|
सूर्यफूल कुल, कंपॉझिटी, ऍस्टरेसी माका, सूर्यफूल, झेंडू, शेवंती, एकदांडी, सहदेवी, कुसुंबा (करडई) कारळा (कोरटे) डेझी, झिनिया, डेलिया इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे मोठे कुल. या कुलाचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांनी ऍस्टरेलीझ या गणात एंग्लर व प्रँटल यांनी घंटापुष्प गणात (कँपॅन्यूलेटीमध्ये) हचिन्सन व बेसींनी ऍस्टर गणात (ऍस्टरेलीझ) केलेला आढळतो. आधुनिक वर्गीकरणान्वये या कुलाला ऍस्टरेसी म्हणतात. मिकॅल्मस डेझी (ऍस्टर ऍमलस) यावरुन कुल व गण यांना वरील नावे पडली आहेत. या कुलाची प्रमुख लक्षणे- बहुतेक औषधी व झुडपे, एकांतरित, क्वचित संमुख, साधी पाने, स्तबक फुलोरा व त्याखाली छदमंडल, फुले पंचभागी, अरसमात्र किंवा एकसमात्र, संवर्त रुपांतरित किंवा ऱ्हास पावलेला, पाच जुळलेल्या पाकळ्यांचा पुष्पमुकुट (जिव्हिकाकृती किंवा नलिकाकृती) केसरदले सुटी परंतु परागकोश जुळलेले, दोन किंजदलांच्या अधःस्थ किंजपुटात एक कप्पा व एक बीजक, शुष्क संकृत्स्न फळ. या कुलात अनेक उपकुले समाविष्ट आहेत. स्तबकातील काही फुले वंध्य व इतर जननक्षम व पूर्ण असून कधी सर्वच पूर्ण असली तरी काहीत स्त्री पुष्पके व पुं-पुष्पके भिन्न असतात. Asteraceae
|