चैत्र शु. तृतीया

Chaitra shuddha Tritiya 


१ अरुंधती व्रत :
हे स्त्री व्रत आहे. या व्रतास चैत्र शु. तृतीयेस प्रारंभ होतो. याचा विधी असा-
त्रिरात्र उपास करतात. कलशावर पुर्णपात्रात अरुंधतीची मूर्ती मध्यभागी बसवून तिच्या दोन्ही अंगी वसिष्ठ व रुद्र यांच्या मूर्ती बसवतात. हिच्या ध्यानाचा श्‍लोक पुढीलप्रमाणे-
 
ध्यायामि दिव्यरूपां तां वसिष्ठस्य प्रियां शुभाम् ।
पतिव्रतां पुण्यशीलां सौभाग्यैकनिकेतनम्‌ ॥

अर्थ- वसिष्ठपत्‍नी दिव्यरूपा, पुण्यशील पतिव्रता, सौभाग्याचे एकमेव स्थान अशा अरुंधतीचे मी ध्यान करिते.
नंतर शोडशोपचारे पूजा अर्घ्यदान व प्रार्थना. वंशपात्रात सौभाग्यवायन ठेवून त्याचे व सुवर्णमूर्तीचे ब्राह्मणास दान.चार दंपतींची पुजा व भोजन. उद्यापनाच्या वेळी तिल व समिधा यांचे १०८ हवन. सुवासिनीपूजा, दंपतीभोजन व  शक्तीप्रमाणे कास्य पात्र,  दीप, आरसा, चामर, घोडा व शय्या यांचे दान करावे. व्रताचे फळ-सौभाग्यप्राप्ती.
कथा:
एक विद्वान ब्राह्मण होता, त्याला एक रुपवती कन्या होती. बालवयातच तिला वैधव्य प्राप्त झाले. त्या दुःखाने घराबाहेर पडून यमुनेच्या तीरावर ती तप करु लागली. एके दिवशी शिव-पार्वती फिरतफिरत त्या ठिकाणी आले. त्या मुलीची ती अवस्था पाहून पार्वतीला फार दुःख झाले. तिने तिच्या वैधव्याचे कारण शिवास विचारले. तेव्हा शिव पार्वतीस म्हणाले,
ही बालिका पूर्वजन्मी ब्राह्मण पुरुष होती. त्या ब्राह्मणाने एका सुंदर स्त्रीशी विवाह केला व काही दिवसांनी तो प्रवासाला गेला. तो परत आलाच नाही. त्या स्त्रीला सर्व आयुष्य पतीवाचूनच कंठावे लागले. अशा रितीने पत्नीचा त्याग केल्याचे प्रायश्‍चित्त त्या ब्राह्मणाला भोगावे लागले. तोच आता मुलीच्या रुपाने जन्माला आला असून आज मितिस वैधव्यदुःख भोगीत आहे.
शिवाने सांगितलेला हा वृत्तान्त ऐकुन पार्वतीला करुणा आली. तिच्या पापाच्या निष्कृतीचा उपाय शिवाला विचारला. त्याने त्या स्त्रीला अरुंधतीव्रत सांगितले. त्या विधवा मुलीने ते व्रत केले व त्याच्या पुंण्याने ती पापमुक्त होऊन स्वर्गाला गेली.
या व्रतात वसिष्ठाची मूर्ती करायला सांगितली आहे. ती तो अरुंधतीचा पती म्हणून व ध्रुवाची मूर्ती करावया़ची ती अक्षय्यतेची प्रतीक म्हणून. विवाहाच्या वेळी वधूला ध्रुवदर्शन करावयाला लावतात, त्यातही अक्षय्य सौभाग्य लाभावे हाच हेतू असतो.

२ ईश्‍वर-गौरी :
चैत्र शु. तृतीयेला लाकडाच्या शिव आणि गौरी यांच्या मूर्तींना स्नान घालावे. त्यांना उत्त्म वस्त्रे नेसवावी. अलंकार घालावे आणि त्यांची पूजा करावी. त्यांना पाळण्यात, डोलार्‍यात अगर सिंहासनावर व्यवस्थित बसवावे. संध्याकाळी वाद्ये-वाजंत्री, लवाजमा, सवाष्ण स्त्रिया, सत्पुरुष यांच्यासमवेत थाटामाटाने नगराबाहेर एखाद्या फुलबागेत अगर तळ्याकाठी जाऊन तेथे त्या मूर्ती स्थापित कराव्या आणि काही काल तेथे कलाक्रीडामनोरंजनात घालवावा. नंतर त्या मूर्ती घरी परत आणून योग्य ठिकाणी ठेवाव्या. अशातर्‍हेने हे व्रत दर वर्षी केले असता नगरामध्ये सर्वत्रच उद्योग,  उत्साह,  आरोग्य आणि सर्वसौख्य ही नांदतात.
३ गुडधेनुदान :
हे एक दान आहे. हे चैत्र महिन्याच्या किंवा माघ महिन्याच्या शु. तृतीयेस करतात. याचा विधी असा-
शेणाने सारवलेल्या भूमीवर दर्भ अंथरुन त्यावर कृष्णाजिन पसरतात. चार भार गूळ घेऊन त्याची सवत्स धेनू बनवितात. त्यांच्या कानाच्या जागी शिंपा, पायाच्या जागी उसाची कांडी, डोळ्याच्या जागी मुक्‍ताफळे, शेपटीच्या जागी रेशमी वस्त्र इ. बसवितात व तिची पूजा करुन तिचे दान देतात.
फल-सर्व पापांचा नाश.
४ गौरी तृतीया :
हे व्रत चैत्र शु. तृतियेला करतात. विवाहित स्त्रीया या दिवशी प्रातःस्नान करुन उत्तम रंगीत वस्त्र (लाल साडी) परिधान करतात. नंतर शुद्ध व पवित्र अशा जागी २४ अगूंळे लांबीरुंदीची चौरस वेदी अगर पेढी बनवतात. त्यावर केशर, चंदन, आणि कापूर यांचे मंडळ काढून त्यावर सुवर्णाची अगर चांदीची मूर्ती स्थापन करतात. अनेक प्रकारच्या फलपुष्पदूर्वागंधादी साहित्याने तिचे पूजन करतात. त्याच ठिकाणी गौरी, उमा, लतिका, सुभगा, भगमालिनी, मनोन्मना, भवानी, कामदा, भोगवर्घिनी आणि अंबिका यांचे गंधपुष्पादींनी पुजन करतात. त्यांना शृंगारतात. भोजन म्हणून फक्त एकदा दुग्धपान करतात. असे केल्याने पतिपुत्रादि सौख्याची अखंड प्राप्ती होते.
हे व्रत चैत्र शु. भाद्रपद शु. किंवा माघ शु. तृतीयेस करतात.
५ गौरीविवाह :
हे एक व्रत आहे. चैत्र शु. तृतीया, चतुर्थी किंवा पंचमी या तिथीस गौरी व शिव यांच्या मूर्ती करुन त्यांचा विवाहसमारंभ करणे, असा याचा विधी आहे. मूर्ती करण्यासाठी सोने, चांदी, रत्‍ने, चंदन इ. पदार्थ वापरतात. फल-उत्तम पतीची प्राप्ती.
६ गौरीविसर्जन :
हे व्रत चैत्र शु. तृतीयेला करतात. होळीच्या दुसर्‍या दिवशी (फाल्गुन व. प्रतिपदा) ज्या कुमारिका आणि विवाहित बालिका दररोज गणगौरीचे पूजन करतात, त्या चैत्र शु. द्वितीयेला आपल्या पुजा केलेल्या गणगौरी एखाद्या नदी, तलाव अगर सरोवराकाठी नेऊन त्यांना उदक प्राशन करण्यास देतात आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्यांचे विसर्जन करतात. या व्रतापासून विवाहित मुलींना पतिप्रेमाची प्राप्ती होते आणि अविवाहित कन्यकांना उत्तम वराची प्राप्ती होते.
७ चैत्रगौर व हळदीकुंकू :
चैत्र शु. तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला देव्हार्‍यात बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात. या महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदीकुंकवाचा समारंभ करतात. त्यासाठी गौरीपुढे रांगोळ्या काढतात. गौरीला वस्त्रालंकारांनी नटवतात. तिच्यापुढे रंगीबेरंगी चित्रे, नानाप्रकारची फळे व खाद्यपदार्थ मांडून आरास करतात. असोल्या नारळांना कुंच्या घालून ती बाळे म्हणून गौरीपुढे ठेवतात. कोकणात हळदी-कुंकवाला आलेल्या सुवासिनींचे व कुमारिकांचे पाय धुऊन त्यांच्या हातांवर चंदनाचे लेप करतात आणि त्यावरुन शिरा असलेली शिंप फिरवितात. भिजवलेल्या हरबर्‍यांनी आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. त्यांना आंब्याची डाळ व पन्हे देतात. गौरीची आरती करताना  'गौरीचे माहेर'  नावाचे गाणे म्हणण्याची कोकणात चाल आहे. या महिन्यांत गौरी आपल्या माहेरी येते,आपल्या आईकडून सर्वप्रकारची कौतुके करुन घेते, मैत्रिणींबरोबर खेळते, झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते, अशी समजूत आहे.
                      
या उत्सवाचा प्रचार विशेषकरुन ब्राह्मणांत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महिनाभरातील या उत्सवात सवडीप्रमाणे शुक्रवार, मंगळवार अगर दुसर्‍या एखाद्या शुभदिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावतात, तसेच घरोघर जातात, पुरुष आपल्या मित्रमंडळीस त्या निमित्ताने फराळास बोलावतात व परिचय वाढवितात. आणि, अशाप्रकारे हा महिना आमोदप्रमोदात जातो.
८ दोलनोत्सव :
चैत्र शु. तृतीयेला सकाळी श्रीरामाची राजोपचार पूजा करावी. त्याला पाळण्यात घालून झोके द्यावे. तसेच सुरेश्‍वर आणि रमापती श्रीविष्णूला झोल्यावर बसवून त्यांचे दर्शन घ्यावे म्हणजे सर्व पापे नाहीशी होतात.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP