणीतलें : ‘हें काइ बाइ तुह्मीं आलिति : तरि गोसावी कें’ : ‘ना : हे नव्हति’ : बाबा एथ बीजें केलें असे’ : तैसेचि आबैसें दुख करूं लागलीं : मग उमाइसा पुढें सांघीतलें : त्यातें आधिलें दीसीं जैएंती जाली होती : तें पानें पोफळें घेउनि गोसावीयाचेया दर्शनासि आली : मग भेटि जाली : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘‘बाइ तुह्मी ह्मणा : यातें ‘ समुद्राचां प्रांतीं वोळखैन’ : मुंडपें मुडप झगटौनि गेलींति : तरि वोळखाचि ना’’ : मग तेहीं ह्मणीतलें : ‘मग तेहीं ह्मणीतलें : ‘गोसावी वोळखवीती तरि वोळखीजे कीं’ : मग आबैसीं श्रीचरण क्षाळण केलें : आबैसीं चरणोदक घेतलें : उमाइसां चरणोदक घेतां ह्मणीतलें : ‘’मास उपवासीयें हो : तुम्हां व्रतिस्थां एथचा विधि ऐसा नव्हे : मासोपवासीनीं सागळीं उदक घेवों नै ए’ : मग तेहीं आपूलिये गाळीलीये घागरीचें उदक आणिलें : तेणें चरण क्षाळण केलें : मग चरणोदक घेतलें : उरलें ते आपुलिये घागरीं घातलें : मग आबैसी पूजा केली : तथा गुंफेसि : ॥ मग आबैसी गोसावीयांलागि उपाहारू करावीया तांदुळ सडीले : तवं वायनायकें ह्मणीतलें : ‘आबै मियां गोसावीयांतें उपाहारांलागि आधिंचि वीनवीलें असे’ : मग आबैसी ह्मणीतलें : ‘तुम्हीं रात्रीं करा’ : आबैसी उपाहारू निफजवीला : मग गुंफेसि आरोगण : वस्ति जाली : ॥ रात्रीं वायनाएकू उपाहारू घेउनि आले : वायनायकाचिय हातीं ताट : जावायाचिय हातीं तुपाची वाटी : तो दारवठां उभा राहीला : वायनायकें ताट गुंफेसि ठेवीलें : त्याचीया हातीची वाटी घेउनि आले : मग गोसांवीयांसि आरोगण : गुळळा : मग बाइसीं सांजवेळेचि आबैसातें ह्मणीतलें : ‘बाबासि बहुत दी मादनें नाहीं : तरिं चोखणी पाणीयाची आइत करा’ : मग आबैसीं पाणिया डेरा भरिला : चोखणी ठेवीली : मग मादनेयांलागि वीनवीलें : पडदणी वोळगउं आदरीली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ प्रभातें कीं’ : ‘हो कां जी’ : मग गोसावीयांसि पहुड : ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP