चैत्र शु. द्वादशी
Chaitra shuddha Dvadashi
मदनद्वादशी :
हे एक तिथिव्रत आहे. चैत्र शु. द्वादशीला हे व्रत करतात. त्याचा विधी असा-
पाण्याने भरलेले एक भांडे घेऊन त्यात थोडे तांदूळ घालावेत व फळे ठेवावीत. नंतर त्या पात्रावर तांब्याचे तबक ठेवावे व त्यात गूळ, खाद्यपदार्थ आणि सोने घालावे. त्या तबकावर काम आणि रती यांच्या मूर्ती (चित्रे) काढाव्यात . त्यांच्यापुढे नैवेद्य म्हणून खाद्यपदार्थ ठेवावेत. नंतर गीतगायन करावे. दुसरे दिवशी ते जलपूर्ण पात्र ब्राह्मणाला दान देऊन त्याला भोजन घालावे. सांगतेच्या वेळी पुढीलप्रमाणे मदनाची प्रार्थना करावी-
प्रीयतामत्र भगवान् कामरूपी जनार्दनः ।
हृदये सर्वभूतानां य आनन्दोऽभिधीयते ॥
अर्थ : कामस्वरूपी जनार्दन सर्वाच्या हृदयामध्ये आनंदरूपाने राहतो व तो (या व्रताने) संतुष्ट होतो.
या वेळी व्रतधारी व्यक्तीने आळणी भोजन करावे.
या व्रताचा दुसरा पर्याय असा-
चैत्र शु. द्वादशीला रात्री केवळ एक फळ खाऊन उघड्यावर झोपायचे. दुसर्या दिवशी उपवास करुन विष्णूची पूजा करावयाची. याप्रमाणे एक वर्ष व्रत केल्यावर उद्यापनाच्या वेळी एक गाय व काही वस्त्र दान द्यावयाची. तिळाचे हवन करावयाचे. दितीने पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत केले होते. या व्रताने पापनिवृत्ती होते.
N/A
N/A
Last Updated : December 09, 2007
TOP