|
कारंडपादप कुल, लेम्नेसी टिकलीचे शेवाळे (टिकलीच्या आकाराची व पाण्यावर तरंगणाऱ्या शैवलासारखी दिसणारी) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अतिलहान एकदलिकित फुलझाडाचे फार लहान व ऱ्हास पावलेले कुल. याचा अंतर्भाव न्यूडिफ्लोरी (नग्नपुष्पी) गणात केलेला आढळतो, परंतु स्पॅडिसिफ्लोरी (महाछदयुक्त फुलोरा असलेल्या) गणात करावा असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. हचिन्सन यांनी ऍरॅलीझ गणात समावेश केला आहे. एकूण फक्त चार वंश व तेरा जाती या कुलात घातल्या आहेत. त्या साचलेल्या पाण्यात तरंगतात. प्रमुख लक्षणे पाने व काहीत मुळे यांचा अभाव, फुले एकलिंगी, एकत्र, परिदलांचा अभाव, केसरदले व किंजदले प्रत्येकी एक, बीजके १-६, लेम्ना, उल्फिया, उल्फिएला व स्पायरोडीला या शास्त्रीय नावांनी चार वंश ओळखतात, बदकतण कुल (डकवीड) या नावानेही या कुलाचा काहींनी उल्लेख केला आहे. Duck weeds
|