* शांतिपंचमी
आश्विन शु. पंचमीला प्रात:स्नानादी नित्यकर्मे उरकल्यावर एका वेदीवर किंवा चौरंगावर शुभ्र वस्त्र पसरून त्यावर हिरव्या व कोवळ्या दर्भाचे १२ नाग व एक इंद्राणी बनवून त्यांची स्थापना करावी. इंद्राणीला शुद्धोदकस्नान घालावे आणि नागांना घृत, पय व उदक या तिहींचे स्थान घालावे. गंधपुष्पादिकांनी पूजा करावी. विविध प्रकारच्या नागांचे ध्यान करावे आणि
'नागा: प्रीता भवन्तीह शान्तिमाप्नोति वै विभो ।
स शांतिलोकमासाद्य मोदते शाश्वती: समा: ।'
अशी प्रार्थना करून
'ॐ कुरू कुल्ल्यं हुं फट् स्वाहा'
मंत्राचा १२ हजार जप करावा. या कुशनिर्मित नागांपैकी अनंत आश्विनात, वासुकी कार्तिकात, शंख मार्गशीर्षात, पद्म पौषात, कम्बल माघात, कर्कोटक फाल्गुनात, अश्वतर चैत्रात, शंखपाल वैशाखात, कालिय ज्येष्ठात, तक्षक आषाढात, पिंगल श्रावणात, व महानाग भाद्रपदात याप्रमाणे त्यांची पूजा केली असता सर्पादिकांचे भय दूर होते, सर्व प्रकारची शांती पसरते व उपर्युक्त मंत्राने सर्पविष निष्प्रभ होते.
* उपांगललिताव्रत
हे व्रत आश्विन शु. पंचमीला करतात. यासाठी रात्रिव्यापिनी पंचमी घेतात. व्रत करणाराने त्या दिवशी आघाड्याच्या २१ काटक्या घेऊन
'आयुर्बलमिदम्'
या मंत्राने एकेकाने याप्रमाणे दात घासून स्नान करावे व शुभ्र वस्त्र परिधान करून सुवर्णमयी उपांगललितेची 'यथो मिलितोपचार द्रव्यांनी' पूजा करावी. रात्री चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्य देऊन नक्त व्रत करावे. (तदुपरान्त भोजन करावे. ) दुसर्या दिवशी देवीचे विसर्जन करावे. हे व्रत महाराष्ट्रात विशेष प्रचलित आहे.