लक्ष्मणहंसाख्यान - नारायणहंस अग्रगण्य

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति, युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे. 

जय जय सदगुरु करुणाकरा । आम्हा अनाथांचिये माहेरा । अवतार धरिसी जगदुद्वारा । नातरी तूं अमूर्ति ॥१॥

शिष्याचिये कळवळियासाठीं । नामरुपाची तुज राहाटी । शेखीं साम्राज्याचिये बैसवी पटीं । नामरुपचि तुझें ॥२॥

सर्व लक्षणेंसी अलंकृत । तेंचि लक्ष्मण नाम हें विख्यात । जेणें स्मरण मात्रें असंख्यात । परपार पावती ॥३॥

असो वसमतीमाजीं असतां । जन उध्दरती प्रपंची वर्ततां । तेथेंचि मातापिता उभयतां । गेले देह विसर्जुनी ॥४॥

पुढें स्त्रीपुरुष असती उभयतां । यथारीती प्रपंच सारिती तत्त्वतां । एक शिष्य नारायणनामें घेता । जाला उपदेश ॥५॥

परी लक्ष्मणहंस वसमतींतुन । निघोनि शेवाळिया राहती जाउन । सरदेशपांडेगिरीचें उपजीवन । असे प्रपंचासी ॥६॥

मार्तंडराव एक गृहस्थाश्रमी । राहत असती वसमतीग्रामीं । तयासिहि खुणा अनुक्रमी । परमार्थाच्या सांगितल्या ॥७॥

कृष्णराव एक उपदेशिला । नारायण कोमटिया मंत्र दिधला । आणिकली कित्येकांसी बोध केला । न पाहती परकी स्वकीय ॥८॥

एक अंबी नामाची उपदेशिली । ते सगुणसाक्षात्कारा पावली । मारुतीची मूर्ति खेळूं लागली । तिच्यापुढें सर्वदा ॥९॥

कवणाचें कांहींच न घ्यावें । आपुल्या उपजीवनांत सर्व करावें । यश औदर्य तिष्ठतसे स्वभावें । द्वारपाळ जैसे ॥१०॥

शिष्यवर्गीं कांहीं पुढें ठेवितां । प्रसाद म्हणउनी देती मागुता । कोणासी ओझें न घालिती तत्त्वतां । कठिण आज्ञाहि न करिती ॥११॥

जानकीबाईनेंही उपदेश घेतला । अधिष्ठान ओळखी झाली तिजला । धाकूटी बहीण बजाबाईला । मंत्र दिधला असे ॥१२॥

अधिकारी अथवा अनधिकारी । उपेक्षिले न वचे कोणी तरी । कर्म उपासना ज्ञान निर्धारी । ज्या त्यापरी उपदेशिती ॥१३॥

ज्ञाता जरी एखादा मिळे । तेणेसी संवादसुखाचे सोहळे । साधकांसी तो जेवी वोळे । कृपाजळघन ॥१४॥

मुमुक्षूते आवडती साधन । मानेल तैसें श्रवण मनन । उपासकांसी उपासन । दृढीकरण आवडीचें ॥१५॥

अधिकार जरी नसे चित्तीं । तयासी प्रस्तावा घालिती । अनुताप उपजे सहजगती । परी जया चाड ॥१६॥

प्रापंचिकांसी प्रपंचज्ञान । यथायुक्त उपदेशिती राजकारण । भेटती जरी विषयी दुर्जन । त्यांसीहि क्षणभरी मिळावें ॥१७॥

पोरा ऐसें पोरांत खेळावें । कामुकामाजींहि मिळून जावें । जयासी काम्यहि वाटे त्यागावें । तया प्रस्ताविती अधिक ॥१८॥

कवणासिहि ऐसें न वाटे । कीं आपण ययासी न बोलावें ओठें । जयाचें जैसें मनीं उठे । तेंचि गोमटें करावें ॥१९॥

इतुकें करुनिया आपण । सहजीं सहजत्त्वें परिपूर्ण । परी साधुत्त्वाचें ढोंग मिरवण । नाहीं जनीं ॥२०॥

नाहीं टिळें माळा कीं भगवें । नलगे ध्यान धारणादि लोकां दावावें । नलगे प्रौढपणे किमपि शिकवावें । अमुक कराच म्हणोनी ॥२१॥

कर्मियासवें कर्मचि करावें । भजकासवें भजूं लागावें । पूजकासवें आपणही पुजावें । प्रतिमादिक ॥२२॥

मुमुक्षू साधकांची तो जननी । बोधबाळका वाढवी अनुदिनीं । परी तें न कळे अन्यां लागोनी । परीक्षक निवडिती ॥२३॥

येर प्रापंचिकांसी वाटावें । कीं आम्ही जैसे प्रपंची स्वभावें । त्याच रीती वर्तणें असें बरवें । तरी विशेष काय ॥२४॥

मंदभाग्या जेवीं परिस लाहे । परी लोहो लावून न पाहे । सुपारी फोडूनि फेकिताहे । परीक्षेवीण ॥२५॥

तैसे अनधिकारी दैवहीन । अव्हेरिताती प्रापंचिक म्हणुन । असो जयाचा भाग्योदय पूर्ण । तयासी ज्ञान लाभे ॥२६॥

हें घेणारापासीं सर्व असे । विचारवंत उकरुन काढितसे । तें इतरांचे हातां ये कैसें । जैसें पाषाणीं रत्न ॥२७॥

कितेक तो उपेक्षून जाती । कितेक तो निंदेसी प्रवर्तती । कित्येक स्तवूं ही जरी येती । परी ते सर्व सारिखे ॥२८॥

देह प्रारब्धाचा भोग जैसा । यथाप्राप्त भोगिताति तैसा । हर्ष किंवा खेदाचा ठसा । नसे किमपि ॥२९॥

विपत्ति तैसी संपत्ति । वांझपण तैसी संतती । जय तैसी पराभिभूति । एकट स्थिति ते जनीं ॥३०॥

परी हें बरें जालें हें वाइट असे । अन्या बोलोनि दाविती ऐसें । परी अंतरीं हर्षखेदाचा नसे । लवलेश तिळभरी ॥३१॥

ते स्थिति ज्याचा तोचि जाणे । येरा न कळती युक्तिअनुमानें । मर्कटा नारिकेळ काय होणें । तैसें अप्राप्त समस्तां ॥३२॥

असो जयाचें दैव उदेलें । तयासीच हें ज्ञान प्राप्त झालें । येर सन्निधचि चुकले । गोचिड जैसें ॥३३॥

दधि मधु आणि पृथ्वीचें जीवन । जो चातक त्यागी त्यासी वर्षे घन । तैसें अन्य पाषांडे अव्हेरुन । येईल तया ज्ञानप्राप्ति ॥३४॥

असो एक नारायणहंस । ग्रहण करिता झाला सर्व रस येरां उरला असे मात्र बाकस । बुध्दिचिया भ्रमें ॥३५॥

नारायणा जे पूर्णता बाणली । ते न वचे वाणीसी वर्णिली । तथापि यथामति वर्णन केली । स्थिति सप्तमाष्टकीं ॥३६॥

अनंत लीला लक्ष्मणहंसांची । तितुकी मज बोलवेल कैची । परी आवडली ते यथारुचि । वर्णन केली ॥३७॥

द्रव्याचे भांडारे भरले । त्या ढिगावरी चिमणें बाळ सोडिलें । दोन सुष्टी भरुनि संतोषलें । तयाचिये परी ॥३८॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । लक्ष्मणहंसाख्यान निगुती । अष्टम प्रकरणीं ॥८॥

एकंदर ओ . सं . ३२३ .

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP