आता ‘प्रमेहनिदान ’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे॥१ -२॥
दिवसा झोप घेणे , व्यायाम न करणे , आळसाने स्वस्थ बरणे , थंड , स्निग्ध , मधुर व मेदकारक व पातळ अन्न खाणे ह्याप्रमाणे वागणारा मनुष्य प्रमेहाने पीडित होतो .
संप्राप्ति -अशा प्रकारे वागणार्या मनुष्याचे अपक्व असलेले वात , पित्त व कफ हे दोष ज्यावेळी मेदाशी एकत्र होऊन मूत्रवह स्रोतसांमधून खाली शिरून बस्तीच्या मुखाकडे येऊन बाहेर पडतात , त्यावेळी ते प्रमेह उत्पन्न करतात .
त्यांचे पूर्वरूप -तळहात व तळपाय ह्यांचा दाह , शरीर स्निग्ध , ओलसर व जड होणे , लघवी मधुर व पांढरी होणे (लघवीतून साखर जाणे ) निद्रा , अंग गळाल्यासारखे वाटणे , तहान , श्वासाला , दुर्गंधी , टाळा , गळा , जीभ व दात ह्यांच्यावर मळ साचणे , केसाच्या जटा वळणे आणि केस व नस अधिक वाढणे ही लक्षणे प्रमेह होण्यापूर्वी होतात .
लघवी गढूळ व पुष्कळ होणे हे सर्व प्रमेहाचे सामान्य लक्षण आहे . आणि सर्वही प्रमेह प्रमेहपिडकांसह (पुळ्यासह ) त्रिदोषजन्यच आहेत॥३ -७॥
त्यापैकी कफदोषाने होणारे - उदकमेह , इक्षुवालिकामेह (इक्षुमेह ), सुरामेह , सिकतामेह , शनैमेह , लवणमेह , पिष्टमेह साद्रमेह शुक्रमेह व फेनमेह हे दहा साध्य आहेत . कारण ह्या मेहामध्ये दोष म्हणजे कफ व दुष्य म्हणजे रसादि धातु ह्यांच्यावर समानच चिकित्सा असल्याने हे साध्य आहेत .
पित्तदोषाने होणारे नीलमेह . हरिद्रामेह , आम्लमेह , क्षारमेह , मंजिष्टमेह व शोणीतमेह हे सहा याप्य आहेत . कारण ह्यामध्ये पित्त हा दोष असल्यामुळे वरील दुष्य जे रसादि धातु त्यांच्या विरूद्ध चिकित्सा करावी लागते त्यामुळे ते याप्य आहेत .
वातदोषाने होणारे - सर्पिर्मेह , क्षौद्रमेह व हस्तिमेह हे चार फारच असाध्य आहेत . कारण यावरील चिकित्साही दोष (वात ) व दृश्ये ह्यांच्या अगदीच विरूद्ध असल्यामुळे उपचार करणे अत्यंत कठीण आहे .
वाढलेला झालेला कफ , वात , पित्त व मेद यांच्याशी युक्त होऊन कफजन्यमेह उत्पन्न करितो . वात , कफ , रक्त व मेद याच्याशी युक्त झालेले पित्त , पित्तजन्यमेह उत्पन्न करितो . आणि कफ , पित्त , वसा , मज्जा व मेह यांनी युक्त असा वायु वातजन्यमेह उत्पन्न करितो .
कफजन्य दहा मेहाची लक्षणे - उदकमेहामुळे श्वेतवर्ण , वेदनारहित व पाण्याप्रमाणे स्वच्छ लघवी होते . इक्षुमेहामध्ये उसाच्या रसाप्रमाणे लघवी होते . सुरामेहात सुरेच्या वर्णाप्रमाणे लघवी होते . सिकतामेहात वाळूसारखी रेवमिश्रित व वेदनायुक्त लघवी होते . लवणमेहामध्ये स्वच्छ व मिठाच्या पाण्याची लघवी होते . पिष्टमेहाने लघवीच्या वेळी अंगावर रोमांच उभे राहतात व लघवी पाण्यात पीठ मिसळले असता ते जसे पांढर्या रंगाचे दिसते त्याप्रमाणे रंगाची होते . साद्रमेहात गढूळ व दाट लघवी होते . शूक्रमेहांत शुक्रतुल्य लघवी होते . फेनमेहात थोडी थोडी व फेसयुक्त लघवी होते .
आता पित्तप्रमेहाची लक्षणी सांगतो . नीलमेहाने फेसयुक्त , स्वच्छ व नीलवर्ण लघवी होते . हरीद्रामेहाने दाहयुक्त व हळदीप्रमाणे पिवळी लघवी होते . आम्लमेहाने आंबट रुचि व वास आहे अशी लघवी होते . क्षारमेहाने क्षाराच्या पाण्याप्रमाणे लघवी होते . मंजिष्ठमेहाने मंजिष्ठाच्या पाण्याप्रमाणे तांबडी लघवी होते आणि रक्तप्रमेहाने रक्ताप्रमाणे लाल लघवी होते .
आता वातजन्यमेहाची लक्षणे सांगतो . सर्पिर्मेहामध्ये तुपाप्रमाणे स्निग्ध लघवी होते . वसामेहामध्ये वसेप्रमाणे (चर्बीप्रमाणे ) लघवी होते . क्षौद्रमेहात मधाप्रमाणे रुचि व रंग आहे अशी लघवी होते . आणि हस्तिमेहामध्ये मस्त झालेल्या हत्तीप्रमाणे वरचेवर सारखी लघवी होत असते .
प्रमेहाचे उपद्रव -अंगावर माशा फार येणे , आळस , मांसाची वृद्धि होणे , पडसे वरचेवर होणे , अंग शिथिल होणे , अरुचि , अपचन , मळमळणे , ओकारी , झोप फार येणे , खोकला व श्वास हे उपद्रव कफजन्य मेहामध्ये होतात .
वृषणाला भेगा पडणे , बस्तीचा भेद होणे (फुटणे ), शिरन मध्ये टोचणी लागणे , हृदयात दुखणे , आंबट ढेकर येणे , ज्वर , अतिसार , अरुचि , वांती , लघवीवाटे धूर निघाल्यासारखे वाटणे , दाह मूर्च्छा , तहान , झोप न येणे , पांडुरोग आणि मलमूत्र व नेत्र ह्यांना पिवळेपणा हे उपद्रव पित्तप्रमेहामध्ये होतात .
हृदयामध्ये पीडा , सर्व प्रकारचे आंबट , गोड वगैरे पदार्थ खावे असे वाटणे , झोप न येणे , अंग ताठणे , कापणे , लघवीचे वेळी वेदना व मळ अतिशय घट्ट होणे हे उपद्रव वातजन्य प्रमेहात होतात . ह्याप्रमाणे हे वीस प्रमेह त्यांच्या उपद्रवासह सांगितले॥८ -१३॥
प्रमेहपिडका -वसा व भेद ज्याच्या शरीरामध्ये पुष्कळ आहे अशा प्रमेही मनुष्याचे वात , पित्त व कफ हे तीनही दोष रसादि धातुपर्यंत आले असता दहा प्रकारच्या पिडका (पुळ्य़ा ) उत्पन्न करितात . त्या अशा -शराविका , सर्पपिका , कच्छपिका , जालिनी , विनतापुत्रिणी , मसूरिका , अलजी , विदारिका आणि विद्रधिका अशा ह्या दहा पुळ्य़ा उत्पन्न होतात .
जो पुळी शराव्याच्या आकाराची असून मध्ये खोलगट असते तिला शराविका म्हणतात . जी पांढर्या शिरसाच्या आकाराची व तेवढीच बारीक असते तिला सार्षपी असे म्हणतात . जी दाहयुक्त व कासवाच्या पाठीसारखी असते तिला कच्छपिका म्हणतात . जी पुळी तीव्र दाहयुक्त असून मांसाच्या जाळ्यांनी व्याप्त असते तिला जालिनी असे म्हणतात .
जी पुळी मोठी असून नीलवर्ण असते तिला विनता म्हणतात . जी पुळीमध्ये एकटीच मोठी असून नीलवर्ण असते तिला विनता म्हणतात . जी पुळीमध्ये एकटीच मोठी असून तिच्या सभोवार बारीक बारीक दुसर्या पुष्कळ पुटकुळ्य़ा असतात तिला पुत्रिणी म्हणतात . जी पुळी मसुराच्या (एक द्विदलधान्य ) आकाराची असते तिला मसूरिका म्हणतात . जी पुळी तांबुसपांढरी व फार मोठी असून बारीक अशा अन्य फोडांनी व्याप्त असते तिला अलजी म्हणतात . जी पुळी भुई कोहाळ्य़ासारखी वाटोळी व कठीण असते तिला विपारिका म्हणतात . आणि जी पुळी विद्रधीच्या (करटाच्या ) लक्षणांनी युक्त असते तिला विद्रधिका म्हणतात .
जे मेह ज्या दोषापासून झाले असतील त्या दोषांनी युक्त अशा ह्या पुळ्य़ा त्या मेहापासूनच होतात .
गुद , हृदय , मस्तक , खांदे , पाठ व मर्मस्थान ह्या ठिकाणी उत्पन्न झालेली व उपद्रवांनी युक्त अशी पुळी ज्याचा जठराग्नि मंद आहे अशा रोग्याला असल्यास ती बरी होणारी नाही म्हणून सोडावी .
प्रमेहाची पूर्वरूपाची लक्षणे ज्या मनुष्याच्या ठिकाणी आढळतात व लघवी थोडी अधिक होते त्या मनुष्याला प्रमेह झाला आहे असे समजावे . ज्या मनुष्याच्या ठिकाणी प्रमेहाच्या पूर्व रूपाची सर्व अथवा अर्धी लक्षणे असून लघवी फारच अधिक होते . त्यालाही प्रमेह झाला आहे असे सांगावे .
प्रमेहाचे उपद्रव व प्रमेहाच्या पुळ्य़ा ह्यांनी जो मधुमेहाचा मनुष्य व्यापला आहे तो असाध्य समजावा .
मधुमेही मनुष्य मार्गक्रमण करीत असता विसाव्याला स्थान पहात असतो . स्थान मिळाल्यावर बसण्याच्या जागेची इच्छा करितो . बसण्यास जागा मिळाल्यावर निजण्यास अंथरुण इच्छितो व अंथरुणावर पडल्यावर झोपेची अपेक्षा करतो .
पांढरा , हिरवा , काळा , पिवळा व तांबडा ह्या पाच रंगाच्या न्यूनाधिक मिश्रणाने ज्याप्रमाणे शबल (चित्रविचित्र ), बभु्र (पिंगट ) कपिल (कंदीरंग ), कपोत (पारवा ) व मेचक (श्यामवर्ण ) वगैरे अनेक इतर रंग उत्पन्न होतात त्याप्रमाणे दोष , धातु व मल ह्यांचा न्यूनाधिक संचय होऊन त्यांचा संयोग झाला असता अनेक प्रकारचे प्रमेह उत्पन्न होतात .
योग्य उपचार न केल्यास सर्वत्र प्रमेह कालावधीने मधुमेहात रुपांतरित होतात . आणि त्यानंतरही उपचाराची हयगय झाल्यास असाध्य होतात . प्रमेह निदान समाप्त॥१४ -२०॥