सुश्रुत संहिता - मुतखडा

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


त्यापैकी कफजन्य मुतखडा हा कफकारक पदार्थ फार खाल्याने वाढलेला जो कफ त्याने लिप्त (लेपटल्यासारखा ) होऊन खालील भागी वृद्धिंगत होऊन बस्तीच्या तोंडाशी राहून मूत्रमार्ग बंद करितो . त्यामुळे मूत्राचा अवरोध होऊन बस्तिच्या ठिकाणी ठेचल्याप्रमाणे , फोडल्याप्रमाणे व सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात आणि बस्ती जड व थंड होतो . हा कफजन्य मुतखडा पांढरा , स्निग्ध , कोंबड्याच्या अंड्याप्रमाणे मोठा , मोहाच्या फुलाच्या रंगासारखाही केव्हा केव्हा असतो . ह्या लक्षणांनी युक्त अशा मुतखड्याला कफजन्य मुतखडा समजावे .

पित्तजन्य मुतखडा —प्रकुपित झालेला कफ पित्ताशी मिश्र होऊन मूत्रासह बस्तीमध्ये शिरून त्या ठिकाणी घट्ट (कठीण ) होऊन वर सांगितल्याप्रमाणे वाढून मुतखडा उत्पन्न

करून बस्तीच्या तोंडाशी राहून मूत्रमार्ग बंद करितो . त्यामुळे मुत्राचा अवरोध झाला असता बस्तीचे ठिकाणी अतिशय संतप्त झाल्याप्रमाणे पीडा होते , ओढल्याप्रमाणे , भाजलयाप्रमाणे , क्षारादिकांनी चटका दिल्याप्रमाणे पीडा होते . किंवा शिजविल्याप्रमाणे होते ; उष्णवात (एक मूत्ररोग ) होतो . हा पित्तजन्य मुतखडा तांबूस , पिवळट व काळसर रंगाच्या बिब्ब्यातील बीप्रमाणे आकाराचा कदाचित् मधाच्या रंगाचाही असतो . ह्या मुतखड्याला पित्तजन्य मुतखडा असे समजावे .

वाताने युक्त असा कफ कठीण होऊन वर सांगितल्याप्रमाणे (कफजन्य मुतखड्याप्रमाणे ) वृद्धिंगत होऊन बस्तिच्या तोंडाशी राहून मूत्रमार्ग बंद करितो . त्यामुळे मूत्राचा अवरोध होऊन तीव्र वेदना होतात . त्यामुळे अतिशय पीडित झालेला मनुष्य दात खातो . बेंबी चोळतो . शिस्न कुसकरतो . गुदाला स्पर्श करितो . गुदावाटे चमत्कारिक आवाज होतो . शिस्नाचा दाह होतो . आणि लघवी होत असताना त्या रोग्याला कष्टाने वायू सरणे , कष्टाने थोडी थोडी लघवी होणे व कष्टाने शौचास होणे हे विकार होतात . हा वातजन्यच मुतखडा काळसर , कठीण , वाकडातिकडा , खरखरीत आणि कळंबाच्या फुलाप्रमाणे कंटकयुक्त असा असतो . ह्या मुतखड्याला वातजन्य मुतखडा असे म्हणतात .

ह्या तिन्हीही प्रकारच्या अश्मरी (मुतखडे ) बहुधा दिवसा निजणे , समशन (हितकारक व अहितकारक असे मिश्र अन्न खाणे ) अध्यशन (अजीर्णावर जेवणे ) ह्या कारणांनी थंड , स्निग्ध , जड , मधुर अशा प्रकारच्या आहाराने व अशा प्रकारचा आहार लहान मुलांना फार प्रिय असतो म्हणून विशेषतः लहान मुलांना होतात .

आता एवढेच की त्यांचा (लहान मुलांचा ) बस्ती लहान असतो . शरीरही लहान असते . बस्तीमध्ये मांस फार वाढलेले नसते . त्यामुळे ते धरण्याला व काढून घेण्याला सुखकारक (सोपे ) असतात . शुक्राश्मरी मात्र शुक्रजन्य असल्यामुळे तो मोठ्यानाच होतो .

शुक्राश्मरी हा मैथुनाच्या अतिशय अभिघाताने किंवा अति मैथुनाने स्थानापासून भ्रष्ट झालेले शुक्र बाहेर न पडता वायूच्या योगाने शिस्न व अंड ह्यांच्या मध्यभागी जाऊन संचित होते . व तो वायू त्या ठिकाणी त्याला शूष्क करून शुक्राश्मरी (शुक्रजन्य मुतखडा ) उत्पन्न करतो . हा मुतखडा मूत्रमार्गाचा निरोध करितो (बंद करतो ). कष्टाने लघवी होणे , बस्तीमध्ये वेदना व दोन्ही अंडांना सूज हे विकार उत्पन्न करितो . हा दबला असता त्याच ठिकाणी नाहीसा होतो त्याला शुक्राश्मरी असे समजावे ॥८ -१२॥

मूत्रशर्करा , सिकता , मेह (प्रमेह ) व भस्ममूत्रता (एक मूत्ररोग ) हे अश्मरीरोगाचे उपद्रव आहेत .

मूत्रशर्करेची लक्षणे व वेदना ह्या मुतखड्याप्रमाणेच असतात . मुतखडा अगदी लहान असला व त्याला वायु अनुकूल असला तर तो लघवीतून आपोआप बाहेर निघून जातो . हा मुतखडा वायूने फोडला असता त्याचे जे बारीक तुकडे होतात त्यांना ‘‘शर्करा ’’ असे म्हणतात .

छातीत दुखणे मांड्यापासून खालचा भाग गलित होणे , कुशीमध्ये शूल , लघवीचे वेळी अंग कापणे , तहान लागणे , वायू उलटा वर जाणे , अंगाला काळसरपणा येणे , अशक्तपणा , अंगाचा वर्ण काळसर पांढुरका होणे , अरुचि व अपचन हे विकार ज्याला मूत्रशर्करा झाली आहे , त्याला होतात .

ही शर्करा मूत्रमार्गात आली असता दुर्बलता , अंगग्लानी , कृशत्व , कुशीमध्ये शूल , अरुचि , अंगाला पांढुरकेपणा , उष्णवात (एक मूत्ररोग ), तहान , छातीत दुखणे व वांती हे विकार होतात .

नाभि , पाठ , कंबर , अंड , गुद , वंक्षण (अंडसंधि ) व शिस्न ह्यांच्या मध्यभागी खाली तोंड असलेला असा बस्ती आहे . त्याला खालचे एकच द्वार असून त्याची त्वचा फार पातळ आहे . ह्याचा आकार कडु भोपळ्यासारखा असून तो शिरा व स्नायु ह्यांनी व्याप्त आहे . (त्यांच्या आश्रयाने आहे .)

बस्ती , बस्तिशीर , शिस्न , अंड व गुद , ह्यांचा परस्परांशी संबंध असून ते गुदास्थिच्या गुहेत स्थित आहेत .

मूत्राशयालाच मलाधार असे म्हणतात . हा प्राणाचे , (जठराग्नि वगैरे ) स्थान आहे , पक्वाशयाच्या ठिकाणी ज्या मूत्रवाहक सूक्ष्म अशा पुष्कळ नाड्या आहेत . त्या नद्या ज्याप्रमाणे समुद्राकडे पाण्याची भर करितात , त्याप्रमाणे (मूत्राशयातील मूत्र निघून गेले असता ) मोकळा झालेला मूत्राशय भरून काढितात . ह्या हजारो तोंडे असलेल्या नाड्या अतिशय सूक्ष्म असल्यामुळे प्रत्यक्ष दिसून येत नाहीत . ह्या नाड्यांच्या योगाने आमाशय व पक्वाशय ह्यामधून मूत्राशयाकडे जाणारे मूत्र जागृतावस्थेत व निद्रितावस्थेतही थोडे थोडे पाझरत बस्तीला पूर्ण करितात . ज्याप्रमाणे पाण्यात तोंडापर्यंत घागर बुडविली असता ती बाजूचे पाणी त्या घागरीच्या तोंडाच्या काठावरून आत शिरून ती भरते त्याप्रमाणेच (मोकळा झालेला ) हा मूत्राशय भरत असतो असे समज . ह्याप्रमाणे वायु , पित्त अथवा कफ हे मूत्राशी सहवर्तमान बस्तीमध्ये प्रवेश करून अश्मरी (मुतखडा ) उत्पन्न करतात .

ज्याप्रमाणे नव्या घागरीत पाणी भरून ठेवले असता कालांतराने त्या घागरीच्या तळाशी गाळ साचतो त्याप्रमाणे बस्तीमध्ये मुतखड्याची उत्पत्ति होते .

वायु , अग्नि व वीज ह्या देवता ज्याप्रमाणे आकाशामध्ये पाणी ढगाच्या रूपाने घट्ट (कठीण ) करतात , त्याप्रमाणे बस्तीच्या ठिकाणी असणारी कफपित्तजन्य उष्णता ही वायुसहवर्तमान कठीण करिते , (व त्यामुळे मुतखडा होतो ).

बस्तीच्या ठिकाणी वायू हा अनुलोम स्थितीत असला म्हणजे लघवी साफ होते . आणि तोच प्रतिलोभ (विरूद्ध गति ) झाला असता नाना प्रकारचे विकार उत्पन्न करतो . मूत्राघात , प्रमेह , शुक्रदीप व सर्व प्रकारचे मूत्ररोग हे सर्व बस्तीमध्येच होतात

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP