सुश्रुत संहिता - विसर्पनाडीस्तनरोगनिदान’’

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


आता ‘‘विसर्पनाडीस्तनरोगनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

त्वचा व मांस ह्याच्या आश्रयाने असलेले वातादिदोष प्रकुपित होऊन सर्वांगावर अव्यवस्थित रीतीने पसरणारी व स्वरलक्षणांनी (त्या त्या दोषांच्या लक्षणांनी ) युक्त अशी , फार उंच नाही अशी त्वरित पसरणारी जी सूज उत्पन्न करितात , तिला ती सर्वत्र पसरते म्हणून ‘‘विसर्प ’’ असे म्हणतात .

वातजन्यविसर्पाची सूज काळसर , मऊ व खरखरीत असते . तिच्यापासून अंग दुखणे , फुटल्याप्रमाणे ठणकणे , टोचल्यासारखे वाटणे , आणि वातज्वरासंबंधी लक्षणे ही होतात . ह्यामध्ये दोष फारच वाढला तर त्याजवर अग्निने भाजल्याप्रमाणे चमत्कारिक फोड उठतात . आणि ते उठले असता ती सूज असाध्य म्हणून सोडावी . (हे वातजन्यविसर्पाचे लक्षण आहे. )

पित्तजन्यविसर्पाची सूज तांबूस रंगाची व जलद पसरणारी असते . तिच्यापासून ज्वर , दाह , सूज पिकणे , तिजवर फोड येणे , फोडल्याप्रमाणे फार ठणका असणे , ही लक्षणे असतात . दोष अत्यंत वाढल्यामुळे त्यातील मांस , तिजमधील मांस व शिरा ह्यांचा नाश झाला व ती काळ्या सुरम्याप्रमाणे दिसू लागली तर ती बरी होणार नाही म्हणून सोडावी .

कफजन्यविसर्पाची सूज सावकाश पसरणारी , उशीरा पिकणारी , स्निग्ध , पांढरी , किंचित वेदनायुक्त व अतिशय कंडूयुक्त असते .

त्रिदोषजन्यविसर्पाची सूज तिन्हीही दोषांच्या रंगांनी व वेदनांनी युक्त व आत मुळे असणारी असते . ही पिकून तिजमधील मांस व शिरा कुजल्या तर ती बरी होत नाही .

ज्याचे वातादिदोष वाढले आहेत . अश मनुष्याला तात्काळ झालेल्या जखमेच्या व्रणात पित्त व रक्त संचित होऊन सूज उत्पन्न करितात , ती काळसर व तांबूस असते . तिच्यापासून अतिशय ज्वर , दाह व पिक्वता ही लक्षणे असून ती हुलग्याएवढ्या काळसर फोडांनी व्याप्त असते . ह्याला क्षतजविसर्प म्हणतात .

वात , पित्त व कफजन्यविसर्प साध्य असते . त्रिदोषजक वा जल आसाध्य असते . पित्तजन्य व वातजन्य विसर्पाची लक्षणे व असाध्यत्व वर सांगितले आहेच . शिवाय कोणतेही विसर्प मर्मस्थांनी असेल तर ते असाध्य समजावे ॥३ -८॥

व्रणाची सूज पिकली असून ती अपक्व समजून जो अज्ञवैद्य तिची उपेक्षा करितो (ती फोडीत नाही ) अथवा व्रणामध्ये अतिशय पू झाला असता तो काढून टाकीत नाही , त्या रोग्याच्या व्रणातील तो त्वचा वगैरे त्या स्थानांचे भेदन करून आत प्रवेश करितो . तो आत फार लांबपर्यंत जातो म्हणून त्याच्या त्या जाण्याला गति म्हणतात आणि ती बारीक नाडीप्रमाणे (नळीप्रमाणे ) आत जाते म्हणून त्याला नाडीव्रण असे म्हणतात .

हा नाडीव्रण वातादि तीन पृथक दोषांनी तीन प्रकारचा आणि त्रिदोषजन्य एक मिळून चार व पाचवा शल्यजन्य (आगंतुक ) असा पाच प्रकारचा आहे .

त्यापैकी वातजन्य नाडीव्रण खरखरीत , सूक्ष्म तोंडाचा शूळयुक्त असून तो विशेषतः रात्री फार वाहतो व त्यातून फेसाळ असा स्राव होतो .

पित्तजन्य नाडीव्रण तहान , व्रणाची जागा तप्त असणे , व्रणात टोचल्यासारखी पीडा , ग्लानी ज्वर व ठणका ह्या लक्षणांनी युक्त असतो . आणि ह्यातून होणारा स्राव पिवळट रंगाचा असून तो विशेषतः दिवसा फार वाहतो .

कफजन्य नाडीव्रण कठीण , किंचित वेदनायुक्त व कंडयुक्त असून त्यामधून होणारा स्राव दाट , पांढरा व बुळबुळीत असून तो विशेषतः रात्री फार असतो .

ज्या नाडीव्रणामध्ये दोन दोन दोषांची लक्षणे दिसून येतात त्याला द्विदोषज नाडीव्रण म्हणावे . ह्याचेही वातपित्तज , पित्तकफज व वातकफज असे तीन भेद आहेत .

दाह , ज्वर , श्वास , मूर्च्छा व तोंडाला कोरड ही लक्षणे ज्या नाडीव्रणामध्ये असतात , त्या कालरात्रीप्रमाणे प्राणनाशक अशा भयंकर नाडीव्रणाला त्रिदोषजन्यनाडीव्रण म्हणावे .

कोणत्याही कारणाने व्रणामध्ये अदृश्य होऊन राहिलेले शल्य त्वरित नाडीव्रण उत्पन्न करिते . त्या नाडीव्रणातून घुसळलेल्या ताकासारखा फेसाळ , स्वच्छ , रक्तमिश्र , उष्ण , वेदनायुक्त व नीलवर्ण असा स्राव वरचेवर होतो ॥९ -१४॥

ज्या कारणांनी जितके नाडीव्रण होतात (म्हणून वर सांगितले आहे ) त्याच कारणांनी स्त्रियांच्या स्तनाच्या ठिकाणी तितके स्तनरोग होतात .

मुलींच्या स्तनांच्या आश्रयाने असणार्‍या धमन्यांची द्वारे (अपूर्णावस्थेमुळे ) संकुचित असतात , त्यामुळे त्यातून दोषांचा शिरकाव होत नाही . म्हणून त्यांना स्तनरोग होत नाहीत . त्याच पुढे मोठ्या होऊन गरोदर व बाळंत होऊ लागल्या म्हणजे त्या धमन्यांची द्वारे विस्तृत होतात . त्यामुळे (त्यात दोषांचा शिरकाव होऊन ) त्यांना स्तनरोग होतात .

आहाराचे पचन होऊन त्यापासून तयार झालेला जो रस त्या रसाचा मधुर असा सत्वरूप भाग सर्व देहातून स्तनात संचित होतो . त्यामुळे त्याला स्तन्य (दूध ) असे म्हणतात .

शुक्र हे देखील सर्व देहव्यापी असून शरीराचा एखादा भाग छिन्न झाला असता त्या ठिकाणी जसे ते दृश्यमान होत नाही , त्याप्रमाणे स्तन्य हे देखील सर्व देहव्यापी असल्यामुळे शुक्रासारखेच आहे , कारण शुक्र हे ज्याप्रमाणे इष्ट स्त्रीच्या दर्शनाने , स्मरणाने तिचा शब्द ऐकल्याने व स्पर्शाने , हर्ष उत्पन्न झाला असता बाहेर पडते , तो हर्ष उत्पन्न होण्याला मन सुप्रसन्न असणे हे मुख्य कारण आहे , त्याचप्रमाणे स्तन्य हे देखील शुक्राप्रमाणे आहार जन्यरसापासूनच उत्पन्न होत असल्यामुळे बालकाच्या स्पर्शाने , दर्शनाने स्मरणाने व घेण्याने शुक्राप्रमाणेच बाहेर पडते . ह्याला बालकावरील निरंतरचे प्रेम हे कारण आहे ॥१५ -२२॥

स्त्रियांचे स्तन्य हे वाताचे दूषित झाले असता तुरट होते व पाण्यावर तरते , पित्तदोषाने दूषित असता आंबट व किंचित तिखट असते , आणि पाण्यात टाकले असता पाण्यावर पिवळट रेषांनी पसरते , कफदोषाने दाट व बुळबुळीत असून ते पाण्यात टाकले असता बुडते , त्रिदोषाने दूषित स्तन्य तिन्हीही दोषांच्या लक्षणांनी युक्त असते . स्तनावर अभिघात झाल्यानेही स्तन्य दूषित होते .

जे दूध पाण्यात टाकिले असता न पसरता तसेच मिळून राहते , वर्णाने पांढरे व मधुर असते , ज्यामध्ये दुसरा रंग मिश्र दिसत नाही , ते स्तन्य (दूध ) निर्दोष समजावे .

स्तने दुग्धयुक्त असोत किंवा दुग्धरहित असोत , त्यांच्या ठिकाणी दोषांचा संचय झाला असता ते त्या ठिकाणचे रक्त व मांस दूषित करून स्तनरोग उत्पन्न करितात .

रक्तविद्रधि सोडून बाकीच्या पाचीही स्तनरोगांची लक्षणे बाह्य विद्रधिच्या लक्षणासारखीच असतात ॥२३ -२७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP