गीतापद्यमुक्ताहार - अध्याय सातवा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


भगवान् --

माझ्यांत चित्त खिळुनी मम आश्रयाने

हा योग साध्य करिता विजया ! श्रमाने ।

सर्वत्र जाणशिल तू परिपूर्ण माते

ऐसेच मी परिस तत्व कथीन तूते ॥१॥

ज्ञानासवेच तुज आज यथाक्रमाने

विज्ञानही कथिन सर्व परिश्रमाने ।

जे जाणल्यावरि तुला पुढती न काही

जाणावया विषयही उरणार नाही ॥२॥

करीती असे यत्न सिद्ध्यर्थ कोडे

हजारो मनुष्यातही फार थोडे ।

मला तत्त्वता जाणणे ज्यांस जोडे

असे यत्नसिद्धांतही फार थोडे ॥३॥

आकाश तेज धरणी जल आणि वात

होतात त्यांत धरूनी मन बुद्धि सात ।

घाली अहंकृतिपुढे सकलास गाठ

माझीच ही प्रकृति पावलि भेद आठ ॥४॥

ही अन्य ह्या प्रकृतीला अपरा म्हणावे

माझी परा म्हणुनि भिन्न तिला गणावे ।

ती जीवरूप मनुजादि खगा मृगाला

आधारभूत विजया ! सगळ्या जगाला ॥५॥

बा ! ह्या योनींपासुनी सर्व भूत

जन्मा येती सांगतो जाण तूते ।

विश्वाचा मी सर्व उत्पतिकर्ता

तैसा त्याचा मीच संहारकर्ता ॥६॥

माझ्याहुनी अल्पहि भिन्न काही

पार्था ! नसे या जगतात पाही ।

माझ्यात हे ओवुनि सर्व पाहे

सूत्रांत सारे मणि जेवि पाहे ॥७॥

पाण्यात जो तो रस अर्जुना ! मी

चंद्रात सूर्यात असे प्रभा मी

ओंकार वेदांत नभांत मीच

जो शब्द तो शौर्य नरात मीच ॥८॥

पृथ्वीमधे मी धरि पुण्यगंध

अग्नीमधे तेजहि मी सबंध ।

भूतांत मी जीवन सर्व जाण

की तापसी मी तप हे प्रमाण ॥९॥

सार्‍या भूती बीज जे का पुराणे

पार्था ! तेही मीच हे नीट जाणे ।

बुद्धीही मी बुद्धिमंतात राहे

तेजस्व्यांचे तेज ते मीच आहे ॥१०॥

मी तो सशक्तांतहि शक्ति पाहे

सोडोनि तृष्णा अभिलाष बा ! हे ।

भूतांत धर्मा अविरूद्ध काम

पार्था ! असे तो तरि मीच ठाम ॥११॥

तैसे तमःसत्वरजादि भाव

माझेच ते सर्व मनांत ठेव ।

त्यांच्यांत नाही परइ मी प्रमाण

माझ्यामध्ये नाहीत तेहि जान ॥१२॥

भावांनी तो त्रिगुणमय ह्या मोह घालूनि बा ! रे !

भ्रांतीमध्ये बुडवुनि पहा टाकिले विश्व सारे ।

तेणे कोणा स्वरूप मम नाकळे एक सार

की मी ह्यांच्याहुनिही परता आणे मी निर्विकार ॥१३॥

माझी अशी गुणमयी बहु दिव्य माया

आहे महा कठिण फार तरून जाया ।

जे जे मला भजति भक्ति धरून फार

मायेस तेच तरुनी पडतात पार ॥१४॥

जे का कृतीने बहु नीच दुष्ट

मायेमुळे यन्मति होय नष्ट ।

दैत्यस्वभावात सदा रहाते

ते मूढ लोकी भजती न माते ॥१५॥

जे जे माते सुकृति भजती अर्जुना ! फार फार

त्यांच्यामध्ये सतत दिसती भेदही स्पष्ट चार ।

अर्थी ज्ञानी भजति मजला आर्तही स्वीय अर्था

जिज्ञासूही धरुनि अवघे चार पार्था  ॥१६॥

ज्ञानी तयांमाजि खरा वरिष्ठ

जो भक्ति माझी करि एकनिष्ठ ।

मी जीव की प्राण असे तयाते

तोही गमे जीव तसाच माते ॥१७॥

सारेच हे जाण उदार नामी

ज्ञानी मदात्मा परि मानितो मी ।

तो मानुनी सद्गति मीच राहे

माझ्यामधे चित्त समग्र वाहे ॥१८॥

झाल्यावरी जन्म अनेक त्याते

ज्ञानी भजे भक्ति धरून माते ।

सर्वत्र पाहे मग वासुदेव

ऐसा महात्मा मिळणे सुदैव ॥१९॥

इच्छा ज्यांच्या हरण करूनी ज्ञान नेतात सारे

ते ते देवा भजति जनही भिन्न भिन्न प्रकारे ।

त्यांचे त्यांचे व्रतनियमही घालुनी होति बद्ध

ऐसे आत्मप्रकृतिवश ते होत की अप्रबुद्ध ॥२०॥

जो जो ज्या ज्या मूर्तिचा होय भक्त

पूजायाही इच्छितो भक्तियुक्त ।

त्याच्या त्याच्या देवतेमाजि इष्ट

देतो श्रद्धा त्यास मी एकनिष्ठ ॥२१॥

तच्छ्र्द्धेने युक्त तोही सदैव

होवोनिया पुजुनी इष्ट देव ।

केलेल्या मी कामनेच्या फला तो

त्याच्या देवापासुनी नित्य घेतो ॥२२॥

ही जी फळे मिळवितो जन अप्रबुद्ध

ती नाशवंत समजे असतात शुद्ध ।

देवाकडेच अपल्या जन तेहि जाती

मद्भक्त ते मजकडे सुखरूप येती ॥२३॥

मी तो निराकार अनादि सिद्ध

साकार की मानिति अप्रबुद्ध ।

मी भिन्न अत्त्युत्तम वस्तु नित्य

ऐसे तयांना न कळेच सत्य ॥२४॥

मला झाकुनी टाकिते योगमाया

म्हणोनी पहा मी दिसेना जना या ।

जगी जन्म की मृत्यु नाही विलोक

अशा हे मला नेणती मूढ लोक ॥२५॥

पूर्वी जी जी गेली लयास

किंवा पार्था ! वर्तती आज त्यास ।

होणारी मी जाणतो सर्व भूते

कोणी प्राणी मात्र जाणे न माते ॥२६॥

इच्छाद्वेषांपासुनी सव्यसाची

द्वंद्वे होती सर्व दुःखासुखाची ।

त्यांच्या मोहे जन्मकाळी भुलून

जाती भूते सर्वही गोंधळून ॥२७॥

पुण्यामुळे सत्वर सव्यसाची

पापे जळाली सगळी जयांची ।

ह्या द्वंद्वमोहातुनि ते ! सुटून

माते जगी या भजती झटून ॥२८॥

जरा मृत्युच्या यत्न जे की भयाने

करीती सदा माझिया आश्रयाने ।

कळे त्यांजला ब्रम्ह अध्यात्मकर्म

पुरे जाणती तेच की सर्व कर्म ॥२९॥

साधिभूत साधिदैव साधियज्ञ मी असा

ज्याचिया मनावरी उठेल नीटसा ठसा ।

चित्त अर्पुनी मला मनांत नित्य आणतो

अंतकालि तो मला सुजाण जाण जाणतो ॥३०॥

सातवा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP