सिद्धारुढस्वामी - प्रकरण २२

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


शुद्धकामदा

विमलमूर्ति तूं तापहारका । कमलमित्र बा मोदरुपका ॥

सुमनवंद्य हे बीजरुपका । कुमनहारका सिद्धतारका ॥४१॥

घरी गेल्यावर तो मारवाडी म्हणाला , हे शरीर , घर , व द्रव्य वगैरे सर्व तुमचे आहे . वाटेल ते करा . असे म्हणून सर्व शिवार्पण करुन त्याने त्यावर उदक सोडले . यापुढे प्रपंचाचे त्रासात पडून तुमचे ध्यान सोडले , तर गेलेले दुःख पुनः भोगण्याची पाळी येईल , असे म्हणून शांत होऊन बसला . तेव्हा आरुढ म्हणाले , हे घर तुला राहू दे . तुझ्या द्रव्याचे दोन भाग करुन , एक भाग धर्मादाय कर आणि दुसरा तुझ्या मुलाला राहू दे . तथास्तु असे म्हणून त्याने त्यांचे म्हणणे कबूल केले .

मग स्वामी विजयानगरच्या किल्ल्याकडे येऊन प्रतापसिंहाचे सिंहासन पाहून समुद्रगामी नावाच्या तोफेजवळ बसले . तेथे छत्तीसगडास गेलेले साधू राजाजवळून पक्का शिधा घेऊन समुद्रगामी तोफेजवळच आले . सर्वांनी स्वयंपाक केला व ह्या फक्कडालाही बोलवावे , अस विचार करुन " आव फक्कड , भोजनकू आव " अशी हाक मारिली . तेव्हा अवधूत उठून त्यांच्या पंक्तीस जेवावयास बसले . तेव्हा जेवताना अवधूतांनी बाबाला विचारिले की , प्राणमार्गाने आत गेलेले अन्न ह्रदय व कंठ ह्यामध्ये असताना त्याचे काय होते ? धातु होतात . पुढे काय होते ? तेव्हा त्यातील एक जण म्हणाला मला एवढेच माहीत आहे . तेव्हा अवधूत म्हणाले , " अन्नमयं हि सोम्य मन " या श्रुतीप्रमाणे पोटात गेलेल्या अन्नाचे , पुरिष्ट , स्थविष्ट , अणिष्ट , असे तीन भाग होऊन पहिला भाग पुरिष्ट होऊन खालच्या मार्गाने जातो . व दुसर्‍या भागापासून धातु बनतात ; आणि तिसर्‍या भागाने मनोरुप शांती मिळते . ही शांती आत्मध्यानाभिमुख झाली म्हणजे तो आनंदब्रह्मच होतो . या रीतीने ध्यान करणारा महात्मा तो स्वतः धन्य होतो ; इतकेच नाही , तर ते अन्न देणार्‍या यजमानालाही सदगती देतो . हे न समजणारे तुम्ही भ्रष्ट होता ; इतकेच नाही , तर अन्न दिलेल्या यजमानालासुद्धा अधोगतीला नेता . हे ऐकून ते साधू अवधूताबरोबर फार प्रीतीने विचार करीत त्या दिवशी तेथेच राहिले .

नंतर अवधूत तेथून निघून भद्राचल पर्वताला जाऊन रामदासांनी जीर्णोद्धार केलेले देवालय पाहून , हा सर्व महिमा परमात्म्याच्या विभूतीचा आहे असे म्हणून गोदावरीच्या तीरी असलेल्या रामदासांच्या कट्ट्यावर बसले . तेथे पाच पुरोहित येऊन विचारु लागले की तुम्ही कोणच्या देशचे ? तुमची स्थिति -गति काय ? अवधूत म्हणाले , माझा अपरिच्छिन्न देश , अधिष्ठान स्थिती , गतिनिर्गती . ती कशी ? असे त्यांनी विचारिले . तेव्हा अवधूत म्हणाले , देश , काल , वस्तू , यापासून परिच्छिन्न असलेल्या आत्म्याला कोणता देश , म्हणावा ? सर्व जगताच्या स्थितीला अधिष्ठान असलेल्या सुखस्वरुपाला कोणती स्थिती सांगावी ? सर्व गमना -गमनाला अवकाश देऊन कर्मरहित असलेल्यास गमन कोठले ? तुम्हीच सांगा . हे ऐकून पुरोहित निरुत्तर झाले व त्यांना तूष्णीभाव आला . अवधूत म्हणाले , तुम्ही शुद्धचित्त आहा , म्हणून तुम्ही हा सिद्धांत लवकर ग्रहण केला . ते ऐकून खरे आहे आचार्यवर्य असे म्हणून तेथून सिद्धारुढ कर्नाटक देशाकडे निघाले ; आणि काही तीर्थे वगैरे पहात बिझवाड्याजवळ कृष्णातीरी गेले .

तेथे एक स्त्री भक्तीने नमस्कार करुन विचारु लागली की , तुमचे लक्षण ब्रह्मनिष्ठासारखे दिसते . तेव्हा तुम्ही महात्मे आहां . मी धन्य होईन , असा काही मार्ग सांगा . स्वामी म्हणाले , तू स्त्री अशुद्धचित आहेस म्हणून ब्रह्मोपदेशाला पात्र नाहीस . तरी सोमवारपयोव्रत केलेस तर धन्य होशील . हे पयोव्रत कोणी केले व तो कसा धन्य झाला ? स्वामी म्हणाले , कलियुगाच्या आरंभी धर्मराज नावाचा राजा द्रौपदी नावाच्या आपल्या पत्नीसहित हे व्रत करुन धन्य झाला . ही कथा महाभारतात प्रसिद्ध आहे . असे असेल , तर हे महाराजा , द्रौपदी पाचजणांची बायको असून एकट्या धर्मराजाची पत्नी असे कसे म्हणता ? तेव्हा समर्थ म्हणाले , द्रौपदीच्या ठिकाणी पंचशक्त्यंश असल्यामुळे पांडव हे पाच देवच होते , त्यापैकी इंद्रांश असलेल्या अर्जुनाला शची देवी अंशाने पत्नी झाली होती . यमांश असलेल्या धर्माला श्यामला देवी अंशाने पत्नी झाली होती . ह्याप्रमाणेच त्या त्या देवाच्या अंशाला त्यांच्या पत्नी अंशाने पत्नी झाली होती .

हे ऐकून संतोष पावून स्वामीला पाच प्रदक्षिणा करुन नमस्कार घालून उठून उभी राहून भक्तीने दोन्ही हात जोडून किंकरवृत्तीने , कार्पण्य दाखवून , अतिशय स्तुती करुन , अंजलीबद्ध होऊन ती विनंती करु लागली की , तुझे भाषण ऐकून मी धन्य झाले . परंतु न सांगितलेले व्रत केल्याने माझे मन स्थिर होईल असा मला आशीर्वाद दे . तेव्हा धन्य हो , असा आशीर्वाद देऊन अवधूत तेथून चालते झाले .

तेथे स्वामी ओढ्याच्या काठी तीन वर्षेपर्यंत मेंढ्याचे कळप राखीत राहिले होते . कधी थोडे दूध मिळाले , तर मिळाले ; नाही तर नाही . कधी कधी तर चिखल सुद्धा खाऊन कालहरण करीत व शीतोष्णाचे दुःख सहन करीत राहिले होते . तेथून निघून मंगळगिरी येथे येऊन स्वामीचे गूळ घातलेले दूध घेऊन त्याचा मुकुट घालून देवा जयजयकार असो असे अवधूत म्हणाले . पुजारी म्हणाला देवाला आशीर्वाद देतोस काय ? तेव्हा अवधूत म्हणाले सगुण ब्रह्माचा सावयव अंश देव आहे , म्हणून आत्मज्ञानी सगुण ब्रह्माचे प्रतिमेला मूळ असलेले निर्मुण ब्रह्मच आपण असल्यामुळे आपला आशीर्वाद देबाच्या जीर्णोद्धाराला कारण होईल , बरे पुजारी बोवा . ज्ञानी पुरुषाचे चरणरजाचे आपण भागीदार व्हावे अशी इच्छा करणारे देव ज्ञानाचे आशीर्वादाचीही इच्छा करितात . ते बोलणे पुजार्‍याने मान्य केले ; व त्यास संतोष झाला .

कामदा

तापहारका पुण्यदायका । कोपहारका रागनाशका ॥

पापरुपका मुक्तिदायका । तारि आरुढा ब्रह्मरुपका ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP