|
चित्रक कुल, प्लंबॅजिनेसी काळा व लाल चित्रक इत्यादींचे द्विदलिकित लहान कुल, चित्रकाच्या मुळ्यात प्लंबॅजिन हे स्फटिकी द्रव्य असते. याचा अंतर्भाव चित्रक गणात (प्लंबॅजिनेलीझमध्ये) एंग्लर व प्रँटल यांनी केला असून हचिन्सन व बेंथॅम आणि हूकर यांनी प्रिम्युलेलीझ गणात केला आहे. प्रमुख लक्षणे - औषधी, क्षुपे व उपक्षुपे (लहान झुडपे) पाने साधी, पाणी व चुना मिश्रित पाणा बाहेर टाकणारी प्रपिंडे त्यावर असतात, फुले द्विलिंगी, संदले पाच व युक्त, पाकळ्या जुळलेल्या किंवा सुट्या, पाच केसरदलांचे एकच मंडल, पाच जुळलेल्या किंजदलांच्या किंजपुटात एक कप्पा व त्यात एकच बीजक, फळ एकबीजी शुष्क व न तडकणारे किंवा करंड्यासारखे झाकणाने उघडणारे, बी सपुष्क, संवर्त अनेकदा फळास वेढून राहतो.
|