कामदा
नाहिं या कलीं पूज्य सिद्धसा । प्रेममोक्ष हा देइं राजसां ।
श्रेष्ठ मूर्ति आरुढ मोक्षदा । राहसी समाधींत सर्वदा ॥११॥
मागील प्रकरणात झालेला संवाद एकून गजदंड स्वामीस फार आनंद झाला ; व त्यांनी सिद्धाप्पास जवळ बसवून घेऊन त्याच्याशी महद्विचाराचा ऊहापोह करण्यास सुरुवात केली व यापुढे तू हलकी कामे करु नकोस म्हणून सांगितले . तेव्हा सिद्धांनी प्रश्न विचारला की ब्रह्माचा निश्चयार्थ झाल्याचे चिन्ह कोणते ? गुरु म्हणाले ‘ संशय विपरीत असंभावना होऊन ब्रह्मात्मभाव दृढ होणे . यावर सिद्धान्तविवेकचिंतामणीच्या वेदात प्रकरणात ‘ अहमात्मा ’ या द्वयाचे ऐक्य कसे झाले ? असे विचारले तेव्हा गुरु म्हणाले , अन्योन्याच्या अध्यास लक्षणाची ह्रदयग्रंथी आहे तोपर्यंत द्वैतभाव असतो . मग अध्यासाची शिथिलता झाल्यावर दुसर्याच्या शरीरावर आपला अभिमान जसा नसतो तसा आपल्या शरीरावरही अभिमान नाहीसा होईल तेव्हा तेव्हा एकत्व ज्ञानसिद्धी होईल . मग द्वत कोठे राहिले ? तेव्हा सिद्ध म्हणाले प्रत्यक्षप्रमाणाला विषयभूत आकाशादी पंच महाभूतयुक्त प्रपंच दिसत असताना नाही म्हणतात हे कसे ? गुरु म्हणाले ती प्रत्यक्ष इंद्रिय व्याप्ती किंवा वृत्ती , व्याप्ती , किंवा चैतन्यव्याप्ती , होय . ह्यांपैकी तू पहिली मानलीस तर भौतिक घटावर भौतिक इंद्रिये व्याप्त होऊ शकत नाहीत कारण दोनही जड आहेत . दुसरे मानिलेस तर शुभ्र वस्त्राने काळा घट्ट आच्छादिला व वस्त्राला घटाचे ज्ञान झाले असे मानिले तर जडवृत्तीला ज्ञान झाले असे होईल . तिसरी चैतन्य व्याप्ती मानिली तर विषय वृत्तीचे व चैतन्यवृत्तीचे एकत्व ज्ञान होईल . शिवाय जगत हे प्रत्यक्ष ज्ञान असे मानू नये ; असे जर मानिले तर अध्यास होईल . अध्यासाची गोष्ट खोटी असते म्हणून प्रपंच ही मिथ्या कल्पना आहे . यावर सिद्ध म्हणाले , असे आहे तर गुरुमहाराज , व्याप्तीवाचून सामान्य प्रत्यक्ष होऊ लागले , तर अप्रत्यक्ष प्रत्यक्षाने बाधित होईल . कसे म्हणाल , तर बाल्य मानल्यावाचून यौवन व यौवन मानल्यावाचून वार्धक्य कसे सिद्ध होईल ? तर पूर्व कर्मकांडापासून सिद्ध झालेले लिंगधारण आत्मलिंगज्ञान झाल्यावर आपले लिंग आपणच काढिले पाहिजे . हे ऐकून असे करु नये बरे ; असे गुरु म्हणाले , तेव्हा सिद्ध म्हणाले का बरे ? बाबा ते शास्त्रविरुद्ध आहे . असे गुरुंनी सांगितल्यावर सिद्ध म्हणाले , ‘ लिंगमध्ये जगत्सर्व सर्वे लिंगमयं जगत ॥ लिंगवाह्यात्परं नास्ति तस्माल्लिंग महत्सदा ॥ ’ असे शास्त्र आहे . म्हणून मोक्षपदाला प्राप्त होणार्या पुरुषाने लिंगधारण करणे योग्य नाही ; कारण ज्ञान्याने कर्म व ज्ञान ही दोन्ही कशी उपयोगात आणावी , यासंबंधाने ऐतरेयश्रुतीच्या पहिल्या खंडात भाष्यकारांनी कर्मखंडन केले आहे . कारण यथार्थवाद परमार्थरुपाचे ज्ञान झाल्यावर कर्माचे फल दिसत नाही . ज्ञान्याला क्रियासंबंध बाधत नाही . आत्मज्ञान्याला अनाश्रय , अनाश्रम , अगोत्र , अदेह , अकर्मरुम असा आत्मा निरावरण असल्यामुळे कर्म चालत नाही . कर्म चालावयाचे झाल्यास माझा देह , मी अमुक गोत्रज , हे कर्म मजकडून व्हावे , यापासून मला अमुक फळ मिळावे , हे कर्म मी केले नाही तर मला प्रायश्चित भोगावे लागेल , ही भावना ज्याला नाही , त्यांच्याकडून कर्मच होणार नाही . मोक्षपदाला प्राप्त होणार्याला हा भ्रम नसल्यामुळे , त्याजकडून कर्म होत नाही . ही सिद्धाची वाक्ये ऐकून गुरुंना वागले की ., हा काही सामान्य नव्हे . याकरिता हे सिद्धारुढा , तू माझ्या पदाला प्राप्त झाला आहेस . हे ज्ञान , देव अमरगुंड मल्लिकार्जुन याच्या प्रसादाने तुला प्राप्त झाले आहे ; असा गजदंड स्वामींनी आशीर्वाद दिला .
द्रतविलंबित
श्रुतिस गोचर तू नससी खरे । मन , मती तुजला नच पाहि ते ॥
मग तुं इंद्रिय गोचर होशिल । वचन कोण प्रमाणहि मानिल ॥१२॥