चैत्र शु.प्रतिपदा

Chaitra shuddha pratipada



१ आरोग्यव्रत :
हे व्रत चैत्र शु. प्रतिपदेला करतात. यासाठी पूर्व दिवशी व्रत करुन प्रतिपदेला एका चौरंगावर अनेक प्रकारची कमळे पसरावी व त्यांच्या ठायी सूर्याचे ध्यान करावे. पांढर्‍या रंगाची सुगंधी फुले इ. सामग्री गेऊन पुजन करावे. अग्नी आणि ब्राह्मण यांना तृप्त करावे. नंतर ब्राह्मणाने आज्ञा दिल्यास भोजन करावे. अशा तर्‍हेने वर्षभर दर शुद्ध प्रतिपदेस व्रत केल्याने आणि शिवदर्शन घेतल्याने सदैव आरोग्य नांदते व सौभाग्याची प्राप्ती होते. व्रतावधी एक वर्ष.
२ ईश्‍वर गण गौरीव्रत :
चैत्र शु. प्रतिपदेपासून चैत्र व. तृतीयेपर्यंत रोज शिअवगौरी यांची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. हे व्रत फक्त सुवासिनींसाठीच सांगितलेले आहे. फल-सौभग्यप्राप्ती.
३. कल्पादी तिथी :
चैत्र शु. प्रतिपदा, पंचमी, वैशाख, शु. तृतीया, कार्तिक शु. सप्तमी, मार्गशीष शु. नवमी, माघ शु. त्रयोदशी, फाल्गुन व तृतीया या कल्पारंभाच्या तिथी मानलेल्या असून त्या तिथींवर श्राद्ध केल्यास पितरांची तृप्ती होते, असे सांगितले आहे.
४ चैत्र शु. प्रतिपदा : गुढी पाडवा
या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरु होते. दक्षिण भारतात व भारताच्या इतर भागांतून नूतन वर्षारंभ चैत्र प्रतिपदेस होतो. या दिवशी काही धार्मिक विधी सांगितले आहेत. त्यांत ब्रह्मपूजा हा महत्वाचा विधी असतो. त्याचा इतिहास ब्रह्मपुराणात दिला आहे. व्रतराज या ग्रंथात असे सांगितले आहे की, ब्रह्मदेवाने चैत्र शु. प्रतिपदेच्या दिवशी सकाळी समस्त जग निर्माण करुन कालगणना सुरु केली. त्या तिथीला सर्व उत्पात, सर्व पापे व कलीकृत दुःस्वप्ने  यांचा नाश करणारी महाशांती करावी, असे म्हटले आहे. ब्रह्मदेवाची पूजा झाल्यानंतर विपळे, पळे, घटिका, प्रहर इ. सर्व कालविभागांची, दक्षकन्यांची व विष्णूची पूजा करावी. यविष्ट नावाच्या अग्नीमध्ये हवन करावे. ब्राह्मण-भोजन घालावे. व आप्तेष्टांना देणग्या द्याव्यात. ज्या वारी वर्षप्रतिपदा येते, त्या वाराच्या अधिपतीची पूजा करावी,असे एक विधान भविष्यपुराणात सांगितले आहे. त्याशिवाय 'व्रतपरिचया' त एक पूजेचा विधी सांगिअतला आहे. तो असा-
या दिवशी सकाळी प्रातःस्नानादी नित्यकर्मे उरकून हातात गंधाक्षतपुष्प्जलादी घेऊन, 'मम सकुटुंबस्य सपरिवारस्य स्वजनपरिजनसहितस्य वा आयुरारोग्यैश्‍वर्यादि सकलशुभफलोत्तरोत्तराभिवृध्द्यर्थं ब्रह्मादिसंवत्सर चौरस चौरंगावर किंवा वाळूच्या पेढीवर शुभ्रवस्त्र पसरुन आणि त्यावर हळदीने अगर केशराने मिश्रित अशा अक्षतांचे अष्टदळ कमळ तयार करुन त्यावर सुवर्णमूर्तीची स्थापना करावी. 'ॐ ब्रह्मणे नमः ।' या मंत्राने ब्रह्मदेवाने आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान,वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, तांबूल,आरती, नमस्कार, पुष्पांजली व प्रार्थना या उपचारांनी पूजन करावे.
अशा प्रकारे उपरोक्त समस्त देवतांचे वेगवेगळे अथवा एकत्र यथाविधी पूजन करावे. नंतर
भगवंस्त्वत्प्रसादेन वर्ष क्षेममिहास्तु मे ।
संवत्सरोपसर्गा मे विलयं यान्त्वशेषतः ।

अशी प्रार्थना करावी. ब्राह्मणांना विविध पकवानांचे भोजन घालावे व स्वतः एकवेळ जेवावे. पूजेच्यावेळी नवीन पंचांगाची पूजा करुन त्यावरुन त्या वर्षाचा राजा, मंत्री, सेनापती, धनाधिपती, धान्याधिपती, दुर्गाधिपती, संवत्सरनिवास आणि फलाधिपती आदींचे फल श्रवण करावे.
या दिवशी आणखी एक विधी भविष्यपुराणात सांगितला आहे. त्या दिवसाचा लौकिक विधी असा:-
प्रातःकाळी अंगणात सडासंमार्जन करुन घरातील सर्व माणसे तैलाभ्यंग करुन उष्णोदकाने स्नान करतात. कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे भांडे घालून त्यावर कडुलिंबाचे ढाळे व फुलांची  माळ बांधून दारात तो ध्वज म्हणजेच गुढी उभी करतात. यालाच ब्रह्मध्वज असे म्हणतात व त्याची पूजा करतात. (अलीकडे या गुढीस साखरेची माळ बांधतात व घरावरील उंच अशा जागी ती उभी करतात.) आपले घर ध्वज, पताका,तोरणे इ. सुशोभीत करतात. (अलीकडे लहान मुलांना साखरेच्या माळा वाटतात.) या दिवशी पुरुष, स्त्रिया व मुले नवीन वस्त्रालंकार घालून आपल्या घराण्याच्या चालीरीतीप्रमाणे कुलदेवतेचे अगर ग्रामदेवतेचे दर्शन घेतात.
दुपारी सवाष्ण व ब्राह्मणासह मिष्टान्नाचे भोजन करतात. ज्यांच्या त्यांच्या घरातील रुढीप्रमाणे ग्रामजोशीकडून अगर उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करतात. या पंचांगश्रवणाचे फल पुढीलप्रमाणे आहे : तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते ; वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते; नक्षत्रश्रवणाने पापनाश होतो; योगश्रवणाने रोग जातो; करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते; असे हे पंचांगश्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे फल मिळते.
या तिथीला युगादी तिथी असे म्हणतात. या दिवशी शक्य असेल तर पाणपोई घालावी. निदान उदककुंभाचे तरी दान करावे. म्हणजे पितर संतुष्ट होतात. देवावर सतत धार बांधावी. पाण्यने भरलेल्या घड्याचे दान करावे. त्याचा मंत्र असा-
एष धर्मघटो दत्तो ब्रह्माविष्णु शिवात्मकः ।
अस्य प्रदानात्सफला मम सन्तु मनोरथाः ॥

हा दिवस इष्टमित्र व कुटुंबातील मंडळींसह आनंदात घालविल्याने वर्षभर सुख लाभते, असे त्याचे फळ आहे. या दिवशी आपापल्या कुलाचाराप्रमाणे वासंतिक देवीचे अथवा श्रीराम-चंद्राचे नवरात्र सुरु करतात.
गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला आहे.
५ तिलक व्रत:
चैत्र शु. प्रतिपदेला हे व्रत करतात. त्या करीता नदीतीरावर अगर तळ्याकाठी जाऊन तेथे किंवा घरातच सुगंधी चुर्णाने संवत्सर मूर्ती (विष्णुची मूर्ती)  लिखित करुन तिची 'संवत्सराय नमः।', 'चैत्राय नमः ।', 'वसंताय नमः ।' आदी नामोमंत्रोच्चारपूर्वक पूजा करावी व तिला वस्त्र व फळे अर्पण कर्श्घरावी. तसेच, विद्वान ब्राह्मणांचे पूजन करावे. त्या वेळी
'संवत्सरोऽसि परिवत्सरोऽसीडावत्सरोऽसि अनुवत्सरोऽसि वत्सरोऽसि ।' हा मंत्र म्हणावा. आणि ' भगवंस्त्वत्प्रसादेन वर्षं क्षेमामिहास्तु मे। संवत्सरोपसर्गी मे विलयं यात्वशेषतः ।' (अर्थ- हे भगवान,तुझ्या कृपेने माझे वर्ष सुखाचे जावो आणि वर्षातील सर्व आपत्ती समूळ नष्ट होवोत.) अशी प्रार्थना करावी आणि दक्षिणा द्यावी.अशा प्रकारे प्रत्येक शुद्ध प्रतिपदेला असे वर्षभर व्रत केले असता भूत-प्रेत-पिशाचादिकांची बाधा नाहीशी होते.
मग कपाळास चंदनाचा तिलक लावतात. हे व्रत स्त्री व पुरुष या दोघांनी करणे उक्त आहे. या व्रताची कथा अशी-
शत्रुंजय नावाचा एक राजा होता. त्याला चित्रलेखा नावाची एक पत्नी होती. तिने तिलकव्रत केले होते. त्यामुळे राजाला मारण्याच्या हेतूने जो जो शत्रू येईल तो तो चित्रलेखेच्या कपाळावरील तिलकाच्या प्रभावाने त्याचा मित्र होऊन जाई. एकदा राजाला हत्तीने पाडले आणि राजा मरणोन्मुख झाला. तेव्हा त्याचे प्राण नेण्यासाठी यमदुत आले. पण राजाच्या शेजारी बसलेल्या चित्रलेखेच्या कपाळावरचा तिलक दृष्टीस पड्ताच ते भ्याले व पळून गेले. पुढे राजाने राणीसह अनेक वर्षे सुखोपभोग घेतला.
६ पौरुषप्रतिपदव्रत :
चैत्र शु. प्रतिपदेपासून या व्रताला प्रारंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. व्रत्कर्त्याने पाण्यात उभे राहून विष्णूचे ध्यान-पूजन व त्यानंतर पुरुषसूक्त पठण करावयाचे असते. दोन्ही पक्षांतल्या प्रतिपदांना हे व्रत करतात. हे एक तिथिव्रत आहे. फल-विष्णुलोकप्राप्ती.
७  ब्राह्मण्यप्राप्ती:
एक काम्य व्रत. कालावधी एक वर्ष. चैत्र शु. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत चार दिवस करावयाचे हे व्रत आहे. त्यात अनुक्रमे इंद्र, यम, वरूण व कुबेर या देवांपैकी एकेकाची एकेका तिथीला पूजा करतात. हे देव म्हणजे वासुदेवाची चार रुपे समजतात. पुजेच्या वेळी त्यांना अनुक्रमे तांबडा, पिवळा, काळा व पांढरा या रंगाची वस्त्रे समर्पण करतात. फल- स्वर्गप्राप्ती.
८ रामनवरात्र :
एक व्रत. चैत्र शु. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत हे व्रत करतात. हे काही ऋग्वेदी देशस्थ,कोकणस्थ ब्राह्मणात असते. यात रामाची  नित्य पूजा, अध्यात्म रामायणाचे वाचन, कीर्तन इ. कार्यक्रम शक्यतेनुसार करतात. नऊ दिवस उपवास किंवा धान्यफरांळ करतात. नवमीच्या दिवशी रामजन्माचे कीर्तन होते व दशमीला पारणे असते.
९ विद्याव्रत :
चैत्र शु. प्रतिपदेस एका पेढी (वेदी) वर अक्षतांचे अष्टादल कमळ काढून त्याच्या मध्यभागी ब्रह्मा, पूर्वेला ऋक्, दक्षिणेस यजुस, पश्‍चिमेस साम, उत्तरेस अथर्व, अग्निकोनात षट्शास्त्र, नैऋत्येस धर्मशास्त्र, वायव्येस पुराणे, ईशान्येस न्यायशास्त्र यांची स्थापना करावी. त्या सर्वाचे नाममंत्राने आवाहनादी पुजन करून व खिरीचा नैवेद्य दाखवून व्रतारंभ करावा. अशा प्रकारे दर शुद्ध प्रतिपदेस ह्याप्रमाणे बारा महिने पूजन करुन गोप्रदान करावे. आणि असेच बारा वर्षेपर्यंत यथाविधी केले असता व्रत करणारा महाविद्वान होतो व त्यास ब्रह्मलोक प्राप्त होतो.
१० संवत्सरपूजा :
चैत्र  शु. प्रतिपदेला संवत्सर्पुजा करावी. यात मुख्यतः ब्रह्मदेव वत्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीमधील मुख्य मुख्य देवता, यक्ष-राक्षस-गंधर्व, ॠषिमुनी, मनुष्यप्राणी, नद्या-पर्वत, पशुपक्षी, कीटक, इतकेच नव्हे, तर रोग व त्यांवरील उपचार यांचीही पूजा करावी. यावरुन एकच गोष्ट सूचित होते व ती म्हणजे संवत्सर सर्वांत प्रमुख व महामान्य होय. ज्यात मासादी योग्य प्रकारे निवास करतात. त्याला संवत्सर म्हणतात. संवत्सर म्हणजे बारा मासांचा कालविशेष असाही दुसरा अर्थ आहे. श्रुतिवचन असेच आहे. (द्वादश मासाः संवत्सरः । ) ज्याप्रमाणे महिन्यांचे चांद्रमास, आदी तीन भेद आहेत, त्याचप्रमाणे संवत्सराचेही सौर, सावन व चांद्र असे तीन भेद आहेत. परंतु अधिक मास (मलमास) धरुन चांद्रमास तेरा महिन्यांचा होतो. अशा वेळी चांद्रमास बारा महिन्यांचा राहत नाही. स्मृतिकारकांनी या विषयाचे स्पष्टीकरण असे केले आहे की बादरायणाने अधिक मासासह ३०-३० दिवसांचे दोन-दोन महिने न मानता ६० दिवसांचा एक महिना धरला आहे. व अशातर्‍हेने वर्ष किंवा संवत्सर १२ मासाचेच होते. तरीदेखील १३ मासांचे संवत्सर दुसर्‍या एका श्रुतिवचनानुसार होऊ शकते. ज्योतिःशास्त्रानुसार संवत्सराचे सौर, सावन, चान्द्र, बार्हस्पत्य आणि नाक्षत्र असे ५ भेद आहेत. परंतु धर्मकृत्यात आणि लौकिक व्यवहारात चांद्रसंवत्सर-गणना रूढ आहे. चांद्र-संवत्सराचा आरंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. यावर कोणी असे वि़चारिल की, चांद्रमास वद्य प्रतिपदेपासून प्रारंभ होतो, असे अस्ता चांद्रसंवत्सर शुध्द प्रतिपदेपासून सुरु होते हे कसे ? याचे स्पष्टीकरण असे की, व. पक्षाच्या आरंभी मलमास (आधिकमास) येण्याची शक्यता आहे, तशी शु. पक्षाच्या आरंभी नाही. यामुळे संवत्सरारंभ शु. प्रतिपदेपासून धरण्याकडे प्रवृत्ती व रिवाज आहे. या शिवाय ब्रह्मदेवाने सृष्टीचा आरंभ याच शु. प्रतिपदेपासून केला होता आणि याच प्रतिपदेला मत्स्यावतार झाला व सत्ययुगाचा आरंभ झाला होता. या प्रतिपदेचे हे महत्व जाणून व मानून भारतातील महामहिक सार्वभौम सम्राट विक्रमादित्यानेही आपल्या संवत्सराची सुरुवात (दोन हजार वर्षापूर्वी) चैत्र शुध्द प्रतिपदेलाच केलि होती.   
जगातील सर्व वर्षकालगणनांमध्ये शालिवाहन शकगणना व विक्रमसंवत गणना सर्वोत्कृष्ट आहेत, यात संदेह नाही. परंतु शकगणनेचा उपयोग विशेषतः गणितामध्ये होतो आणि विक्रमसंवत-गणनेचा उअपयोग या देशात गणित, फलित, लोकव्यवहार, आणि धर्मानुष्ठांचा कालनिर्णय या कामी होतो व सर्व व्यवहारांत ह्या गणनेला आदराचे स्थान आहे. सुरुवातीस प्रतिपदा घेण्याचे कारण असे की, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा ही तिथी 'प्रवरा' (सर्वोत्तम) तिथी म्हणून सुचित केली होती आणि खरोखरच ही 'प्रवरा'च म्हणजे सर्वोत्तम आहे. धार्मिक, सामाजिक, व्यावहारिक आणि राजनैतिक विषेश महत्वाची अशी अनेक कामे या तिथीला सुरु करतात. या तिथीस विषेश महत्वाची अशी अनेक कामे या तिथीला सुरु 
करतात. या तिथीस संवत्सरपूजा, नवरात्र (घट) स्थापना, ध्वजारोपण, तैलांभ्यंगस्नान, वर्षशादीचा फलपाठ, पारिभद्राचे पत्रप्राशन आणि प्रपास्थापन इत्यादी लोकप्र्सिध्द व जगदुपकारक अशी अनेक कामे केली जातात. या सर्व कारणास्तव सर्वच ठिकाणचे सनातनी लोक संवत्सर-मोहोत्सव साजरा करतात.
संवत्सरपूजा केल्याने सर्वे पापांचा नाश होतो. आयुष्यवृद्धी होते, सौभाग्याची वाढ होते आणि शांती लाभते.

गुढीपाडवा - ब्रह्मध्वजारोपण

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP