यावर दुसरी अशी एक शंका आहे कीं ज्या शय्यादिकांचे साधन लागतें तें आत्ममुख कसें होईल ? कारण आत्ममुख स्वतः सिद्ध आहे याकरितां तें सूख वैश हयिकच असलें पाहिजे. तर आम्हीं तरी नाहीं कुठें ह्मणतों शय्यादि साधनापासून होणारें सूख वैषयिकच आहे. ॥४१॥
परंतु निद्रेमध्यें जें सूख आहे त्याला कोणच्याच साधनांची जरुर नाहीं. आदी बुद्धिचें तोंड सूखाकडे होऊन ती परम सूखांत निमग्न होते. ॥४२॥
मनुष्य दिवसभर श्रम करुन दमुन जेव्हा मुदु शय्येवर येऊन निजतो तेव्हा श्रमापासून झालेल्या दुःखाचें निवारण होऊन स्वस्थपणें शय्यादि विषयसूखाचा अनुभव घेतो. ॥४३॥
या विषयसूखाचा अनुभव घेण्यामध्यें देखील श्रमच आहेत. पण तो आदीं भासत नाहीं मृदुशय्येवर निजल्यावर बुद्धिवृत्ति अन्तर्मुख होऊन त्यामध्यें आत्मनंदाचेंप्रतिबिंब पडतें. तोच विषयानंद एथेंही अनुभविता अनुभाव्य आनी अनुभव अशी त्रिपुटी असल्यामुळे त्याला श्रमच होतो. ॥४४॥
तो श्रमही त्यास सहन न झाल्यामुळे त्याच्या निवारणार्थ जीव आत्मरुपाकडे धांव घेतो. मग त्याशीं ऐक्य पावन निद्रेमध्यें ब्रह्मनंदच होऊन राहतो. ॥४५॥
या निद्रांनंदास श्रुतीनें पांच दृष्टांत दिले आहेत एक शकुनीचा; दुसरा श्येनाचा; तिसरा बाळाचा; चवथा सार्वभौम राजाचा आणि पांचवा महाब्राह्मण जे तत्त्ववेत्ते त्यांचा. ॥४६॥
शकुनि म्हणून एक पक्षी आहे त्याचें पायास सूत्र बांधुन त्याला उडावयास आकाशांत सोडलें असतां चोहोंकडे फिरुन फिरुन कोठेंही विश्रांति स्थान न मिळाल्यामुळे ज्या हातानें तें सूत धरलें त्या हातावर किंवा ज्या खांबास तें बांधलें असेल त्या खांबावर पुनः येऊन विश्रांती घेतो. ॥४७॥
त्या प्रमाणे जीवापाधिरुप मन पुण्यपापाची फळे जी सूखदुःखें त्यांचा अनुभव घेण्याकरितां जागृत्स्वप्नीं भ्रमण करुन कर्मक्षयं झाल्यावर आपलें उपादान जें अज्ञान त्यांत लीन होतें. ॥४८॥
ज्याप्रमाणे श्येनपक्षी पुष्कळ उडुन उडुन दमला असतां त्याचें सर्व लक्ष्य आपल्या घरट्याकडे लागून त्यांत निजावयास तो जाऊं पाहतो त्याप्रमाणे जीवही सर्व दिवसभर श्रम करुन ब्रह्मनंदविषयीं उत्सूक होऊन निद्रेकडे धांव घेतो. ॥४९॥
अथवा ज्याप्रमाणें तान्हें मुल आईच्या आंगावर पिऊन मऊ हांतरुणावर हंसत पडलेले असतें तेव्हा रागाद्वेषाची उप्तत्ति मनामध्यें अद्यापि झाली नसलुयामुळे तो केवळ आनंदाची मुर्ती च होऊन राहतो. ॥५०॥
अथवा ज्याप्रमाणें सार्वभौम राजा आपणास सर्व विषयभोगाची प्राप्ति झाल्यामुळे तृप्त होऊन, मानुषानंदाच्या शिखरीं जाऊन मूर्तिमान आनंदच होऊन राहतो. ॥५१॥
किंवा ज्याप्रमाणें महाविप्र ब्रह्मवेत्ता विद्यानंदाची परम सीमा पावुन कृतकृत्य होऊन स्वस्थ राहतो. त्याप्रमाणे सूशुप्तीचे ठायीं जीव आनेदरुप होऊन राहतो. ॥५२॥
सूषुप्तीचा आनंदाविषयीं अति बालदिक तिन्हींचा मात्र येथें दृष्टांत देणेंच कारण हेंच की आज्ञान्यामध्यें तान्हें मुल प्रौढामध्यें सार्वभौम राजा, आणि विद्वानांमध्यें ब्रह्मवेत्ता इतके सूखी आहेत. बाकीच्या लोकांस सूख नाहीं. ॥५३॥
वरील दृष्टांतांत कुमारादिक जसे मुर्तिमान आनंदच आहेत. त्याप्रमणें हा जीवही ब्रह्मनंदैकतप्तर होऊन, स्त्रीस आलिंगन दिलेल्या कामीं पुरुषाप्रमाणें आंत बाहेर कांहींच जाणत नाहीं. ॥५४॥
एथें बाहेर आंत जें म्हटलें तें पुढील दृष्टांतावरुन चांगलें समजेल ज्याप्रमाणें घराबाहेर रस्त्यावर होणारा लोकांचा गलबला व गांड्यांचा घडघडाट यास बाहेरचा वृत्तांत म्हणतात, आणि आंतील गृहकृत्यांस आंतला म्हणतात. त्याप्रमाणें एथेंही जागृत अवस्थां बाहेरील आणि नाडीमध्ये होणारी अवस्था आंतील. ॥५५॥
सूषुप्तीतं बापाचा बापपणा व लेंकाचा लेंकपणा राहत नाही अशा अर्थांची जी श्रुती आहे तिजवरुन त्यावेळीं जीवत्वाचें निवारण होतें व तेव्हा संसारीपणाही नररेस येत नाहीं . ह्मणून निद्रेमध्यें जीव हा ब्रह्मरुपच असतो असें ह्मणण्यास कोणची हारकत आहे ? ॥५६॥
कारण मी पिता मी पुत्र मी पुत्र असा जो अभिमान तोच सर्व सूख दुःखाची खाण आहे त्यातच सर्व प्रपंच आहे ह्मनुन तो नाहींसा झाला असतां, हा जीव सर्व शोकापासून मुक्त होतो. ॥५७॥
सूषुप्तिकालीं सूख असतें याविषयीं अथर्वश्रुतीचें प्रमाण आहे. सूषुप्तीच्या वेळीं सर्व जागृदादि प्रपंचाचा तमः प्रधान प्रकृतींत लय झाला असतां त्या तमानें आच्छादित होऊन जीव सूखरुप ब्रह्मच होऊन राहतो. ॥५८॥
आमचा नेहमीचा अनुभवही तसाच आहे निद्रेंतुन जागा झाल्यावर मी इतक्या वेळ सूखानें निजलों होतों व इतका वेळ मला कांहींच समजलें नाहीं; असं निद्रेंतील सूखाचे व अज्ञानाचें स्मरण आम्हांस होतें. ॥५९॥
अनुभवांवांचून स्मरण कधीच होत नाहीं, ज्या अर्थी जागें झाल्यावर सूखाचे व अज्ञानाचें स्मरण होतें, त्या अर्थी निद्राकाली अनुभव आलाच पाहिजे आतां अनुभवास इंद्रियादिक साधनें पाहिजेच, आणि तीं तर सूषुप्तीमध्ये नाहींत मग अनुभव कसा आला ? अशी एक येथे शंका येण्याजोगी आहे. तर त्याचे समाधान इतकेंच कीं सूख हें स्वप्रकाश चिद्रुप असल्यामुळें ते भासण्यास साधनाची जरुर नाही. आणि त्याचे जोरानेंच अज्ञानाही समजतें. ॥६०॥