अलक्ष्मी : (लक्ष्मी नव्हे ती )
या देवीचे वर्णन आगम व विष्णुपुराण यांत आढळते. ती कृष्णवर्ण, रक्तनेत्र; द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय. शीतलादेवीचे स्वरूपही काही अंशी अलक्ष्मीसारखेच आहे. या वर्णनाशी जुळणार्या काही मध्ययुगीन शिल्पकृती.
हिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी आश्विन शु. अष्टमीस महालक्ष्मीच्या पूजेआधी ज्येष्ठा या नावाने हिची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन करतात. ही घरातून निघून जावी म्हणून काही ठिकाणी मागील दारी एक वात लावून ती घराच्या कोनाकोपर्यात फिरवून पुढील दारी आणुन टाकतात. हा प्रकार म्हणजे अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखविणे होय. याच्याउलट बाहेर वात लावून ती घरात आणणे म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग दाखविणे, असे समजतात. बंगालमध्ये आश्विनी अमावस्येस शेणाची 'क्षणिका अलक्ष्मी' बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग तिचे विसर्जन करतात.
* कालरात्री व्रत
आश्विन शु. अष्टमी ही या व्रताची तिथी आहे. या तिथीपासून सात, तीन किंवा एक दिवस उपवास करतात. गणेश, मातृदेवता, स्कंद व शिव यांची पूजा, नंतर शैव ब्राह्मणांकडून होम, आठ कुमारिका आणि आठ ब्राह्मण यांना भोजन, असा याचा विधी आहे.
* घागर फुंकणे
एक धार्मिक नृत्यप्रकार. आश्विन शु. अष्टमीच्या दिवशी चित्पावन ब्राह्मणात मुखवट्याची लक्ष्मी करतात. या प्रसंगी सुवासिनी स्त्रियांनी घागर फुंकून नृत्य करावे, असे सांगितले आहे या प्रसंगी स्त्रिया पदर बांधतात व दोन्ही हातांनी घागर उचलून तिच्यात फुंकर घालून नाद घुमवतात. यावेळी काही स्त्रियांच्या अंगात देवीचा संचार होतो, असा समज आहे. अशा संचार झालेल्या स्त्रिला महालक्ष्मीपुढे बसवुन भाविक स्त्रिया तिला आपल्या संसारातल्या अडचणींविषयी प्रश्न विचारतात. ती घुमणारी स्त्रिही त्या प्रश्नांना यथामत उत्तरे देते.
* जीवत्पुत्रिका व्रत
एक स्त्री-व्रत. आश्विन शु. अष्टमीस उ. प्रदेशातील स्त्रिया हे व्रत.करतात. या दिवशी उपवास करून दान देतात. हे व्रत केल्याने पुत्रशोक होत नाही. असे सांगितले आहे. या व्रताची कथा अशी-
* महाअष्टमी
आश्विन शु. अष्टमीला देवीच्या उपासनेची अनेक अनुष्ठाने होतात म्हणून ही तिथी महाष्टमी म्हणून ओळखली जाते. या तिथीस सप्तमीचा वेध व्रताचाराच्या दृष्टीने वर्ज्य समजावा व नवमीच ग्राह्य मानावा. या दिवशी देवी शक्तिधारणा करते. नवमीला पूजासमाप्ती होते. म्हणून सप्तमी वेधयुक्त महा-अष्टमीला पूजन केल्याने पुत्र-स्त्री-धनहानी होते. जर अष्टमी मूळनक्षत्रयुक्त व नवमी पूर्वाषाढायुक्त असेल अथव दोहोंनी युक्त असेल तर ती महानवमी होते. सूर्योदयासमयी अष्टमी, सूर्यास्तसमयी नवमी आणि वार मंगळवार असेल तर तो योग अधिक श्रेष्ठ समजाव. महाष्टमीला प्रात:काळी शुचिर्भूत होऊन भगवतीची वस्त्र, शस्त्र, छत्र, चामर राजचिन्हादिसहित पूजा करावी. त्यावेळी भद्रावती योग असेल तर पूजा संध्याकाळी करावी. आणी अर्धरात्रीला बलिप्रदान करावे. कित्येक ठिकाणी या दिवशी 'अखिलकारणी' देवीचे पूजन करतात. हे पूजन भद्रासहित सायंकाळ किंवा प्रात:काळ केव्हाही करता येते. त्यात केवळ त्रिशूळाची पूजा होते.