लक्ष्मणहंसाख्यान - उपदेश

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति, युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे. 

श्रीमत्सदगुरुलक्ष्मणहंसांची । सहज राहणी होय जे साची । ते पाहोनिया इतर जनांची । पालटे चित्तवृत्ति ॥१॥

असो वसमतीमाजीं असतां । प्रपंच परमार्थ चालती उभयतां । परी लग्न न करिती सोइरिकी येतां । तेणें उदास माधवराव ॥२॥

तया वसमतीमाजीं सिध्द पुरुष । तो स्थितीनें परम विशेष । आला कोण कोठील कवण अशेष । न कळे वर्तमान ॥३॥

रामचंद्रबावा म्हणती नांवे । सदा तरी तळियावरि बैसावें । माध्यान्हीं गांवांत येऊनि अन्न खावें । कोणी संतोषें घालितां ॥४॥

रात्रि लोटिलीया दोन प्रहरीं । यावें लक्ष्मणहंसांचें मंदिरीं । संवाद करावें बैसोनि शेजारीं । अरुणोदय होतां जाय ॥५॥

ऐसा प्रतिदिनीं नेम चालत । संवादसुखें उभयतां तृप्त । परी अन्य कवणासीही न बोलत । बोले तरी वेडिया ऐसा ॥६॥

असो लक्ष्मणहंसें व्यवसाय दिवसां । करीत जावा निशींत संवाद ऐसा । प्रसंग लोटला बहुतेकसा येणेंचि रीती ॥७॥

परी लग्न सहसा न करिती । माधवराय तळमळी चित्तीं । बोधही करितसे अहोराती । परी आग्रह हा न जाय ॥८॥

मग परभारें लक्ष्मणहंसा न कळतां । तेथील देशमुखाची पाहिली दुहितेची दुहिता । लग्नहि नेमिलेंसे तत्त्वतां । साहित्यही परभारा केलें ॥९॥

आयते समयीं ग्रामांतील जन । इष्टमित्रही सर्व मेळऊन । करिते जाले सीमांतपूजन । तेव्हां प्रगटलें ॥१०॥

लक्ष्मणहंस म्हणती सर्वत्रांसी । हें काय आरंभिलें न कळतां मजसी । मज विवाह करणें नाहीं मानसीं । तरी बलात्कार कां करितां

॥११॥

मग सर्वीं अनेक रीती सांगोन । बलात्कारें लाविलें लग्न । जानकाबाई तिचें अभिधान । परम सती पतिव्रता ॥१२॥

असो विवाह तरी जाला । परी प्रशस्त न वाटे हंसरायांला । कधीं नोवरी न पाहती दृष्टीला । सदा एकांत आवडे ॥१३॥

रामचंद्रबावा रात्रीं येती । तयासी चर्चा करीत असती । ऋतु प्राप्त जानकीबाईप्रति । परी न करिती फळशोभन ॥१४॥

माधवराय म्हणे कैसें करावें । याचें चित्त कैसें वळावें । येसूबाइही तळमळे जीवें । परी उपाय चालेना ॥१५॥

मग माधवरायें काय केलें । नागनाथहंसांसी पत्र लिहिलें । साकल्य वर्तमान निवेदिलें । पाठविलें उमरावती ॥१६॥

तें पाहोनी नागनाथहंसें । खेद मानोनिया मानसें । दोघे शिष्य धाडिले तयासरिसें लक्ष्मणहंसांकडे ॥१७॥

पत्रदर्शनीं भेटीस यावें । किमपि विलंबासि न करावें । ऐसी आज्ञा येतांचि निघती स्वभावें । मार्गी उमरावतीचे ॥१८॥

दर्शन होतांचि साष्टांग घातिलें । तंव कोपें गुरुराज बोलते झाले । म्हणे कां रे तुझें मन आग्रहीं पडिलें । प्रारब्ध काय चुके देहा ॥१९॥

भोगावांचून क्षय कदा नोव्हे । हें काय तुज नसे गा ठावें । हें ज्ञान कैसें समाधान तरी पावे । तुज कैसें नेणो ॥२०॥

तुवां जो निश्चय असे केला । तो तूं आत्मा भिन्न कीं मानिसी देहाला । भिन्न असतां देहसंबंधाला । तुज काज काई ॥२१॥

तूं जरी देहचि अससी । तरीच मी न भोगी हा आग्रह धरिसी । ऐसिया बुध्दीनें जरी भोग त्यागिसी । तरी न सुटसी कल्पांतीं ॥२२॥

आपण आत्मा असंग कळलें । तिही अभिमानियावीण दृढ झालें । तरी मग देहासी जे जे भोग घडले । तें न स्पर्शती आत्मया ॥२३॥

तेवींच इंद्रियाचें कर्म इंद्रिया । न स्पर्शतीच कदा आत्मया । क्षुधातृषादि प्राणधर्मा यया । आत्मा पूर्ण असंग ॥२४॥

मन जरी आपण असावें । तरीच मनही निरोधावें । आपणाहून भिन्न असतां स्वभावें । उध्दवो मुरो सहज ॥२५॥

आत्मा तरी पहिलाच असंग । अजि नवा केला नाहीं चांग । अहंकारादि देहांत जें जें सोंग । होतां जातां हानि नसे ॥२६॥

गगनी मेघ आले गेले । परी गगनासी नाहीं स्पर्शले । तैसें हे अज्ञानें जाले ऐसें वाटलें । परी हे जन्मले नाहींत ॥२७॥

मृगजळीं सूर्य कदा बुडेना । तरी त्यांतील जळचरें ग्रासिलें सहस्त्र किरणा । ऐसिया सत्य कैसें मानावें वचना । विबुध्दजनीं ॥२८॥

तैसेंचि अज्ञानें हें आत्मस्वरुप । आच्छादिलेंचि नाहीं अल्प । तेथें या देहद्वयाचा साक्षेप । आतळेल कोठें ॥२९॥

असो मन इंद्रिय प्राण । देह आणि इतुक्यांचे करण । जयाचे तया विकार आपण । असंगात्मा दृढ व्हावें ॥३०॥

म्यां निवांत जें असावें वाटलें । तें विचारुनि सांगे गा वहिलें । हाचि अहंकार अभिन्न नाहीं जालें । मग निवांत केलें तरी काय ॥३१॥

देहादि सर्व केलें अक्रिय । तरी यासि आत्मज्ञान म्हणो नये । आत्मा तो पहिलाच अद्वय । विकारी जालाचि नाहीं ॥३२॥

तस्मात आतां एक करावें । आपुलें असंगत्त्व दृढ राखावें । अहंकारादि देहांत स्वभावें । सक्रिय कीं अक्रिय ॥३३॥

मी देह आणि हे हे माझें । या उभयांचें मात्र न घ्यावें ओझें । स्वप्नामाजींहि ऐसेंचि बुझें । उमटावें असंगत्त्व ॥३४॥

तैसेंच देहादि व्यापारतां । कदा उमटूं नये कर्ता भोक्ता । ऐसें दृढ होतां असंगता । असे अपुली दृढतर ॥३५॥

ब्रह्मात्मत्त्व जरी अनुभविलें । परी मी अनुभवितों न जावें वाटलें । नंतर सहज असंगत्त्व संचलें । स्थितिगतीविण ॥३६॥

आतां देह वर्तो कीं पडो । कल्पांत राहो कीं आजचि विघडो । परी देहबुध्दि निपटून झडो । आमुचिया आशीर्वादें ॥३७॥

ऐसें ऐकतांचि गुरुवचन । पूर्ण जालें समाधान । साष्टांगें नमस्कार घालून । जी जी नि :संशय जालों ॥३८॥

आतां सदगुरुचे प्रसादेंकडून । मी निश्चळचि असे परिपूर्ण । देहा घडो भलतैसें वर्तन । परी निश्चय न ढळे ॥३९॥

येणें रीती विज्ञान दृढ बाणलें । तेणें सदगुरुनाथही तुष्टले । मग कुरवाळुन आज्ञा देते झाले । आतां जावें यथासुखें ॥४०॥

आज्ञा होतां वसमतीसि आले । यथारीती व्यवहार चालविलें । फळशोभनही जनरीती केलें । तुष्टविलें तातासी ॥४१॥

आतां कोणताचि नसे खरखरा । संशय निपटूनि गेला सारा । आनंद झाला मातापितरां । म्हणती परंपरा चालविली ॥४२॥

श्रोतयांसी म्हणे चिमणें बाळ । यथायुक्त वर्तणूक चाले सकळ । कलियुगीं प्रतिजनकचि केवळ । जैसें कमळ जळा असंग ॥४३॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । लक्ष्मणहंसाख्यान निगुती । सप्तम प्रकरणीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP