|
पु. १ गांव ; खेडें . २ ( संगीत ) सप्तस्वरांतील मुख्य तीन अवधी . याचे प्रकार तीन - षडजग्राम , मध्यमग्राम व गांधारग्राम . सात स्वरांचा समूह . ( इं . ) गॅमट . ३ गांवांतील प्रमुख किंवा माननीय माणूस . ४ अरेराव , कचाटया , जरब बसविणारा , कचाटींत धरणारा माणूस . तो कसला ग्राम त्याज बराबर भांडून तुझा परिणाम लागणार नाहीं . ५ जमाव ; समुदाय . मुतेहिना ऐसा वागे । ग्राम कर्मेंद्रियांचा । - यथादि ३ . ९२ . ( समासांत ) इंद्रिय - गुण - पुण्य - भूत - स्वर - ग्राम . इंद्रियग्रामावरी येणें नाहीं । - ज्ञा ५ . १०५ . [ सं . ] सामाशब्द - ०कंटक कुठार - पु . चहाडया , निंदा , त्रास तंटे इ० लावणारा ; गांवगुंड ; गांवची पीडा , ब्याद ; दुष्ट , वाईट माणूस . ग्रामकी - स्त्री . गांवजोशी किंवा पाटील इ० चें काम ; गांवकी . ०कूळ केसरी सिंह - पु . १ ( ल . ) गांवांतील कुत्रें . इया ग्रामसिंहाचिया ठायीं . - ज्ञा १३ . ६८० . २ ( ल . ) भेदरट माणूस . ०खर्च पु. १ गांवचा खर्च . २ फुकट किंवा विनाकारण खर्च ; ज्याचा मोबदला नाहीं असा खर्च . ०जोशी ज्योतिषी - पु . गांवचा जोशी , हा पंचांग सांगणें , पत्रिका पहाणें , मुहूर्त काढणें इ० कामें करतो . आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ॥ - तुगा . ग्रामज्य - न . ग्राम्य ; मैथुन ; सुरत क्रीडा . ग्रामज्य आठवे चित्तीं । - दा २ . ५ . २८ . ग्रामणी - पु . १ ( काव्य , विद्वानांचें संभाषण ) पाटील ; गांवचा मुख्य . २ ( लौकिक ) गांवगुंड , चावट , वाईटं , कुटाळया , पीडादायक माणूस ; ब्याद . रामनामें विवर्जित । ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत । - एभा ८ . १६९ . ३ गांवचा महार . - स्त्री . कुटाळकी ; गांवकी . ग्रामिणी पहा . आनित्य ग्रामणी मस्ती सदा । - दा २ . ३ . ६ . - वि . मुख्य ; श्रेष्ठ ; प्रमुख . ग्रामणीक - न . हरामखोरपणा ; ग्रामणी , ग्रामिणी पहा . तरी जी पाहतां हेंहि ग्रामणीक । दिसोनि येतसे कीं निष्टंक । - सादि १२ . २ . १०८ . ग्रामण्य - न . १ मुख्यत : जातीसंबंधींचा किंवा इतर गांवकीचा तंटा , खटला . २ बहिष्कार . ३ जातीच्या खटल्यासंबंधीं चौकशीसाठीं भरणारी ग्रामसभा ; जातगंगा . ०त्रय न. ( संगीत ) ग्राम अर्थ २ पहा . ०थिल्लर न. गांवांतील लहानसें तळें , डबकें . कीं गतधवेचें यौवन । कीं ग्रामथिल्लराचें जीवन । ०दुर्गा स्त्री. गांवची कुलदेवी , भवानी ; ग्रामधिकारिणी देवता . ०देऊळ न. गांवांतील सार्वजनिक देऊळ . ०देव देवता दैवत - पुस्त्रीन . १ ग्रामाधिकारी , ग्रामाधिकारिणी ; गांवचा कुल - देव - देवी . २ या देवतेच्या खर्चास इनाम दिलेली जमीन , उत्पन्न ; ग्रामदेवीची जमीन . ०धर्म पु. गांवचे धार्मिक विधी , नियम , चालीरिती इ० परंपरेनें चालत आलेला गांवचा धर्म . ०नेत्र न. ( ल . ) महार ; गांवचा जागल्या . ०पंचायत सभा संस्था - स्त्री . गांवची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था . खेडयांतील म्युनिसिपालटी ; ग्रामस्वराज्य . ०पशु पु. माणसाळलेलें जनावर . ०बिंदुटी स्त्री. खेडयांतील गल्ली , बिंदी . तव ते गोधने ग्रामबिंदुटी । अपार मौळी असती चव्हाटी । - नव १३ . ११५ . ०याजक पु. गांवचा उपाध्याय ; ग्रामोपाध्याय . ०लेखक पु. कुळकर्णी . ग्रामलेखक ते स्थळीं । - निमा ( आत्मचरित्र १ . १०१ ). ०सूकर पु. गांवडुक्कर . ०स्त स्थ - वि . गांवांत राहणारा ; गांवचा रहिवासी ; गांवकरी . ऐसें बोलून ग्रामस्तानें . - नव १० . १६३ . आतांच भोगूं तरी हे पहाट । ग्रामस्थ येतांचि भरेल हाट । ग्रामाचार - पु . ग्रामधर्म पहा . ग्रामांतर - न . १ दुसरें गांव . २ आपलें गांव सोडून परगांवीं जाणें . ग्रामाधिकार ग्रामाधिकारी - पु . गांवासंबंधीं अधिकार ; तो गाजविणारा माणूस ; अधिकारी ; गांवकामगार . ग्रामधिपति - पु . पाटील ग्रामधिपतिरूपें श्रीरघुवीरें जाण । - सप्र २ . ३४ . ग्रामिणी - स्त्री . हरामखोरी ; चहाडी इ० ग्रामणीक पहा . ग्रामोपाध्याय - पु . गांवचा उपाध्याय ; ग्रामजोशी ; ग्रामयोजक पहा . ग्राम्य - वि . १ खेडयांत झालेला , जन्मलेला ; गांवांत उत्पन्न झालेलें किंवा गांवासंबंधीं . २ गांवठी ; गांवराणी ; गांवढळ ; खेडवळ . ३ माणसाळलेला ( पशु ) याच्या उलट रानटी . ४ लागवडीनें उत्पन्न केलेलें ( शेतीचें उत्पन्न ); याच्या उलट आपोआप झालेलें . ५ प्राकृत व इतर देशी ( भाषा ); याच्या उलट संस्कृत . ६ प्रापंचिक ; संसारी ; याच्या उलट वन्य = जंगलांत राहणारा . ७ अश्लील ; अशिष्ट ; असभ्य . ८ अतिशय विषयासक्त . ग्राम्यगीत - न . १ अश्लील पद , लावणी . २ खेडवळ गाणें , पवाडा इ ०ग्राम्यधर्म संभोग ; ग्रामज्य पहा . ग्रामस्त्री - स्त्री . वेश्या ; रांड . ग्राम्य - स्त्रियांचे संगतीं जाणें । - एभा ८ . १६९ . ग्राम्यालाप - पु . १ खेडवळ गप्पागोष्टी . २ लावणी ; शृंगारपर कविता . [ सं . ]
|