* आकाशदिवा
आश्विन शु. एकादशी ते कार्तिक शु. एकादशीपर्यंत, घराच्याबाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्यास आकाशदिवा असे म्हणतात. त्याचा विधी पुढीलप्रमाणे - घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी. तीवर चंदनयुक्त जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमल काढावे. मध्यभागी वीस हात, नऊ हात किंवा पाच हात लांबीच खांब पुरावा. तो वस्त्र, पताका, अष्टघंटा, कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर अष्टदलाकृती दीप करून अडकवावा. त्या दीपात मोठा दिवा लावावा. त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूती, दामोदर, धर्मराज, प्रजापती, पितर व प्रेत यांना उद्देशून लावावे. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा.
दामो ऽ दराय नभसि तुलायां लोलयासह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोनन्ताय वेधसे ॥
याचे फल लक्ष्मीप्राप्ती हे आहे.
* पुत्रप्राप्ती व्रत
आश्विन शु. एकादशीला स्नान करून उपवाअ करावा आणि भगवान विष्णुची पूजा करावी. रात्री दूध देणार्या सवत्स गाईची पूजा करावी. दुसर्या दिवशी दिवसभर व्रतस्थ राहून रात्री भोजन करावे. अशा तर्हेने दर आश्विन शु. एकादशीस याप्रमाणे बारा वर्षे किंवा दर महिन्याच्या शु. एकादशीस याप्रमाणे बारा महिने हे व्रत करावे. द्वादश वर्षीय व्रताच्या दरवर्षी किंवा एकवर्षीय व्रताच्या दर महिन्यात क्रमश: (पहिल्या वर्षी / महिन्यात पहिला याप्रमाणे) पुढील नामजप करावा -
* अपराजित, अजातशत्रू, पुराकृत, पुरंदर, वर्धमान , सुरेश, महाबाहू, प्रभू , विभू , सुभूती, सुमन, सुप्रचेता
या नावाने हरिस्मरण केले असता देवतुल्य दीर्घायुषी पुत्र लाभतो.
* शुक्लैकादशी
पापपरायण पुरुषांच्या पापनिर्मूलनासाठी आश्विन शु. एकादशीचे व्रत म्हणजे रामबाण उपाय होय. म्हणूनच या एकादशीला पापाङ्कुशा एकादशी म्हणतात. या व्रताने स्वर्गप्राप्ती व मोक्षप्राप्ती होते. आरोग्य टिकून राहते, सुंदर व सुशील पत्नी लाभते, सदाचारी पुत्र लाभतो आणि अक्षय धन प्राप्त होते. त्या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करावे आणि रात्री त्याचेच भजन, चिंतन, नामगुणसंकीर्तन करण्यात काल घालवावा. दुसर्या दिवशी पूर्वाह् णसमयी पारणे करून व्रताची समाप्ती करावी.