सिद्धारुढस्वामी - प्रकरण ९

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


आर्या

परिसाची योग्य नव्हे उपमा तूं स्वस्वरुप देतोसी ॥

हरिहर रुपी असुनी गुरुसिद्धा नरसमान कीं दिससी ॥१५॥

पुढे काही दिवसांनी चिंतामणि आश्रमातून निघून वेंकटगिरीस जाऊन , श्री वेंकटशाचे दर्शन घेऊन , वाटेतील शीतोष्णापासून होणारे सुखदुःख अनुभवीत एक लहानसे वस्त्र अंगावर घेऊन , करतल हेच पात्र व भूमी हीच शय्या समजून , जेथे तेथे मूर्खाचा त्रास सोशीत व काही उन्मत्तांकडून दगडांचा मारही सहन करीत जात असता . काहीजण हा कोणत्या जातीचा आहे ? कोणाला ठाऊक म्हणून जवळ येऊ देत नसत . काही जण हा उत्तम अधिकारी आहे , ब्रह्मज्ञान्याप्रमाणे निःस्पृह आहे व आत्मज्ञानी आहे ; असे समजून अन्न देत असत . याप्रमाणे प्रवास करुन शिवकंचीस येऊन त्यांनी श्रीशिवाचे दर्शन घेतले . नंतर विष्णु कंचीस जाऊन पुढे श्रीवरदराजाच्या दर्शनास जात असता एका ब्राह्मणाला हा गृहस्थ ब्रह्मवेत्ता असावा असे वाटले . कारण , हा निःस्पृह व जडभरताप्रमाणे उन्मत्त वेष धारण केलेला आहे . याची पूजा केल्यास महाफल मिळेल . म्हणून त्याला नमस्कार करुन हात धरुन घराकडे नेऊन उच्चासनावर बसवून यथाशक्ति षोडशोपचार पूजा करुन , स्तुती करुन त्याची प्रार्थना केली की ब्रह्मज्ञान्याची पूजा केल्यास ती तत्काल फलदायक होते , असे ऐकिले आहे . तेव्हा त्यास जवळ बोलावून आता तू कोण ? असे त्यास विचारिले . तेव्हा प्रत्यक्ष दिसणारे शरीरच मी असे तो म्हणाला . हे धातुमय शरीर पंचमहाभूतांस वाटून दिल्यावर नाहीसे होईल . नंतर तू कोण ? असे विचारल्यावर प्राणबुद्धीसहित प्रत्येक लोकांत प्रत्येक शरीरास संचार करणारा मी , ही बुद्धी विलयात्मक असलेल्या झोपेत तू कसा होतास हे दाखविते . त्याच्या पलीकडे मला समजत नाही . समजत नाही हे समजून बोलता न येणारा अज्ञानसाक्षीरुप **** असे अनुभवास आणून दिले , तेव्हा महात्म्याचे पूजेचे फळ अदृष्ट नव्हे नष्ट आहे . हे समजून त्याने संतुष्ट होऊन पुनःप्रदक्षिणा व नमस्कार करुन परवानगी घेतली . नंतर श्रीवरदराजाचे दर्शन घेऊन नऊ महिने फिरुन चिदंबरास आले व त्याचे रहस्यस्थानाचे दर्शन घेऊन सात महिने प्रवास करुन वाटेने पर्जन्यामुळे भिजणे हेच स्नान , उन्हाने वाळणे तेच अंग पुसणे , अशा अवधूत स्थितीत कुंभकोणास आले , तेथे ईश्वरदर्शन घेऊन तंजावरास गेले . तेथून श्रीरंगास नदीतून जात असता एकजण म्हणाला , अरे प्रेतसदृश मनुष्या , अन्न नसतां रोड असून इतका का धावतोस ? तुला पाहिजे तितके अन्न असून पुष्ट न होता किती चालतोस ? तेव्ह अवधूत म्हणाले , अरे , अन्न वगैरे मनुष्याला रोग उत्पन्न करितात व लवकर जाण्याची शक्ती नाहीशी करितात . गमनागमनाला कारण मन आहे असे समज . तो नमस्कार करुन म्हणाला , तू श्रीरंगाचा अवतार खरा . बरे आहे असे म्हणून त्यांनी पुढे जाऊन श्रीरंगाचे दर्शन घेतले . इकडे जललिंगेश्वराचे दर्शन घेऊन तीन महिने फिरुन मदुरामीनाक्षीच्या देवालयात जातेवेळी एक मूर्ख ब्राह्मण म्हणाला , तू चांडाळ आहेस व संकलित चांडाळ , आशाचांडाळ , आणि कर्मभ्रष्ट चांडाळ या नीतीला अनुसरुन तो देवालयात जाऊ देईना ; तेव्हा सिद्ध म्हणाले , तूच चांडाळ आहेस कारण तुला राग आला आहे . ब्राह्मण म्हणाला काही तरी दे व आत जा . तुला आशा आहे , तेव्हा तू आशाचांडाळ नव्हेस काय ? असे सिद्धांनी विचारिले . तेव्हा तुझ्याजवळ काही मिळकत नाहीना ! तेव्हा संकलित चांडाळत्व आले . मग ब्राह्मण म्हणाला , तुझ्याशी मी कोठे वाद घालीत बसू ? मला स्नान करावयाचे आहे . तेव्हा सिद्ध म्हणाले , महत्समागम सोडून कर्म आचरणारा कर्मभ्रष्ट चांडाळच . म्हणून प्रायश्चित घेतले पाहिजे . असे म्हणून गालावर हात बडवून त्राहि त्राहि म्हणून नमस्कार करुन बाहेर निघाला . तो देवळात गर्भालयात पंचामृताभिषेकाचा समारंभ मीनाक्षीदेवीकरिता चाललेला पाहून बाहेर येऊन गावच्या लोकांचा सहवास सोडून कावेरी नदीच्या काठी एक देवालयात जाऊन तूष्णीभावाने काही एक न मागता निजले . इतक्यात वादाने क्षोभित झालेला ब्राह्मण ‘ अवधूताला मी विनाकारण सोडला . त्याला मी भिक्षाही घातली नाही , त्याची सेवा माझ्याकडून कोणत्याही प्रकारे घडली नाही . म्हणून मी फार दुर्दैवी आहे . ’

आता तो महात्मा कोठे भेटेल तर शोधून आणावा अशी चिंता करीत शोध करीत चोहोकडे पहात कावेरी नदीत स्नान करुन देवाला थोडे पाणी घालावे म्हणून देवालयात आला . तो त्याच्या पुण्याईने त्याला स्वामी दिसले . तेव्हा परमानंदित होऊन साष्टांग नमस्कार करुन , माझ्या घरी भिक्षेस यावे ; अशी प्रार्थना करु लागला . तेव्हा स्वामी म्हणाले , पायाने चालत घरी नेण्यापेक्षा येथेच काही आणून दिल्यास , दसपट पुण्य लागेल . याकरिता येथेच घेऊन ये ; तेव्हा ब्राह्मण संतुष्ट होऊन घराकडे जाऊन , लवकरच मिष्टान्नाने भरलेले ताट घेऊन आला व स्वामींचे जेवण झाल्यावर , ते ब्रह्मानंदात निमग्न होऊन तेथेच निजले .

कामदा

त्रिगुणरुपका , निर्गुणात्मका । निगमपालका , लोकपूजका ॥

सहनशक्ति दे रक्षि या जगा । सगुणमूर्ति आरुढ रुप गा ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP