श्री लक्ष्मणहंसानें स्वप्न देखतां । विस्मित होत्साता चित्ता । भेटीसी येता झाला तत्त्वतां । नागनाथ हंसांचे ॥१॥
सन्मुख पाहतांचि तया क्षणीं । यावें यावें दिवाणजी म्हणोनी । बोलतां येरु साष्टांग धरणीं । अत्यादरें केला ॥२॥
मग नागनाथहंसें उठविलें । आपुलें सन्निधान बैसविलें । म्हणती काय हो स्वप्नीं देखिलें । सांगितलें काय तातानीं ॥३॥
ऐसें उत्तर ऐकता क्षणीं । बोलता झाला वंदूनि चरणीं । सर्व ठाउकेचि महाराजालागुनी । म्यां काय निवेदावें ॥४॥
तरी आतां मज उपदेश द्यावा । तत्क्षणीं मंत्र सांगितला तेव्हां । पुढें हळु हळूं स्वानुभवा । उपदेशिते जाले ॥५॥
परी अखंड गुरुसेवा करावी । राजकारणासी उणीवता यावी । तेणें गणपतरायासी खंती वाटे जीवीं । म्हणे आम्हां सोडूं पहासी ॥६॥
असो ऐसें तीन वर्षे लोटले । गणपतरायाचें काम निघालें । तेणें काशीसी गमन आरंभिलें । नेलें सांगातीं दिवाणजीसी ॥७॥
परी महाराजगुरुचा वियोग । तेणें अंत :करण जालें भंग । तयासी स्पष्ट सांगोनि मग । आले परतोनी गुरुपाशीं ॥८॥
पुढें नव वर्ष गुरुसन्निधान । राहिले असती सेवा करुन । उदभवतें जालें स्वानुभवज्ञान । तेंचि अल्पसें बोलिजे ॥९॥
दिवाणजीनीं एक सुदिनीं । विनविलें असे कर जोडुनी । देव कोण मी कोण मज लागोनी । सांगितलें पाहिजे ॥१०॥
देव वेगळा मी वेगळा असे । कीं एकरुपचि असें हें कैसें । एकरुप तरी दाखवावें अपैसे । निजरुप मजला ॥११॥
प्रश्न ऐकतांचि संतोषले । म्हणती सांगूं एकाग्र पाहिजे ऐकिलें । तुझें देवाचें एकरुप असे संचलें । बोले निगम ॥१२॥
तें कधींहि भिन्न जालें नाहीं । तया जन्ममरणही नसती कांहीं । अज्ञानभ्रांतीनें पडिलें प्रवाही । कल्पनागुणें ॥१३॥
मी देह मजसी बंधन । मजचि पाप पुण्य क्रियमाण । ऐसें मानुनी पावला जन्ममरण । परी हें सत्य नव्हे ॥१४॥
असो आतां तुझेंचि तुज । निजरुप दाखविजे सहज । जेथें वाणीमनासी नसे काज । तेचि चोज ज्याचे त्या ॥१५॥
हा देह जयावरी दिसे । जयाच्या योगें चलन होतसे । परी तो देह ऐसा कदा नसे । तोचि आत्मा अंगें ॥१६॥
हे दहाही इंद्रिय तुजवरी । व्यापारती विषयव्यापारीं । सत्ता स्फुरतां तुझिया माझारीं । परीं तूं नव्हेसी यां ऐसा ॥१७॥
हे प्राण चळती देहा आंत । तूंचि अधिष्ठान या समस्तांत । परी याचे विकार तुज न स्पर्शत । तूं अविनाश आत्मा ॥१८॥
हें एकचि अंत :करण चतुर्धा जालें । मनबुध्द्यादिरुप विकारलें । सच्चिद्रूपें तुझें रुप यांत व्यापलें । परी तूं निर्विकार ॥१९॥
एक दृष्य एक भास । या ओळखीं देहद्वयास । बोलिजे दोहीचिये व्यापारास । जागृतिस्वप्नें ॥२०॥
त्त्वां आपुलें निजरुप नेणोनि । स्वीकारिलें मीच हे म्हणोनि । तेचि जाणावे दोनी अभिमानी । विश्व आणि तैजस ॥२१॥
आतां आपुलें निजरुप ओळखीं । देहद्वय असती पारखी । तूं सच्चिद्वन अससी सुखी । अभिमान त्यागितां ॥२२॥
अंत :करणादि देहापर्यंत । तूं साक्षित्त्वें अससी जाणत । दिसतें भासतें तितुकें समस्त । मिथ्या मृगजळापरी ॥२३॥
विकारसाक्षी विकारा वेगळा । निर्विकार अससी सहज निर्मळा । तुजसि स्पर्शला नाहीं हा सर्व मेळा । तो पाहे स्वलीळा तोचि तूं ॥२४॥
तंव दिवाणजी म्हणे मी देहातीत । स्फुरणामाजीं साक्षित्त्वें उमटत । हें प्रत्यक्ष अनुभवा असे येत । विकारांमाजीं ॥२५॥
परी विकारारहित जो अविनाशी । स्फुरणेंविण जो मी एकरसी । तो मी मज न ये अनुभवासी । हें कैसें निरोपावें ॥२६॥
तंव बोलती सदगुरुनाथ । तूं लयासी जाणसी समर्थ । परी मी नेणे जें ह्मणसी व्यर्थ । हेंचि अज्ञान बापा ॥२७॥
तूं जाणसी या अज्ञाना । मी नेणे या धरिलें अभिमाना । हाचि प्राज्ञ परी देखणा । अससी तूं लयसाक्षी ॥२८॥
सर्व पदार्थ असतां देखसी । ते नासतां त्याचिया लया जाणसी । तोचि तूं कैसा जरी म्हणसी । तरी अवधान देई ॥२९॥
सुषुप्तिमाजीं कीं संधी आंत । वृत्तीसहित सर्वांचा घात । जाला हें तूं अससी जाणत । सामान्य प्रकाशें ॥३०॥
अमुक वेळ लय होता जाला । ऐसा स्फुरण उदभवतां तुज कळला । तेथें जाणिलें नसतां आठव कोणाला । होय हें पाहें विचारोनी ॥३१॥
वृत्तिकाळीं वृत्तींतील जाणता । उभययोग साक्ष्यसाक्षी उमटतां । जाणणें घडे परी तें जाण तत्त्वतां । विकाररुप मिथ्या ॥३२॥
वृत्तीचा लय वृत्ति न पाहे । तो लयसाक्षी एकचि आहे । डोळा जैसा पदार्थातें पाहे । आणि देखे अभाव ॥३३॥
वृत्तिकाळीं वृत्तीनें जाणे । वृत्तीचा अंत पाहिला जेणें । तोचि तूं अविनाश पूर्णपणें । स्वानुभवें समजे ॥३४॥
ऐसें गुरुवचन बिंबतां अंत :करणीं । लयसाक्षित्त्वासी जाली मिळणी । विकार निमाले सर्वही ते क्षणीं । ज्ञप्ति ज्ञप्तिपणें उरे ॥३५॥
देह जाला काष्ठवत । नेत्र वातें झाले निवांत । हे देखोनी सदगुरु म्हणत । यासी स्वानुभव आला ॥३६॥
हाचि निर्विकल्पाचा स्वानुभव । यासी चिरकाळ घेउ द्यावा सदैव । पुढें सहजस्थितीचा स्वयमेव । उपदेश करु ॥३७॥
मग थापटूनि उठविलें । म्हणती तुझें तुवां रुप अनुभविलें । आतां तुवां पाहिजे गेलें । वडिलाचे सेवेसी ॥३८॥
लक्ष्मणहंस म्हणे मी न जाय । कदापि न सोडी हे पाय । तंव गुरु म्हणती माझें रुप काय । आत्मयाविण असे ॥३९॥
तूं जयाचा अनुभव घेसी । तोचि मी गुरु कीं अविनाशी । तरी वियोग कोठें सांग मजसी । तेथें राहे जाय वेगीं ॥४०॥
मग आज्ञा वंदोनी सत्त्वरगती । निघाले ताताचे भेटीप्रति । एक अश्व मनुष्य घेतलें सांगाती । चालिले खोलापुरा ॥४१॥
मार्गामध्यें जाता क्षणीं । एक अदभुत वाटलें मनीं । कीं भेटी जालिया जनकजननी । व्यापारासीच लाविती ॥४२॥
तया व्यापारामाजीं एकरसें । निवृत्तिसुख अनुभवावें कैसें । हें नको आतां प्रवृत्तीचें पिसें । निवांत असावें एकट ॥४३॥
मग अश्वाहुनी उडी टाकिली । धोत्रें फाडून कौपीन घातिली । रक्षा लावूनि सर्वही त्यागिलीं । वस्त्रपात्रादिक ॥४४॥
मनुष्यासी ह्मणती तुवां जावें । मी गेलो म्हणोन सर्वां सांगावें । इतुकें बोलुनी परतले स्वभावें । मार्गही सोडुनी ॥४५॥
मागुती विचार केला चित्ता । कीं गुरुसन्निधान जरी जातां । कोपोनि अव्हेरितील तरी आतां । अरण्यामाजीं रहावें ॥४६॥
नंतर दूर अरण्यामाजी गेले । तों एक स्थळ अपूर्व देखिलें । कोणी मनुष्य नसतां रम्य असे वहिलें । देउळ लखमादेवीचें ॥४७॥
देऊळ असे माळावर । तळीं नदीही सुंदर । आणि लागले दिव्य तरुवर । निंबआदि करोनी ॥४८॥
त्या देउळीं स्नान करोनि बैसावें । निंबपत्रें वांटोनि खावें । सर्वदा स्वरुप अनुभवावें । दुजा व्यापार असेना ॥४९॥
कदाचित वृत्ति उदभवली । तरी ते मननीं लावावी वहिली । पुन्हां ज्ञप्तिरुप राहे संचली । अभ्यासबळें ॥५०॥
ऐसा कांही एक काळ लोटला । खावोनि रहावें लिंबाचा पाला । तेथें एक भाविक आला । म्हणे चला भोजनासी ॥५१॥
तंव म्हणती न येऊं आम्ही । येरु म्हणे सिध्दान्न सेवीत जावें तुम्ही । मी मधुकरी मागून आणिन ग्रामीं हें तरी स्वीकारावें ॥५२॥
मग आणितसे मधुकरी । उभयतां भोजन करिती निर्धारी । परी तो जाय ग्रामामाझारीं । आपण एकटची रहाती ॥५३॥
एके दिनीं मनीं आठवे । कीं याचे कां व्यर्थ कष्ट घ्यावे । आपणचि स्वतां मधुकरीस जावें । मग जाती तैसेंचि ॥५४॥
उभयतांही सारिती भोजन । नंतर मिळूं लागले ब्राह्मण । मग उभयतांही मधुकरी आणुन । सर्वां भोजन घालिती ॥५५॥
भोंवतीं गांवें जे जे असती । नित्य जावें एका ग्रामाप्रति । सर्वांचें भोजन जाल्यावरुती । राहूं न द्यावें कवणासी ॥५६॥
आपण एकटचि आसनीं बैसावें । सदा ब्रह्मानिभवीं समरसावें । ऐसे कित्येक दिवस लोटावे । तया स्थळावरी ॥५७॥
आतां पुढील कथेचें अनुसंधान । यथामति बोलेल बाळ चिमण । तेंचि ऐकती श्रोते सज्जन । जे जे श्रवणार्थी ॥५८॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । लक्ष्मणहंसाख्यान निगुती । पंचम प्रकरणीं ॥५॥