मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत| अध्याय विसावा श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा सप्ताहाची फलश्रुती आरती पहिली आरती दुसरी श्रीसमर्थास प्रार्थना कथामृत - अध्याय विसावा प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात. Tags : kathasamarthaकथासमर्थ अध्याय विसावा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविष्णवे नमः । लक्ष्मीदेवी नमोस्तुते ॥१॥मागे वाचिली आपण कथा । रायराजे काशीस जाता-। विश्वेश्वराच्या दर्शना करिता । जाता घडला चमत्कार ॥२॥विश्वेश्वराच्या पिंडीऐवजी । तेथे दिसती यतिवर्यजी-। आश्चर्य पावले सरदारजी । घालिती तयां दंडवत ॥३॥तेलंगणांतिल विप्र एक । यात्रा करिता तो अनेक । मनीं करोनी तो विवेक । स्वामी संन्निध पातला ॥४॥यात्रा करिता ऋण अपार-। जाहले मातें म्हणे फार । दया करावी हो मजवर । द्रव्यसाह्य द्या मजलागी ॥५॥सांगती आहोत संन्यासी । द्रव्य द्याया नसे मजसी । हे घे म्हणोनी ढेकळासी-। देवोनि करिती मार्गस्थ ॥६॥मार्गी चालता करि विचार । ओझे जाहले म्हणे फार । फेकू जाता मृत्तिका दूर । रुपे पाहिजे चकाकते ॥७॥तेणे दारिद्रय गेले लया । यतिवर्य ऐशी करिती दया । वाचिले आपण कथेसी या । समर्थ ऐसे कनवाळू ॥८॥तैशीच दुजी वाचिली कथा । रहिमतपुरचा सरदार होता । तत्कन्य्ची विवाह-चिंता । निवारिली ती यतिवर्ये ॥९॥वाचिली तैशी अद्भुत कथा । मूषकातें निर्जीव असता-। अंगावरोनी कर फिरविता । जाहला तो जिवंत की ॥१०॥मूषका मिळता संजीवन । तये केले पलायन । आश्चर्य करिती ते बघोन । प्रज्ञापुरीचे नृपवर्य ॥११॥वाचिली आपण कौतुककथा । स्वामी वृक्षातळीं बसतां । चिमणी चिव चिव वरी करिता । समर्थानी आज्ञापिले ॥१२॥येतो गावासि जावोनी । तोंवरी तेथेचि बैसोनि-। रहावे ऐसेचि सांगोनी-। यतिवर्य जाती गावाला ॥१३॥येतां परतोनी । वदले आता जा उडोनी । चिवचिवाट केला चिमणीनी । गेली उडोनि आनंदे ॥१४॥वाचिली आपण अपूर्व कथा । जाधवाचा काळ येता । शोक अत्यंत तो करिता । चिठी तयाची परतविली ॥१५॥जाधवा मिळता प्राणदान । बैल जाहला गतप्राण समर्थाचे महात्मेपण । गताध्यायीं वाचियले ॥१६॥गरिब बिचार्या वानरीशी । मारावया लोक तिजसी-। येता, घालोनी पाठीशी । संरक्षिती स्वामी तिला ॥१७॥जवळ येता अंतकाळ । धरिले तिने चरणकमळ । रात्रंदिन ती करी तळमळ । व्यथित जाहली अत्यंत ॥१८॥मरणासन्न की होता स्थिती । स्वामी मस्तके३ए कर ठेविती । ठेवोनि मस्तक चरणांप्रती । वानरी करी परार्पण ॥१९॥मुक्या पशूसी दिली मुक्ती । समर्थाची अशी शक्ती । अनन्यपणे करिता भक्ती । स्वामी तयासी ॥२०॥श्रीस्वामीच्या पदां नमुनी । वाचू कथा मन लावुनी । तेणे चिंता दूर सरुनी । उद्धरती सुधैर्य आपणां लाभेल ॥२१॥नवरोजी शेठ मुंबईचे । दर्शना आले समर्थाचे मित्रगृहीं राहिले साचे । उद्या भेटु म्हणोनिया ॥२२॥घेती प्रभातीं यतिदर्शन संतोष पाहता आनंदधन । चिंता कथाया नुरे भान । तैसेचि आले माघारी ॥२३॥निद्रेत असता मध्यरात्री । आवाज येता ये जागृती । उठताक्षणी पुढे दिसती-। स्वामी प्रत्यक्ष खुर्चीवरी ॥२४॥आश्चर्य वाटले धरी चरण । क्षमा मागे कर जोडुन । चिंता माझी करा हरण । करी याचना नवरोजी ॥२५॥धंदा बुडाला कर्ज होय । ह्रदरोग लागे मला हाय । अनंत केले मी उपाय । तुम्हांविणे ना सोडविता । ॥२६॥चरन धरोनी धाय धाय-। रडे पारशी होय गाय । तूचि माझी अता माय । वाचवीगे मजलागी ॥२७॥द्रव्य देतो मी अपार । नासेल तेणे कर्जभार । सांगे परंतु एकवार । काय देशील मजलागी ॥२८॥अत्यानंदे तदा वदला । होता मोठा लाभ मजला । पावहिस्ताचि मोबदला । आपुल्याअ पदीं अर्पीन ॥२९॥स्वामीस ऐसे आश्वासिले । तदा यतिवर्य त्या वदले । नर्मदेकडे जाता भले । होईल मोठा धनलाभ ॥३०॥श्रवणीं ऐसे शब्द पडता । हर्ष जाहला तया चित्ता । चरणीं मिठी घालू जाता । गुप्त जाहले यतिवर्य ॥३१॥थक्त जाहले तेव्हा मनीं । आले परंतु हे कोठुनी । दारे, खिडक्या बंद असुनी । प्रवेशले हे आश्चर्य ॥३२॥दुसरे दिनीं स्वगृहासी । निघोनि गेले मुंबईसी । अल्पकाले ये तयांसी । वडोद्याचे निमंत्रण ॥३३॥नृपवर्याने सन्मानिले । अविकार आणी धन अर्पिले । तेणे तयांचे कर्ज फिटले । सुखी जाहले सर्वस्वी ॥३४॥समर्थानी जसे कथिले । प्रत्यया तैसेचि त्यां आले । परमाश्चर्य ते तदा गमले । धन्य धन्य हे यतिवर्य ॥३५॥सफल होता कार्य त्याचे । आनंदले मन तयाचे । प्रज्ञापुरीं जाउनीं साचे । म्हणे करावी पाद्यपूजा ॥३६॥पेढे, मिठाई, फुले माळा। केशर, कस्तुरी लावुनी टिळा । महत् संकटीं रक्षिले मला । अनंत जाहले उपकार ॥३७॥साष्टांग नमिले स्वामीचरण । कंठ तयाचा येत भरुन । आजन्म मार्ते जगजीवन । कृपा आपुली लाभावी । ॥३८॥समर्थाची करुनि स्तुती । जाण्यास मागे अनुज्ञेप्रती । व्यापारधंदा करण्याप्रती । जाणे मजला भाग असे ॥३९॥पाव हिस्सा द्यावयाचे । भान नुरले तया साचे । हरण होताचि रोगाचे । स्मरे कोण त्या वैद्यासी ॥४०॥ऐसे असती कृतघ्न जन । कार्य होता विसरती पूर्ण । उपकारकर्त्या स्मरे कोण । नवरोजी शेठ तैसेची ॥४१॥बडोदे ग्रामीं समर्थासी-। बलात्कारे न्यावयासी । तात्या हर्षे निज मानसीं-। रचू लागले बेत नाना ।४२॥राम मालशे इत्यादिक । यांही रचिला व्यूह एक । भांग-धोत्रा करुनी एक । केले रसायन पाजाया ॥४३॥पडता बेशुद्ध यतिवर्य । पळवुनी न्यावे तयां त्वर्य । त्वरित गाठणे बडोदे कार्य । रचिला ऐसा व्यूह तये ॥४४॥संधि साधुनी पेय देती । होय स्वामींसी दाह अती । यतिवर्याची कठिण स्थिती । पाहवेना कवणांसी ॥४५॥बडोदेकरांची दुष्ट मती । जाणता जाहले संतप्त अती । ऐशा दुष्ट दुर्जनाप्रती-। ताडिले पाहिजे वदती जन ॥४६॥भक्त लागता मारावया । लागले तेव्हा पडो पाया । आक्रोशता याचिती दया । चुकलो आम्ही नराधम ॥४७॥स्वामी भक्तां खुणाविती । नका मारु तयांप्रती । ऐशी स्वामी दयामूर्ती । प्रज्ञापुरीं ती नांदे ॥४८॥योगसामर्थ्य महाथोर । पचविती स्वामी विष घोर । येता पूर्वस्थितीवर । क्षमादृष्टिने अवलोकिती ॥४९॥लोक सर्व हे पोटार्थी । द्रव्याकरिता सर्व करिती । तेणे जाहले हे दुर्मती । कीव तयांची येत आम्हा ॥५०॥तात्या हर्षे नी मालशे । वोळंगती पदीं खासे । रक्षिता आम्हा कोणी नसे । तुम्हाविणे मायबाप ॥५१॥आक्रंदता ह्रदय फुटले । देवे तयांसी आश्वासिले । होतील तुम्हा पुत्र भले । चिंता आता न करावी ॥५२॥अयाचित असा आशीर्वाद । लाभता निमाला सर्व खेद । समर्थाचे घेतले पद-। उभयतानी निज मस्तकीं ॥५३॥शत्रु-मित्र ना भेद करिती । ऐशी जयांची थोर मती । अखिल जनांचे हित साधिती । ऐसे महात्मे असती हे ॥५४॥आता ऐका विठ्ठलकथा । हैदराबादीं गृहस्थ होता । माणिकप्रभूंचा भक्त असता । केले तयाने दुष्कर्म ॥५५॥परस्त्री परधन अपहार । केले अत्यंत दुराचार । अपराध करिता महाथोर । श्रेष्ठ नोकरी जाय लया ॥५६॥मनीं अत्यंत घाबरला । हस्तीं पदीं शृंखलेला-। घालुनी नेतील की मजला । बंदिशालेंत आजन्म ॥५७॥उद्विग्न होय तो निज अंतरीं । जाऊ आता कोठे तरी । माणिकप्रभू समर्थ जरी । कळता देतील की शाप ॥५८॥तया अंतरीं होय स्फूर्ती । अक्कलकोटीं देवमूर्ती । चरण धरोनी कथन करिती । स्थिती, जाउनी शरण तयां ॥५९॥स्वामींच्या तो समोर येता । उग्ररुपा समर्थ घेता-। वदती तया अधमा आता । येसि कासया मजपासी ॥६०॥परनारी त्या भष्ट केल्या । त्यांतील काही जिवे मेल्या । कित्येक व्यक्ती नागविल्या । अपहार करोनी द्रव्याचा ॥६१॥ऐशा चांडाळाचे मुख-। बघता लाभे कवणा सुख । अनेकांसी दिले दुःख । तुला शासन नरकाचे ॥६२॥संतप्त ऐशी ऐकता वाणी । थरथर कापे डोळिया पाणी । विठ्ठ्ल तदा कोसळे धरणीं । म्हणे वाचवा मज दीना ॥६३॥बहुत पातके केली खरी । म्हणे मातें वाचवा हरी । आक्रोशता चरण धरी । हदीं आपुल्या विठ्ठल तो ॥६४॥पश्चात्तापे जळे पुरता । ऐशी तयाची स्थिती बघता । दया उपजे श्रीभगवंता । मस्तकी ठेविला अभय कर ॥६५॥विठ्ठल जाहला आनंद मनीं । अभय लाभे तयां म्हणुनी । घाली लोटांगणे चरणीं । कंठ तयाचा ये भरुन ॥६६॥ठेवीन आता शुद्ध वर्तन । स्मरेन आपुले नित्य चरण । अनंत जन्मीं फिटणार न । अनंत असती उपकार ॥६७॥हैदराबादे त्वरे येता । दरबारी त्या उभे करिता । निजाम वदला तया बघता । मुक्त करावे यालागी ॥६८॥नवस केला होता तर्ये । मुक्तता झालिया मी तो स्वये । सुवर्णमुद्रा अर्पीन जये-। संकटीं मार्ते संरक्षिले ॥६९॥मुक्त होता परतोनिया । यतिवर्याच्या पडे पाया । यथाविधी पूजोनिया । समर्था अर्पी स्वर्णमुद्रा ॥७०॥श्रवण करावी आता कथा । बळवंतराव भेंडे स्वता । भोगित होते क्षयाची व्यथा । बहुत महिने दारुण ते ॥७१॥देशी विदेशी वैद्य झाले। गंडेदोरे मांत्रिक भले । अनंत उपायां करोनि थकले । तदा वदले कोणी तया ॥७२॥आपण प्रज्ञापुरीं जावे । सिद्ध महात्मा शरण भावे-। जावोनिया त्यां विनवावे । व्यथा आपुली हरावया ॥७३॥पहावा तरी चमत्कार । अनुभव घ्यावा खरोखर । बरे होवोनि साचार-। याल तुम्ही सुनिश्चित ॥७४॥प्रेमाग्रह तो अनेकांचा । ऐसा ऐकोनिया साचा । होय निश्चय मनीं त्यांचा । घ्यावे दर्शन स्वामींचे ॥७५॥माता-भगिनी सवे घेती । प्रज्ञापुरीसी त्वरे जाती । कोठे आहे समर्थ मूर्ती । पुसती जनां नम्रत्वे ॥७६॥तोंचि त्यांसी वदले कुणी । खासबागेंत असती मुनी । शरण जावे त्वरा करुनी । कृपा होईल तुम्हावरी ॥७७॥हार, श्रीफल घेवोनिया । खासबागेंत जावोनिया । भावें साष्टांग वंदोनिया । चरणकमळीं स्थिरावले ॥७८॥हार घालोनि दक्षिणा, पेढे । तांबूल ठेविला स्वामींपुढे । पुढे घालितो तुज साकडे । निवारावी व्यथा मम ॥७९॥यथाविधी पूजिला हरी । वाहती नेत्रीं घळघळा सरी । तूंचि आता गा कैवारी । विश्वांतरीं या नसे दुजा ॥८०॥स्वामीसन्निध पाचारिती । तया करीं श्रीफल देती । जपमाळ देउनी तया वदती । सुखे करावे त्वां गमन ॥८१॥निराशतेने ग्रासिले जया । प्रसाद देउनी वारिले भया । येता तयांचे भाग्य उदया । अत्यानंद जाहला की ॥८२॥स्वामीकृपे व्यथा गेली । समृद्धता तयां आली । समर्थचरणीं पूर्ण जडली । श्रद्धा तयाची आजन्म ॥८३॥संत-महात्मे-सिद्ध थोर । वर्णन करिता नसे पार । सहज घडती चमत्कार । असे अलौकिक असती ते ॥८४॥करुणार्णव ते होत स्वामी । कथा वाचा पुढे नामी । अगाध त्यांची असे करणी । प्रत्यक्ष पहा प्रत्यंतर ॥८५॥मोहोळग्रामीं काय झाले । गरिब ब्राह्मणाघरीं घडले । रुग्ण पुत्रा मरण आले । आकांत जाहला भयंकर ॥८६॥माते फोडिला हंबरडा । पिता जाहला जणू वेडा । कैसा पडे मृत्युचा वेढा । देवा आता कैसे करु ॥८७॥एकुलता एक पुत्र साचा । प्रान बहिश्वर जणू अमुचा । कशास घेतला जीव त्याचा । म्हणोनि ताडिती निज वदना ॥८८॥ह्रदय भेदक दुःख त्यांचे । ऐकवेना कुणा साचे । एक कुणबी गोड वाचे । धीर द्याया आला पुढे ॥८९॥विवेके आवरा तुम्ही शोक । संकटीं दावितो मार्ग एक । कर जोडुनी मागुया भीक । दुःख सांगोनि साधूसी ॥९०॥साधू ऐसा समर्थ कोण । मम बाळाचे आणील प्राण । घालीन चरणीं लोटांगण । म्हणे भेटवा आम्हा त्वरे ॥९१॥सवे घेवोनि दोघांसी । कुणबी निघे दर्शनासी । नदीकाठी गुहेपाशीं । आले सत्वर धावुनी ॥९२॥अहो धावा साधुदेवा । अंत आमुचा न पहावा । अमुल्य आमुचा पुत्र ठेवा-। द्यावा आम्हासी सत्वर ॥९३॥गुहेच्या त्या तोंडावरी- होतो शिळा लोटुनी दुरी । उभी दिव्य स्वारी । तेजे भासली भास्कर जणू ॥९४॥विप्र घाली मिठी पायीं । माता रडे धाइधायी । धरोनि आशा तुझे ठायीं-। आलो, निराशा न करि गा ॥९५॥पुत्र एकला जाहला मृत । आभाळ फाटे अंधार होत । देवा आता करा त्वरित । उपाय पुत्रास्तव काही ॥९६॥तदा बोलती योगेश्वर । बसवुनी पुत्रा घोड्यावर । दर्शना आणा येथवर । जावे सत्वर स्वगृहीं ॥९७॥सदनीं येता आश्चर्य थोर । डोळे चोळित उठे पोर । निद्रा टाकोनिया घोर । भिर भिर पाहे चोहीकडे ॥९८॥कवटाळिले माते तया । बाळा आलासि परतोनिया । करुणाघना श्रीयतिवर्या । तुमचीच कृपा सारी ही ॥९९॥माता-पिता मंत्रमुग्ध । हर्षातिरेके नुरे शुद्ध । सावध करिती त्या प्रबुद्ध । अवती भवती होते जे ॥१००॥माता-पिता घालिती स्नान । दिधले तया गोड अन्न । अलंकार वस्त्रे त्या घालुन । बसविले तया अश्वावरी ॥१०१॥वाजत-गाजत तया नेला । स्वामी चरणी त्या घातला । सर्वागावरि का फिरविला । प्रेमभरे श्रीस्वामींनी ॥१०२॥लोक करिती जयजयकार । अवधूत योगी महाथोर । गरिबाचे मृत उठविले पोर । ऐसे सामर्थ्य स्वामींचे ॥१०३॥पुष्पे बहरला पारिजात । सडा फुलांचा पडे बहुत । तेवी श्रींच्या कथा अनंत । वाचू ऐकू आता पुढे ॥१०४॥गोविंदशास्त्री विप्र एक । प्रज्ञापुरीं दिन कित्येक । धंदा भिक्षुकी करोनि देख । संसारगाडा चालविती ॥१०५॥दिसामागोनि दीस जाता । वाढे तयांची संसारचिंता । काय करावे कर्मासि आता । नको दरिद्री ऐसे जिणे ॥१०६॥संसार करिता पूर्ण विटला । जीव नकोसा तया झाला । जीवनापरी तो मृत्यू भला । लागली चिंता अनिवार ॥१०७॥सहज एकदा आले मनीं । बसावे जाउनीं ययीचरणीं । करतील काहीतरी करणी । ना तरी करु आत्मघात ॥१०८॥सायंसमयी सर्व जमली । भक्तमंडळी यती जवळी । घेवोनि दर्शना दूर बसलो । स्वारी गोविंदशास्त्रींची ॥१०९॥भाग्यघटिका ती भटजींची । उदया आली पहा साची । अमृतदृष्टी समर्थाची । वळली अहा त्यांचेवरी ॥११०॥दूर कासया बैसलासी । दुःख-चिंता काय करिसी । बैस येवोनि चरणांशी । बसता तया गोंजारिले ॥१११॥संपत्ति असता वडिलार्जित । चिंतासागरीं वृथा बुडत । भाग्य उदया तुझे येत । सोडि चिंता सर्वही ॥११२॥स्वामी मीतों भाग्यहीन । पूर्वार्जित कोठले धन । असे पामर मी मतिहीन । वदता वाहती अश्रूंसरी ॥११३॥समर्थ त्यांसी तदा वदती । जागा खणोनी पहावी ती । दुपारीच्या तरुखालती । मागील तुझ्या परसांत ॥११४॥ऐकता जाहला हर्ष थोर । स्वामींस घालुनीं नमस्कार । त्वरित गाठी आपुले घर । गेला परसांत मागल्या ॥११५॥पत्नी-पुत्रांसवे रातीं । खणोनि करिता दूर माती । घट तांब्याचा हातीं । सुवर्ण मुद्रा दिसती त्यां ॥११६॥परमानंदा नुरे पार । घडा घेवोनि डोईवर । नाचे थयथय पडवीवर । स्वामी स्वामी म्हणोनिया ॥११७॥ऐसे स्वामी दयावंत । दारिद्रय-व्यथा दूर करित । मृता जीवन जणू देत । असती स्वामी अलौकिक ॥११८॥समर्थाचे दिव्य चरणे । मस्तक ठेवू कर जोडूनी । गुंतवू मना नामस्मरणीं । स्वामीसमर्थ म्हणोनिया ॥११९॥आता ऐका या कथेची दृष्टी दिली अंध स्त्रीसी । चिमाताई नामे ऐसी । घराणे तियेचे श्रीमंत ॥१२०॥श्रीमंत रास्ते उमाबाई । तयांची भाची चिमाताई । विवाह जाहल्यावरी होई । पीडा तियेच्या नेत्रांसी ॥१२१॥रोग वाढला नेत्रद्वयीं । खर्च जाहला तया पायीं । सृष्टी जाहली अंधारमयी । उपाय केले अनंत ते ॥१२२॥मंत्र-तंत्रही सर्व केले । उपाय करिता सर्व थकले । तेव्हा कोणीतरी वदले । जावे आपण स्वामींकडे ॥१२३॥विचार करिता बोध पटला । म्हणे जाउया दर्शनाला । प्रज्ञापुरीचा मार्ग धरिला । येताच वंदिले समर्थासी ॥१२४॥दुसरे दिनी प्रातःकाळीं । शुचिर्भुत ऐशी ही मंडळी । पूजासाहित्य घेउनी जवळी । समर्थचरनीं उपस्थित ॥१२५॥श्रीमंत रास्ते उमाबाई । स्वामीपदी ठेवुनी डोई । करी आम्हास उतराई । स्वीकारोनी पाद्यपूजा ॥१२६॥पंचामृत स्नान चरणां । केशरी उटी लाविली त्यांना । हार सुगंधी अर्पिले जाणा । बैल-तुळशीहि वाहती ॥१२७॥लाविला कपाळी सुगंधी टिळा । पुष्प-गजरे अर्पिती फळां । तांबूल-दक्षिणा हा सोहळा । स्वामी पाहती सकौतुक ॥१२८॥भक्तिभावें ओवाळिती । कर जोडुनी त्यां प्रार्थितो । दया करावी अम्हावरती । नेत्रपीडा निवारी गा ॥१२९॥स्वामी वदले प्रसन्नपणे । कशासि आता वृथा भेणे । त्यजुनी चिंता तुम्ही असणे । उपाय करणे सांगतो तो ॥१३०॥दूध काढुनी मांजरीचे । नेत्रीं घालणे नित्य साचे । सातवे दिनीं दुःख तुमचे । नष्ट होता व्हाल सुखी ॥१३१॥आनंद झाल तिचे चित्ता । उपाय केला गृहीं येता । यतिवर्याची अपूर्वता । प्रत्यया आली तिजलागी ॥१३२॥त्रैलोक्यांत समर्थाची । सत्ता केवढी असे साची-। श्रवण करु नरसाप्पाची । कथा अत्यंत मनोहर ॥१३३॥म्हैसुराहुनी अक्कलकोटीं । नरसाप्पा ये समर्थ भेटी । रात्रंदिन ते तया ओंठीं-। नाम नांदे समर्थाचे ॥१३४॥ये न मराठी त्या बोलता । व्यवहार चाले खुणा करिता । स्वभावे तो शांत होता । स्वामींसन्निध सदा वसे ॥१३५॥बहुत ऐसे जाता दिन । स्वामीसेवा नित्य करुन । जो जे देईल ते भक्षुन । करी आपुली उपजीविका ॥१३६॥एके दिनीं काय झाले । यतिवर्ये त्या पाचारिले । हिशेबाचे चोपडे दिले । काय लिहिले ते वाची । ॥१३७॥वाचता अत्यंत आनंदला । संदेश कानडी दिसे लिहिला । नित्य वाचणे तूं गीतेला-। होता तयासी उपदेश॥१३८॥नरसाप्पा तो आनंदला । ठेवुनी चरणी मस्तकाला । त्वरे तेथोनिया उठला-। गेला दत्तगुरुजींकडे ॥१३९॥कर जोडुनी म्हणे त्यांसी । मला शिकवालका गीतेसी । आजन्म आपुल्या उपकारासी । कदापि ना विसरेन ॥१४०॥दत्तशास्त्री नि संन्यासी । शास्त्रचर्चा करिती निशीं । गाढ निद्रा नरसाप्पासी-। लागली होती त्या समयीं ॥१४१॥जाहली असता मध्य रात्र । नरसू जाहला भयग्रस्त । सर्वागासी कंप सुटत । घाम फुटला आंगासी ॥१४२॥स्वगत बोले तो भ्रमात । मातें नेले विष्णु लोकांत । स्वामी दाविती श्रीभगवंत । रामचंद्र नी सितामाई ॥१४३॥रत्नजडित त्या सिंहासनीं । पाहिले दोघां हास्यवदनी । भरत-लक्ष्मण वामासनीं । शत्रुघ्न, मारुती नम्र अती ॥१४४॥देदिप्य मूर्ती महा तेज । रत्नखचित ते मुकुट साज । पिनाकपाणी दिव्य ओज । ऐसे देखिले श्रीराम ॥१४५॥स्वामी प्रत्यक्ष तिथे होते । प्रेमे धरोनी मला हाते-। प्रभू संन्निद्ध जाहले नेते-। तत्क्षणीं ठेविले शिर चरणी ॥१४६॥श्रीस्वामीसमर्थ असती-। स्वयं भगवान ही निश्चिती । नरसाप्पा ऐशी करी स्तुती । ऐकता स्तंभित जन सारे ॥१४७॥स्वचर्माचे जोडे जरी । स्वामींचरणीं घातले तरी । उपकार फिटणे अशक्य परी । हे मी जाणे सुनिश्चित ॥१४८॥समर्थ विभुती असामान्य । तुळायासी दुजा न अन्य । देवांचेही देव ते, धन्य-। लाभे जयांना त्यांची कृपा ॥१४९॥यतींची ऐशी करिता स्तुती । लाविता त्यांची चरण-माती । अनंत जन्मिची भस्म होती-। महापातके निमिषार्धी ॥१५०॥सद्भक्तही करु नमन । जाऊ हितास्तव तयां शरण । भवभय संकट होय हरण । ऐसे सामर्थ्य स्वामींचे ॥१५१॥इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१५२॥॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥ N/A References : N/A Last Updated : April 15, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP