|
शोभापर्ण कुल बिगोनिएसी बिगोनिया, बिगोनिएला इत्यादी चार लॅटिन नावाच्या वंसातील द्विदलिकित फुलझाडांचे कुल. बेसींनी यांचा अंतर्भाव लोझेलीझ गणात व हचिन्सन यांनी कर्कटी गणात (कुकर्बिटेलीझ) केला आहे. तत्पूर्वी बेंथॅम व हूकर यांनी कृष्णकमळ गणात केला होता. प्रमुख लक्षणे - बहुवर्षायु, भूमिस्थित खोडाच्या औषधीय वनस्पती, काही मुळांच्या साहाय्याने वर चढणाऱ्या वेली, मूलज, सोपपर्ण किंवा एकाआड एक, असमात्र ,साधी पाने, बगलेतील लहान ग्रंथिल अवयव किंवा पानाचे तुकडे यांपासून नवीन वनस्पती बनतात. फुले एकलिंगी, परिदले सुटी, नरफुलात दोन किंवा चार परिदले व स्त्री फुलात दोन ते पाच, केसरदले अनेक, जुळलेल्या दोन ते तीन अधःस्थ किंजदलापासून बनलेल्या किंजपुटात दोन ते तीन कप्पे व त्यात अनेक अधोमुखी बीजके, पंखयुक्त बोंड व अपुष्क बिया, शोभादायक पानांमुळे शोभापर्ण कुल असे या कुलाला म्हटलेले आढळते.
|