श्रीमदब्रह्मविचार साधक अशा या भरतभूमी नावाच्या स्त्रियेला शिरोभूषणाप्रमाणे शोभणारे या बिदुरकोटिनावाच्या ग्रामात शिवचरणकमली लीन असा गुरु शांतप्पा नावाचा महात्मा रहात होता . त्याची देवमल्लम्मा नावाची पतिव्रताग्रेसर , सूर्यासारखी तेजस्वी व चंद्राला जशी रोहिणी तशी पत्नी होती . ही नवरा -बायको शिवध्यानतत्पर राहून , अतिथी , अभ्यागत यांचा परामर्ष घेऊन श्री नंदिकेश्वराची पूजा करीत आनंदाने कालक्रमणा करीत होती . भुकेल्यास अन्नदान देऊन शेषप्रसाद ग्रहण करुन तसेच शिवकथाश्रवण , व सच्छास्त्राध्ययन यांच्या योगाने विवेकवैराग्यसाधनसंपन्न होऊन रहात असता , केवळ मोक्षसाम्राज्य शिवगुरु श्रीवीरभद्रस्वामी यांच्या करकमलापासून उत्पन्न झालेल्या गुरुपूजेत तत्पर होऊन आपले निजस्वरुप जाणून भक्तियुक्त अंतःकरणाने रहात असता श्रीमज्ज्ञानानदैश्वर्ययुक्त अशा सदगुरु वीरभद्रस्वामींनी त्या दांपत्याला ब्रह्मात्मैक्योपदेश प्रतिपादलेल्या शून्यसंपादन वगैरे वचनग्रंथाचा उपदेश केला आणि त्यांना लिंगांगसामरस्य भावात निःसंदेह केले . ह्या दांपत्याच्या पोटी तीन मुलगे झाले . त्यांपैकी वडील दोघांना व्यवहारात घालून , लहान असलेला सिद्ध त्याला आपल्याजवळ बसवून नेहमी गुरुवाक्यश्रवण करवीत असता सिद्धाला पाच वर्षे झाली . एके दिवशी कूडलसंगम नावाच्या देवाच्या वचनशास्त्रात लिंगैक्य विचार निघाला असता , बालक असा सिद्ध म्हणाला की , मी लिंगैक्य व्हावे म्हणून मनात निर्धार करुन सर्व ठिकाणी समभाव ठेवून रहातो . पुढे एके दिवशी मुलांबरोबर खेळत असता , मुलांनी तीळ मागितले ; पण तीळ शिंक्यावर एका गाडग्यात ठेविले होते , त्या ठिकाणी हात पोचेना . म्हणून एका काठीने त्या गाडग्यास खाली भोक पाडून , त्या भोकातून तीळ गळू लागल्यावर खाली धोतर धरिले व त्यातील तीळ , जमलेल्या सर्व मुलांस दिले ; तरी धोतरात तीळ होतेच . गावातील प्रत्येक मुलाजवळ बरेच तीळ आहेत असे लोकांनी पाहून हे तीळ कोठून आणले म्हणून विचारिता त्या मुलांनी " गुरुशांतप्पाचा मुलगा सिद्ध याने आम्हास दिले " असे सांगितले . ते ऐकून , बाहेर बसलेल्या देवमल्लमाला विचारुन ते घरात गेले आणि पहातात तो दीड पायली तीळ मावणार्या गाडग्याच्या खाली बरेच तीळ सांडले आहेत , व मुलाजवळही पुष्कळ तीळ आहेत . ते पाहून मुलास म्हणाली - मुला हे काय केलेस ? तेव्हा तो म्हणाला - मी काय केले देवयल्लमा ? तुझेच पायाचा हा प्रसाद . आईला आश्चर्य वाटून ती मनात म्हणाली , हा कोणी तरी आवतारिक पुरुष आहे किंवा प्रत्यक्ष देवांश आहे ; आपण धन्य आहो . नंतर ती एके दिवशी सिद्धाला शाळेस जा असे म्हणू लागली ; तेव्हा तो म्हणाला - आत , बाहेर , चोहोकडे शिवध्यानरुपी शाळा असल्यावर आणखी कोणत्या शाळेस जावयाचे ? अजून कोणत्या शाळेस जावे म्हणतेस ? आई , विद्यार्थ्याने विद्येचा अभ्यास करावा ; परंतु विद्यामूर्तीने विद्येचा अभ्यास करणे म्हणजे सरस्वतीने विद्वानांची अपेक्षा करणे , चंद्राला दुधाने न्हाऊ घालणे किंवा सूर्यापुढे मशाल धरणे अथवा लक्ष्मीला धनिकाची गरज लागणे , अशासारखे हे आहे . हे त्याचे बोलणे ऐकून देवमल्लमा आपल्या मनात म्हणाली की ह्या माझ्या मुलाची ही वाक्ये कल्पित नसून ; मंत्रवाक्येच आहेत असा मुलगा माझ्या पोटी झाल्यामुळे , माझा गर्भ सफल झाला व मी धन्य झाले .
पृथ्वी
जनास नमण्या जरी कथितसे गुरु सिद्ध हा ।
तरी न मनि भावना पुजक पूज्य पूजा पहा ॥
तथापि गुरु शिष्यही सतत रीति चालावया ।
प्रणाम करितों पहा परम सच्चिदात्मा तया ॥१॥