|
कदंब कुल, रुबिएसी मंजिष्ठ, कदंब, कॉफी, पापटी, अनंत, राईकुडा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथम व हूकर यांच्या वर्गीकरणाप्रमाणे याचा अंतर्भाव रुबिएलीझ गोत्रात असून एंग्लर व प्रँटल यांच्या व बेसींच्या पद्धतीत त्याच नावाच्या गणात आहे. हचिन्सन यांनी रुबिएलीझ गणात फक्त रुबिएसी हे एकच कुल समाविष्ट केले आहे. विविध उपपर्णे असलेली समोरासमोर पाने, पुष्प संरचनेत ४- भागांची मंडले, संदले फार लहान, पाकळ्या जुळलेल्या, अधःस्थ किंजपुट व सपुष्क बियांची विविध फळे, इत्यादी लक्षणे या कुलात आढळतात. कॉफी उपकुल (कॉफीऑइडी) व सिंकोना (कोयनेल) उपकुल (सिंकोनॉइडी) अशी कदंबकुलाची विभागणी करतात.
|