आता ‘‘मुखरोगनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥
निरनिराळ्या सात स्थानांच्या ठिकाणी होणारे असे मुखरोग पासष्ट आहेत . ती स्थाने -दोन ओठ , दातांची मुळे , दात , जीभ , टाळा , गळा आणि तोंडाचा सर्व भाग अशी ही सात स्थाने आहेत . त्यापैकी ओठाच्या ठिकाणी होणारे आठ रोग , दातांच्या मुळाच्या ठिकाणी होणारे पंधरा , दातासंबंधी आठ , जिभेच्या ठिकाणी होणारे पाच , टाळ्याचे नऊ , गळ्यासंबंधी सतरा आणि सर्व स्थाने व्यापून होणारे तीन , असे पासष्ट मुखरोग आहेत .
त्यापैकी वात , पित्त , कफ , त्रिदोष , रक्त मांस , मेद ह्यांच्या प्रकोपाने होणारे सात व एक अभिघातजन्य मिळून आठ ओष्ठरोग आहेत ॥३ -४॥
कर्कश , रुक्ष , ताठलेले , काळसर , अतिशय वेदनायुक्त , विदीर्ण झालेले व भेगा पडलेले , असे ओठ वातप्रकोपामुळे होतात .
शिरसाच्या किंवा मोहरीच्या आकाराच्या पुष्कळशा बारीक पुटकुळ्य़ांनी युक्त , दाह व पिकणे ह्यांनी युक्त , स्त्रावयुक्त निळसर व पिवळट रंगाचे असे ओठ पित्तप्रकोपाने होतात .
ओठाच्या रंगाच्या व वेदनारहित अशा पुटकुळ्य़ांनी युक्त , कंडू , सूज व बुळबुळीतपणा ह्यांनी युक्त असून थंड व जड असे ओठ कफप्रकोपाने होतात .
केव्हा काळे , केव्हा पिवळे , केव्हा पांढरे असे असून अनेक प्रकारच्या पुळ्य़ांनी युक्त जे ओठ ते त्रिदोषामुळे होतात .
ओठावर खजुराच्या फळाच्या रंगासारख्या पुटकुळ्य़ा येऊन त्यांतून रक्त वाहते व ओठही आरक्तवर्ण असतात , अशा प्रकारचा ओष्ठप्रकोप रक्तक्षोभामुळे होतो .
मेदोदोषाने ओठ तुपाच्या भांड्याप्रमाणे श्वेतवर्ण व स्निग्ध असून कंडुयुक्त , ताठलेले मऊ व जड असतात आणि त्यातून स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असा स्राव होतो .
अभिघाताने ओठ विदीर्ण होतात , फाटतात . लाल दिसतात , आणि गाठाळलेले व कंडुयुक्त असे होतात ॥५ -१२॥
दातांच्या मुळाचे ठिकाणी होणारे रोग -शीताद , दंतपुष्पुटक , दंतवेष्टक , शौषीर , महाशौषोर , परिदर , उपकुश , दंतदर्ग , वर्धन , अधिमांसक , आणि पाच प्रकारच्या दंतनाडी असे पंधरा दंतमूलरोग आहेत .
ज्याच्या दातांच्या हिरड्यातून अकस्मात् रक्त येते आणि दुर्गंधयुक्त , काळसर , कुजट व मऊ असे मांस त्या हिरड्यांतून गळते . ह्याप्रमाणे एक हिरडी बिघडून पिकली असता ती शेजारच्या . हिरडीला पिकविते . ह्या कफरक्तजन्यव्याधीला ‘‘शीताद ’’ असे म्हणतात .
ज्याच्या दोन किंवा तीन दातांना अतिशय वेदनायुक्त अशी मोठी सूज येते , ह्या कफरक्तजन्यव्याधीला ‘‘दंतपुप्पुटक ’’ असे म्हणतात .
ज्याचे दात हालतात व त्यातून पू व रक्त वाहते त्या रक्तदूषितजन्यव्याधीला ‘‘दंतवेष्ट ’’ असे म्हणतात .
कफरक्तदोषाने दातांच्या मुळापाशी वेदनायुक्त अशी सूज येते तिला कंडू असतो व तोंडातून लाळ गळते ह्या रोगाला ‘‘शौषीर ’’ म्हणतात .
दांत हिरड्यापासून सुटतात , तळ्य़ाला भेगा पडतात , दातांच्या हिरड्याचे मांस पिकते , सर्व तोंड दुखते , ही लक्षणे ज्या विकारात होतात त्या त्रिदोषजन्यव्याधीला
‘‘ महाशौषीर ’’ असे म्हणतात . ( हा सात दिवसांत रोग्याला मारतो असे भोजाचे मत आहे .)
दातांचे मांस गळते व थुंकीतून रक्त पडते , ह्या रक्तपित्तजन्यव्याधीला ‘‘परिदर ’’ असे म्हणतात .
हिरड्याच्या ठिकाणी दाह होऊन त्या पिकतात , आणि त्यांच्यापासून दांत सुटतात , दात हालविले तर त्यांतून रक्त येते व किंचित् दुखतात , त्यांतून रक्त वाहू लागले असता ते तोंडात साठते व तोंडाला घाण येते , ही लक्षणे ज्यांत होतात त्या रक्तपित्तजन्यव्याधीला ‘‘वैदर्भ ’’ असे म्हणतात .
वातदोषाने दातांवर दात उत्पन्न होतो . हा बाहेर पडेपर्यंत तीव्र वेदना होतात व तो बाहेर पडला म्हणजे वेदना बंद होतात . ह्याला ‘‘वर्धन ’’ असे म्हणतात .
हनुवटीच्या जवळच्या शेवटच्या दाढेच्या ठिकाणी अतिशय वेदनायुक्त अशी मोठी सूज येते व त्यामुळे लाळ गळते , व कफजन्यव्याधीला ‘‘अधिमांसक ’’ असे म्हणतात .
दातांच्या मुळाशी पाच प्रकारच्या नाडी (नाडीव्रण ) होतात . त्यांची लक्षणे मागे दहाव्या अध्यायात सांगितलेल्या नाडीव्रणांच्या लक्षणावरून जाणावी ॥१३ -२९॥