* उल्कानवमी
एक तिथिव्रत. या व्रतात आश्विन शु. नवमीस महिषासुरमर्दिनीची पूजा करतात. व्रतावधी एक वर्ष. या व्रताला उल्का हे नाव पडण्याचे कारण, हे व्रत करणारा पुरुष त्याच्या शत्रूंना व व्रतकर्ती स्त्री तिच्या सवतींना उल्केप्रमाणे दिसतो, असे सांगितले आहे.
* दुर्गानवमी
आश्विन शु. नवमीचे हे नाव आहे. दुर्गेच्या नावाने व्रतारंभ करतात. व्रतावधी एक वर्षाचा. आश्विन मासापासून चारमहिन्यांचे तीन भाग करावे आणि प्रत्येक भागात दुर्गेच्या निरनिराळ्या रूपांची निरनिराळी फुले, सुगंधी द्रव्ये आणि नैवेद्यादी उपचारांनी पूजा करावी.
फल - शक्ती-संपत्ती यांची प्राप्ती.
* प्रदीप्त नवमी
एक तिथिव्रत. आश्विन. शु. नवमीला या व्रताला प्रारंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. व्रतविधी असा - व्रतकर्त्याने
'ओम् महाभगवत्यै महिषासुरमर्दिन्ये हुं फट्'
या सोळा अक्षरी मंत्राने देवीची पूजा करावी आणि गुग्गुळाचा गोळा अग्नीला अर्पण करावा. शिवाची पूजा करावी. गवताची एक हात लांबीची काडी घेऊन ती पेटवावी. काडी जेवढा वेळ जळेल तेवढ्या वेळात जेवढे अन्न खाता येईल तेवढेच खावे.
फल - शक्ती आणि विजय यांची प्राप्ती.