सुश्रुत संहिता - उदरनिदान

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


आता ‘‘उदरनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो , जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे .

धार्मिक लोकात श्रेष्ठ आणि इंद्राप्रमाणे पराक्रमी असे राजर्षि धन्वंतरी हे महर्षि विश्वामित्राचा पुत्र विनयशील शिष्य सुश्रुत त्याला शिकवू लागले .

वातादि तीन दोषांनी पृथक तीन प्रकारची तीन उदरे , चवथे त्रिदोषजन्य , पाचवे प्लीहोदर , सहावे बद्धगुदोदर , सातवे अगांतुक (परिस्रावी ) उदर , आणि आठवे दकोदर (जलोदर ) अशी आठ उदरे आहेत असे वैद्य म्हणतात .

मंदाग्नि मनुष्याने अपथ्यकारक अन्न खाल्ले असता किंवा कोरडे किंवा शिळे आंबलेले अन्न नेहमी खाल्ले असता , तसेच स्नेहपान व वमन विरेचनादि प्रयोग अव्यवस्थितपणाने केले असता वाढलेले वातादि दोष कोठ्यात (आमपक्वाशयात ) शिरून आरंभी गुल्माची लक्षणे व्यक्त करणारी अशी फार कष्टदायक (उदररोग ) उत्पन्न करतात .

उपस्नेहाप्रमाणे (नव्या मातीच्या भांड्यात घातलेले तेल त्यातून जसे सर्व बाजुंनी झिरपते त्याप्रमाणे ) कोठ्यातील दूषित झालेला अन्नरस कोठ्यातून पाझरून बाहेर पडतो . नंतर तो वायुने प्रेरित होऊन अंतर त्वचेला दाबून बाहेरील सर्व भागात पसरतो . अशा रीतीने तो त्या ठिकाणी वाढला असता उदररोग उत्पन्न करितो .

उदराचे पूर्वरूप -उदर होण्यापूर्वी त्या मनुष्याच्या अंगात अशक्तपणा वाढतो . अंगाचा रंग बदलतो . अन्नावर इच्छा नाहीशी होते . पोटात पडणार्‍या वळ्या बंद होतात . पोटावर रेषा दिसू लागतात , खाल्लेले अन्न पचन झालेले कळत नाही . (भूक लागत नाही ) आणि बस्तीमध्ये विदाहयुक्त पीडा होते व पायास सूज येते , ही लक्षणे होतात ॥३ -७॥

ज्या उदरात कुशी , पोट , पाठ व नाभी ह्यांचे ठिकाणी ओढ लागते , पोट मोठे होऊन त्यावर काळ्य़ा शिरा दिसू लागतात , पोटात दुखते , अतिशय फुगते व मोठ्याने वाजते , पोटात टोचल्याप्रमाणे किंवा फोडल्याप्रमाणे पीडा होते इत्यादि लक्षणे होतात त्याला ‘‘वातोदर ’’ असे म्हणतात .

ज्या उदरात पोटाला ओढ लागते , तहान , ज्वर व दाह हे विकार असतात , पोट पिवळे दिसते व पोटावर शिराही पिवळ्या दिसतात , डोळे , मळ , मूत्र , नखे व तोंड ह्यांनाही पिवळेपणा असतो , आणि ह्याची वाढ फार लवकर होते ह्याला ‘‘पित्तोदर ’’ असे म्हणतात .

ज्या उदरामध्ये पोट थंड लागते , त्यावर पांढर्‍या शिरा उमटतात , पोट जड व कठीण लागते , नखे व तोंड ह्यांना पांढरेपणा असतो , पोट स्निग्ध दिसते , त्याला पुष्कळ सूज असते , त्यामुळे त्या रोग्याला ग्लानि येते . ह्याला कफोदर असे म्हणतात . हे फार सावकाश वाढते .

दुर्वर्तनी स्त्रिया पुरुषाने आपल्याला वश होऊन राहावे ह्या हेतूने त्याला अन्नातून नखे , केस , मूत्र , मळ व आर्तव असले अमंगळ पदार्थ खाण्यास , घालतात किंवा शत्रू नाश करण्याच्या हेतूने विष घालतात , अशा कारणाने किंवा वाईट पाणी व दूषी विष खाण्यात आले असता त्यायोगाने रक्त व वातादि तीनही दोष प्रकुपित होऊन भयंकर कष्टप्रद असे त्रिदोषजन्य उदर उत्पन्न करितात . ते गारठा , गार वारा व पावसाळा अशा वेळी फार वाढते व त्यामुळे तो रोगी मूर्च्छित होतो . त्याच्या अंगाचा वर्ण पांढरा होतो . तो कृश होतो . तहानेने कासावीस होतो . ह्याला ‘‘सन्निपातोदर ’’ असे म्हणतात ॥८ -१३॥

आता प्लीहोदर सांगतो . विदाही (जळजळणारे ) व अभिष्यंदी (स्रावकारक ) असे पदार्थ नित्य खाण्यात असणार्‍या मनुष्याचे रक्त व कफदोष अतिशय दूषित होऊन पांथरी वाढवितात . त्याला वैद्य प्लीहोदर असे म्हणतात . ही पांथरी डाव्या कुशीत वाढते . त्यामुळे रोगी विशेष म्लान होतो . आणि अग्नि मंद असून थोडा ज्वर असतो . शिवाय ह्या विकारात कफ व पित्तजन्य अन्य उदरांचीही लक्षणे असतात . आणि तो मनुष्य अतिशय अशक्त पांढुरका होतो .

ह्याचप्रमाणे उजव्या बाजूस यकृत दूषित होऊन वाढले असता त्याला ‘‘यकृदाल्युदर ’’ असे म्हणतात .

बद्धगुदोदर लक्षण - ज्या मनुष्याचे आतडे चिकट अशा अन्नाने किंवा अन्नातून गेलेल्या खड्याने किंवा अन्न व खडे ह्यांच्या काल्याने चोंदते , त्याचा वातादि दोषांनी युक्त असा मळ खाली न सरता मलवाहक स्रोतसांत क्रमाने साठून राहतो . त्यामुळे त्याच्या गुदाचे ठिकाणी मळ कोंडून राहतो व फार कष्टाने थोडा थोडा बाहेर येतो . हे उदर व नाभी ह्यांच्या मध्यभागी वाढते व त्या मनुष्याला मळाच्या दुर्गंधीने युक्त अशी वांति होते . ह्या उदराला ‘‘बद्धगुदोदर ’’ असे म्हणतात .

आता परिस्रावी उदराचे लक्षण सांगतो ते ऐक . अन्नातून गेलेले शल्य (बारीक खिळा , काटा वगैरे ) आतड्यात वाकडेतिकडे शिरल्यामुळे ते आतड्याला भोक पाडिते . त्या छिद्रामधून पाण्याप्रमाणे पातळ असा स्राव होतो व तो पुनः गुदावाटे बाहेर पडतो . हे उदर नाभीच्या खाली वाढते . ह्यामध्ये टोचल्याप्रमाणे अतिशय पीडा होते आणि दाह होतो . ह्याला ‘‘परिस्रावी उदर ’’ असे म्हणतात .

आता जलोदराचे लक्षण सांगतो ते लक्षात ठेव . ज्याने स्नेहपान केले आहे , अनुवासन घेतले आहे , तसेच वमन किंवा विरोचनाने कोठा मोकळा केला आहे अगर निरुहबस्ति घेतला आहे अशा मनुष्याने हे प्रयोग करताक्षणी जर थंड पाणी प्राशन केले , तर त्याची जलवाहक स्रोतसे दूषित होतात . त्यामुळे किंवा जलवाहक स्रोतसे तेलाने माखल्यामुळे वरील परिस्रावी उदराप्रमाणे उत्पन्न होते . ह्या उदरात पोट स्निग्ध व नाभीच्या आसमंतात मोठे असे होते किंवा पाण्याने भरलेली पखाल आतील पाण्यामुळे हलते त्याप्रमाणे त्या रोग्याचे पोट होते व त्यात आवाज होतो त्याला ‘‘दकोदर ’’ (जलोचर ) असे म्हणतात .

उदराचे सामान्य लक्षण पोट फुगणे , चालण्याची शक्ति नसणे , अशक्तपणा , अग्निमांद्य , अंगाला सूज व अंग गळणे , अधोवायू व मलह्यांचा अवरोध , दाह व तहान ही लक्षणे सामान्यतः सर्व उदरात होतात . सर्व उदरे फार वाढली म्हणजे शेवटी जलोदराच्या स्वरूपात येतात . म्हणून अशा रीतीने ज्या उदराचे जलोचर झाले आहे अशी उदरे असाध्य म्हणून सोडावी ॥१४ -२३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP