श्रीमद्विवेक सिंधूप्रमाणे , शिष्याचा हा ताप हरण करणारे , श्री सिद्धारुढ स्वामी अखंडसच्चिदानंदरुपाने विराजमान आहेत . त्याकडे काही वर्षापूर्वी एक मुमुक्षू लहान वयातच संसारतापाने तप्त होऊन हा ताप दूर करण्याला गुरु मिळावा .
म्हणून विचार करीत पूर्वसुकृताच्या योगाने , अनेक देश फिरत व तीर्थयात्रा करीत श्री सिद्धारुढ स्वामींची कीर्ती श्रवण करुन या ठिकाणी आला व मुमुक्षंत्वादि चार साधनसहित गुरुचे सन्निध येऊन साष्टांग नमस्कार करुन नम्रतेने हात जोडून विनयाने म्हणाला की , साक्षात परमेश्वरच अशा गुरुमहाराजा , अनायासाने हा ताप दूर करण्याचे कर्तृत्व तुमच्या ठिकाणी आहे , असे म्हणून हात जोडून उभा राहिला . स्वामी त्याजकडे दुर्लक्ष करुन हा सत्याधिकारी आहे किंवा नाही , याची परीक्षा करावी म्हणून उदासीन राहिले . मी कृपाकटाक्षाला पात्र नसेन असे स्वामीस वाटले असेल , असे समजून तोही गप्प राहिला ; व मनात समजला की , रुप पहावयास ज्याप्रमाणे डोळे पाहिजेत त्याप्रमाणे गुरुकृपाकटाक्ष पाहिजे तर गुरुची सेवा केली पाहिजे . पुढे हा नानाप्रकारची सेवा करु लागला . त्याची परीक्षा पहाण्याकरिता एकेक दिवशी गुरु त्याच्या जेवणाची उपेक्षा करीत असत . तरी त्याने सदभाव न सोडता सेवेत कमी केले नाही . अगदी नेहमी तो तत्पर असे . हा सदभावाने सेवा करीत आहे असे न पाहून गुरुंनी त्याला कबीरदास हे नाव योग्य आहे , असे समजून त्याला कबीरदास या नावाने हाक मारुन आपल्या समोर बसवून घेतले . पण हा तेथे न बसता गुरंच्या मागील बाजूस जाऊन बसला . तेव्हा गुरुंनी याची साधने निश्चयात्मक आहेत काय ? हे पाहण्याकरिता त्याला विचारिले की , ज्ञानसाधना मोक्षाला विवेक हे एकच साधन पुरे , इतर साधने कशाला पाहिजेत ? असा प्रश्न ऐकून बालशिष्य म्हणाला , वैराग्यावाचून विवेक नाही तर मग वैराग्य व विवेक दोनच साधने पुरेत . इतर साधनांची काय आवश्यकता आहे ? शमादि साधने नसतील तर वैराग्य नष्ट होते . तर मग शम एकच पुरे ; दया कशाला पाहिजे ? मनोनिग्रह व इंद्रियनिग्रह हे एकमेकांवर अवलंबून आहेत , म्हणून दया , क्षमा वगैरेची जरुरी आहे . आता बोलण्याप्रमाणे याची भावना आहे किंवा नाही हे पहाण्याकरिता स्वामी म्हणाले , अरे शिष्या , - ही साधने प्राण्याला मरणाचे औषध आहेत , याकरिता यांची इच्छा करु नको . यामलशास्त्रांत स्त्रीवश्य , जनवश्य , राजवश्य , भूतवश्य , रसवाद , पौष्टिकत्व इत्यादि सत्ता सिद्धि आहेत म्हणून ती शास्त्रे तुला सांगतो . ती साधने केली तर तुला शांती मिळून जीवितवृत्ती चालेल . तेव्हां बालशिष्य म्हणाला की , या लोकी कदाचित सुखाला कारण होतील , परंतु परत्र दुःखालाच कारण आहेत . याकरिता विचार करुनच त्याचा मी त्याग केला आहे . गुरु म्हणाले परसुखाकरिता निराळी उपासना किंवा योगसाधन सांगतो . त्याने तुला सुख मिळेल . शिष्य म्हणाला , ॥ यथेह कर्मचितान लोकःक्षीयते , तथैवामुत्र कर्मचितो लोकःक्षीयते ॥ या श्रुतीप्रमाणे परलोकादि कर्म रचित असल्यामुळे नष्ट होतात , असे ऐकिले आहे . गुरु म्हणाले ज्या अर्थी विषयच इहलोकी सुखाचे साधन आहेत , त्या अर्थी तेच प्राप्त करुन घे . शिष्य म्हणाला , " न कर्मणा , न प्रजया , न धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः " या प्रमाणाने इहपर न सोडता अमृतसुख मिळणार नाही म्हणून इहपर या दोहोचाही स्वीकार योग्य नाही . तेव्हा गुरु म्हणाले , हा योग्य अधिकारी आहे . याला इतर कामे सांगणे योग्य नव्हे . तेव्हा कबीरदासास म्हणाले तुझी इच्छा काय आहे . कबीरदास म्हणाले , ईशावास्य उपनिषद कर्मपर आहे , किंवा ज्ञानपर आहे , याबद्दल संशय आहे . तो निरसन व्हावा अशी प्रार्थना आहे . तेव्हा गुरुंनी कबीरदासाकडून त्याचा कानडीत अर्थ करवून त्याची शंका निरसन केली . या भाषांतर करणारालाहि योग्य फुरसत मिळाल्यास व गुरुकृपा झाल्यास त्याचे भाषांतर मराठीत करावे अशी इच्छा आहे , कधी सफल होईल ती होवो .
शिवानंद या नावाचे दुसरे एक शिष्य आहेत , ते लहानपणीच वैराग्यशमदमादि साधनांनी युक्त होऊन पुष्कळ वर्षे लखनौकडे होते . तेथे त्यांनी एक आश्रम स्थापिला आहे . पुढे येथे " वेदांत पाठशाळा व अनाथ बालकाश्रम " स्थापावा व त्याच्या व्यवस्थेकरिता एक कायमचा फंड जमवावा , अशी यांची खटपट चालू आहे . या कार्याकरिता लागणारी भव्य इमारत डॉ० भगवंतराव सखाराम पाटकर व त्यांचे आप्त रा० रा० वसंतराव आनंदराव दाभोळकर वगैरेंच्या साह्याने येथेच चिदघनानंद स्वामींच्या समाधीजवळ तयार केली आहे .
शरण्णया नावाचे एक शिष्य आहेत , ते लिंगायत लोकांचा विशेषतः परामर्ष घेतात . स्वतः सिद्धारुढस्वामी हे पूर्ण अद्वैतवादी आहेत , पण पुष्कळ लोक आपआपल्या ज्ञातिधर्माप्रमाणेच वागणारे आहेत , या करिता मठात त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांची व्यवस्था ठेविलेली असते .
एक गणाप्पा नावाचा चित्रकार कलघटगीचा राहणारा शिष्य होता , तो अगदी निरपेक्षबुद्धीने स्वामीची सेवा करीत असे . त्याने स्वामीकरिता एक चंदनाची उत्तम पालखी करुन दिली आहे . तसेच सोनार शिष्य आहेत , त्यांनी एक सोन्याचा व एक रुप्याचा असे दोन मुकुट , पादुका वगैरे करुन दिल्या आहेत . उत्सवाच्या वेळी स्वामी गावात सोन्याचे पाच कळस असलेल्या पालखीतून मिरवत जातात . बेंकापा नावाचा एक शिष्य आहे , तो उत्तम चित्रकार आहे . याचे बाळबोध अक्षर फारच उत्तम आहे , हे जागजागी दगडावर कोरलेल्या उपनिषदातील श्लोकांच्या अक्षरावरुन समजून येईल . तुकाप्पा सपार या नावाचा एक कोष्टी आहे . त्याने महाराजांच्या पालखीवर घालण्याकरिता एक जरीचे उत्तम कापड येथेच विणून तयार केले आहे .
रा . रा . बाबा गर्दे , व्यंकटराव गोखले , परापा आणा , वामनराव फणसळकर , रघुनाथराव उर्फ आपाराव शिरगावकर वगैरे मुमुक्षू शिष्य पुष्कळच आहेत . रा . वामनराव फणसळकर यांनी स्वामीचे चरित्र मराठीत लिहिले आहे , व वेदांतमाला नावाचा आणखी एक ग्रंथ केला आहे . तसेच रा . रा . बाबा गर्दे यांची कीर्ती तर सर्वांना माहीतच आहे . त्यांनी ब्रह्मसिद्धांत नावाचे पुस्तक , गीतपंचदशी , गीताशतपदी वगैरे पुस्तके लिहिली आहेत .
प्रो . काशीनाथपंत छत्रे वगैरे श्रीमान शिष्यही पुष्कळ आहेत त्यांनी महाराजांच्या समाधीची दगडी इमारत बांधण्यास व तलावास वगैरे चांगली मदत केली आहे . व वेळोवेळी सामान -सुमान वगैरे त्याजकडून बरेच येते . तसेच या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती कारण एक विहीर होती तिला पाणी अगदी नव्हते यामुळे ती बुजवून टाकिली . व तलाव खोदण्याचे ठरुन लागलीच काम सुरु होऊन एक दगडी पायर्यांचा सुंदर तलाव तयार झाला आता पाण्याची चांगली सोय झाली आहे . पण पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याकरिता विहीर पाहिजे आहे .
हल्ली येथे एक चिदघनानंद स्वामीची समाधी व तीवर दुसरा मजला करुन स्वामीस निजण्याची जागा चांगली सचित्र तयार केली आहे . दुसरी स्वामींची दगडी समाधी ही इमारत बदामी पांढर्या दगडाची बांधली आहे , तीत मोठमोठे शिलालेख आहेत . त्यात कानडी व मराठी लिपीत ईशावास्योपनिषदातील श्लोक कोरिले आहेत . व एक सापाचे एकसंधी दगडावर फारच मोठे चित्र कोरले आहे .
ब्राह्मणलोकांकरिता एक व लिंगायतलोकांकरिता एक अशा दोन मोठ्या धर्मशाळा व दोन स्वयंपाक घरे आहेत . श्रीकबीरदास एका मोठ्या सोप्यात वास करितात . इथे श्री स्वामीचा मोठ्या प्रमाणात काढलेला एक मोठा सुंदर रंगीत फोटो आहे व स्वामीची लाकडी कोरीव मूर्ती आहे . ही अगदी हुबेहूब आहे . ही मूर्ती पाहिल्यावर आपल्याकडे अजूनपर्यंत खोदकाम उत्तम करणारे व रंगाचेही उत्तम करणारे कारागीर आहेत , मनात आल्यावाचून रहात नाही . यापुढे नवीन धर्मशाळा श्री शिवानंदस्वामी याचे खटपटीने व डॉ . पाटकर याचे स्फूर्तीने तयार झाली आहे . त्यातच आता वेदांतशाळा व अनाथबालिकाश्रम स्थापन व्हावयाचा आहे .
श्री . स्वामीची दिनचर्या अशी आहे की , भीमप्पा उज्जनवर याचे घरी रात्री शयन करावयाचे व पहाटे चार वाजता उठावयाचे . त्या वेळी बरीच भक्तमंडळी मंगल आरत्या घेऊन आलेली असते . तेव्हा तेथे आरती भजन वगैरे घेऊन ६। -६॥ चे सुमारास महाराज मठास जातात . स्वामी एकवेळ अत्यंत आजारी झाले होते . तेव्हापासून त्यांची प्रकृती फार अशक्त झाली . पायाने जाण्यायेण्याचे श्रम सोसेनात तेव्हा मल्लापा आणा दिवटे या नावाचे शिष्याने एक टांगा ठेवून महाराजांची मठात जाण्यायेण्याची सोय केली आहे . मठात गेल्यावर एक तास दीडतास वेदांतकथन चालते . यावेळी श्रीकबीरदास हे पंचदशी , उपनिषदे , वगैरे वेदांतविषयक ग्रंथ वाचून त्याचा कानडीत अर्थ सांगतात . व ज्या ठिकाणी अर्थ फार विशद करावयाचा असेल त्याठिकाणी स्वामी स्वतः काही भाग सांगतात . मग स्वामी मठातच थोडे भोजन करितात अगर कोणी जेवावयास बोलाविले असता तिकडे जेवावयास जातात . पुढे १ -१॥ चे सुमारास मठात येतात व १ तास विश्रांती घेऊन नंतर पुनः सकाळच्या प्रमाणे वेदांतचर्चा चालते . यावेळी पुष्कळ सायंकाळी विरुपाक्ष शास्त्री हे महाभागवत सांगतात ; मग भजन , आरती होते . आणि नंतर स्वामीमहाराज दिवटे यांचे टांग्यातून उज्जनर यांचे घरी येतात . तेथे गावातील व्यापारी वगैरे भक्तमंडळी जमलेली असते , तेथे पुनः थोडा वेळ वेदान्तचर्चा चालते . या ठिकाणी कोणी तरी पंचदशी अगर दुसरा ग्रंथ वाचतात . व स्वामी स्वतः त्याचा अर्थ विशद करुन सांगतात . कोणी सदभक्त परठिकाणाहून मठात रहावयास आल्यास स्वामी महाराज रात्री गावात न जाता मठातच राहतात . स्वामींच्या ठिकाणी एक मोठा विशेष गुण असा आहे की , कोणी कसाही वादविवाद करावयास येवो , त्याचा अधिकार पाहून त्याचे समाधान होईल , असेच ते त्याला उत्तर देतात . यामुळे तेथे कोणीही आला तरी त्याचे समाधान झाले नाही , असे होतच नाही .
हे चरित्र लिहिण्याचा उद्देश असा आहे की , हे वाचणारास मी कोण ? कोठून आलो ? मला काय करावयाचे आहे ? हे जाणण्याची इच्छा व्हावी व केवळ पशूप्रमाणे शारीरिक क्रिया करण्याकरिताच मनुष्याचा जन्म नाही , हे प्रत्येकाने ध्यानात आणून ब्रह्मानंद अनुभवण्यास प्रवृत्त व्हावे . हा उद्देश या जगाचा जो कोणी नियंता असेल त्याने सिद्धीस न्यावा अशी त्याची प्रार्थना करुन मी प्रणाम करितो .