आश्विन शु. सप्तमीला मूळ नक्षत्र असले अगर नसले तरी पूर्वनिमंत्रित बिल्ववृक्षाची दोन फळे असलेली फांदी घ्यावी. ती देवीपाशी ठेवावी व तिच्यासहित देवीची पूजा करावी. यासाठी सूर्योदययुक्त परा सप्तमी घेतात.
* शौर्यव्रत
या व्रतानिमित्त आश्विन शु. सप्तमीला संकल्प करावा. अष्टमीला निर्जल (खाद्यपेयविरहित) उपवास करावा. नवमीला भगवतीची भक्तियुक्त उपासना करावी.
'दुर्गा देवीं महामायां महाभागां महाप्रभाम् ।'
अशी प्रार्थना करून यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालावे आणि स्वत: दळलेल्या सातूच्या पिठाचे पेय प्राशन करून व्रत करावे.
* सरस्वतीशयन सप्तमी
आश्विन शु. सप्तमीपासून नवमीपर्यंत सरस्वतींचे शयनव्रत करतात. यासाठी सप्तमीला पुस्तकादिकांचे पूजन करून सरस्वतीचे शयन करावे. स्वत: व्रतस्थ राहावे. पठण-पाठण, लेखन आदी गोष्टी बंद ठेवाव्या. सप्तमीपासून दशमीपर्यंत पुस्तकादिकांची पूजा करावी. पूजेसाठी सरस्वतीची सुवर्णाची, पाषाणाची किंवा चित्रयुक्त मूर्ती असावी. ती चतुर्भुजा, सर्वालंकारमंडित असावी. तिच्या उजवीकडील दोन हातांत पुस्तक व रुद्राक्षमाला असावी आणि डावीकडील दोन हातांत वीणा व कमंडलू असावा. अशा विराजमान-शोभायमान-मूर्तीचे ध्यान करावे.