गीतापद्यमुक्ताहार - अध्याय पाचवा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


अर्जुन --

सांगूनिया कर्मसन्यास आधी

योगालाही बोलशी तूच साधी ।

दोहीमाजी कोण कल्याणकारी

सांगे माते निश्चयाने मुरारी ॥१॥

भगवान --

संन्यास की सदैव जाण

कल्याणकारी असती प्रमाण ।

विचारितोसी जरि कोण इष्ट

दोहीमधे योग असे वरिष्ठ ॥२॥

इच्छा किंवा द्वेष नाही जयास

संन्यासी तो नित्य हे जाण खास ।

होतो द्वंद्वे सोडुनी योगयुक्त

पार्था ! होतो तो सुखबंधमुक्त ॥३॥

हा सांख्य हा योगहि भिन्न जात

अज्ञांत हा भेद न पंडितात ।

एकाश्रये की मिळतात लोकी

दोन्ही फळे निश्चित हे विलोकी ॥४॥

की सांख्यांना स्थान जे प्राप्त होते

योग्यांच्याही तेच वाट्यास येते ।

सांख्या योगा पाहयो ऐक्यभावे

पार्था ! त्याला युक्तनेत्री म्हणावे ॥५॥

संन्यास हा फार दुर्लभ आहे

योगाविणे निश्चित प्राप्त नोहे ।

ह्या कर्मयोगे मुनि जो रहातो

तो सत्वरी ब्रम्हपदासि जातो ॥६॥

जो योग असूनी बहु चित्तशुद्ध

होतो जितेंद्रिय मनास करूनि बद्ध ।

जो आत्मवत्सकलजीव सदैव पाहे

कर्में करूनि जन तोच अलिप्त राहे ॥७॥

स्पर्शूनि ऐकूनि बघूनि खातो

घूनि निद्रा फिरण्यास जातो ।

घे वास की श्वास परी सदाही

ज्ञाता म्हणे मी न करीच काही ॥८॥

देणे घेणे बोलणे दूर जाणे

की नेत्राची पापणी हालविणे ।

आहे सारे इंद्रियांचेच कृत्य

मानोनिया चालतो हेच नित्य ॥९॥

कर्में करी सोडुनि सर्व आस

ब्रम्हांत अर्पी न शिवे फलास ।

अलिप्त पापातुनि तो पवित्र

जैसे जली निर्मल पद्मपत्र ॥१०॥

देहाने वा बुद्धीने वा मनाने

सोडोनिया वासना इंद्रियाने ।

कर्में सारी संग सोडोनि भावे

हेतू हा की चित्त शुद्ध व्हावे ॥११॥

टाकूनिया कर्मफलास योगी

लोकी सुखाने चिर शांति भोगी ।

अज्ञान आशा धरि थोर जो तो

नादे फलाच्या जन बद्ध होतो ॥१२॥

ही सर्व कर्मे त्यजुनी मनाने

घेवोनि संन्यासहि कौतुकाने ।

राहेनवद्वारपुरीत देही

हस्ते करी ना करवी न काही ॥१३॥

कर्मे किंवा लोककर्तृत्व काही

ही केव्हाही ईश निर्मीत नाही ।

केले त्याने हे फलाचे न भोग

हा तो आहे सृष्टीसंसारयोग ॥१४॥

कोणाच्याही पातका ईश नेघे

झोंबाडीना पुण्यही फार वेगे ।

अज्ञानाने वेष्टिले ज्ञान बा ! रे !

त्याच्या योगे मोहती लोक सारे ॥१५॥

ज्ञानाने ज्या जाय अज्ञान ज्यांचे

बा ! ते आत्मज्ञान लोकी तयांचे ।

होवोनिया व्यक्त सूर्यासमान

दावी पार्था ! आत्मरूपास मान ॥१६॥

आत्मज्ञानी चित्त निष्ठा मतीही

आत्मा त्यांच्या त्यांत रंगून राही ।

ऐसे जे ते पावती मोक्ष बापा

ज्ञानाग्नीने जाळुनी सर्व पापा ॥१७॥

विद्वानाते सह्गुणी माणसाते

विप्राते वा धेनुते कुंजराते ।

श्वानाते की शुद्ध चांडाल जात ।

ज्ञाते सर्वां सारखे पाहतात ॥१८॥

सर्वात ज्याचे सम चित्त भारी

स्वर्गस्थ तो की जरि देहधारी ।

ते ब्रम्ह निर्दोष समान आहे

ब्रम्हामध्ये ह्यास्तव तोहि राहे ॥१९॥

हर्षेना जो प्रिय विषयही प्राप्त झाले तथापी

कष्टी नोहे हृदयकमळी अप्रिये जो कदापी ।

मूढत्वाते ग्रहण करिना ठेवितो स्थीर चित्ता

ब्रम्ही राहे सतत विजया ! जाण तो ब्रम्हवेत्ता ॥२०॥

जो बाह्य सौख्यास नसेच लिप्त

आत्मस्वरूपीच सदैव तृप्त ।

तो ब्रम्हयोगी समजे महात्मा

सौख्यात राहे चिर की तदात्मा ॥२१॥

सकल विषयसौख्ये भासती जी जनास

घडि घडि बहु देती दुःख ती मानसास ।

सतत दिसत आहे त्यांजला आदि अंत

म्हणुनि विबुध पार्था ! मग्न होती न त्यांत ॥२२॥

कामक्रोधापासुनी वेगराशी

येती त्या जो मृत्युआधीच सोशी ।

जाणावा बा ! तोच की सिद्ध योगे

सौख्यातही अर्जुना ! तोच भोगी ॥२३॥

जो आत फारच सुखी रमतोहि आंत

ज्याच्या प्रकाश पडला बहु अंतरात ।

ब्रम्हस्वरूप बनुनी मग तोच योगी

निर्वाणिचे पद सदैव सुखांत भोगी ॥२४॥

सार्‍या जिवाचे हित साधतात

निष्पाप बुद्धि स्थिर ठेवितात ।

निर्द्वंद्वचित्ते मुनि जे रहाती

ते ब्रम्हनिर्वाणपदासि जाती ॥२५॥

कामक्रोध त्यजुनि हृदयी ठेवितो जो विरक्ती

चित्तालाही स्ववश करितो दाउनी योग्य युक्ती

राहो जावो शरिर तरि तो ह्याच की अन्य लोकी

आत्मज्ञानी सतत विजया ! मुक्त आहे विलोकी ॥२६॥

सकलविषय जे हे बाह्य बाहेर ठेवी

नजर भृकुटिमाजी मध्यभागात लावी ।

सम करुनि अपान प्राण वायूस घेतो

अति चतुरपणाने नासिकी वाहवीतो ॥२७॥

बुद्धींद्रिये जिंकुनि चित्त दावी

मोक्षाकडे जो लय सर्व लावी ।

इच्छा भय क्रोध नसेच ठावा

तो सर्वदा मुक्त मुनी म्हणावा ॥२८॥

भोक्ता आहे मीच यज्ञा तपाचा

ब्रम्हांडाचा ईशहि मीच साचा ।

की सर्वांचा मी सखा ज्यास ठावे

मोठी शांती अर्जुना ! तोच पावे ॥२९॥

पाचवा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP