मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग २१ ते २५

पंचीकरण - अभंग २१ ते २५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥२१॥
अनावृष्टि धरा शत संवत्सर ।
तेणें जीवमात्र संहरती ॥१॥
संहरती कोणी नसे भूमंडळीं ।
सूर्य बारा कळीं तपवील ॥२॥
तपवील तेणें जळेल वरणां ।
काद्रवेयाची फणी पोळवील ॥३॥
पोळवील तेणें विषाचे हळाळ ।
मार्तंडाचे ज्वाळ एक होती ॥४॥
होती गिरिश्रृंगें सर्व भस्मरूप ।
तयांलागीं आप बुडवील ॥५॥
बुडवील धरा जळचि निखळ ।
तयासि अनळ विझवील ॥६॥
शोषियेलें जळ उरला अनळ ।
तयासि अनिळ शोषूं पाही ॥७॥
विझविता होय वायु त्या वन्हीसी ।
विश्रांति वायूसी नभापोटीं ॥८॥
नभापोटी चारी भूसें मावळलीं ।
नभाकार झाली वृत्ति तेव्हां ॥९॥
वृत्ति नभें ऐसा नटला अन्वय ।
पांचवा प्रळय दास म्हणें ॥१०॥
॥२२॥
म्हणे हें जाणावें आकाशासारिखें ।
माया ही ओळखें वायुऐसी ॥१॥
वायु-ऐसी माया चंचळ चपळ ।
ब्रह्म तें निश्चळ निराकार ॥२॥
निराकार ब्रह्म नाहीं आकारलें ।
रूप विस्तारिलें मायादेवीं ॥३॥
मायादेवीं झालीं नांव आणि रूप ।
शुद्ध चित्स्वरूप वेग-ळेंची ॥४॥
वेगळेंचि परी आहे सर्वांठायीं ।
रितां ठाव नाहीं तयाविण ॥५॥
तयाविण ज्ञान तेंचि तें अज्ञान ।
नाहीं समाधान ब्रह्मविण ॥६॥
ब्रह्माविण भक्ति तेचि पैं अभक्ति ।
रामदासीं मुक्ति ब्रह्मज्ञान ॥७॥
॥२३॥
ब्रह्म हे निर्गुण मुळीं निराकार ।
तेथें चराचर कैसें झालें ॥१॥
झालें निरा-कारीं अहंतास्फुरण ।
एकीं एकपण प्रगटलें ॥२॥
प्रगटलें कैसें आकार नसतां ।
निर्गुण अहंता कोणें केली ॥३॥
कोणीं नाही केली सर्वही मायिक ।
निर्गुण तें एक जैसें तैसें ॥४॥
जैसें तैसें सर्व मायिक रचिलें ।
निराकारीम झालें कोणेपरी ॥५॥
परी हीं नाथिलीं साच मानूं नये ।
नाहीं त्यासि काये पुसशील ॥६॥
पुसशील काय वांझेचीं लेंकरें ।
मृगजळ पूरें भांबावसी ॥७॥
भांबावसी काय मूळाकडे पाही ।
मूळीं तेथें कांहीं झालें नाहीं ॥८॥
नाहीं कां म्हणतां प्रत्यक्ष दिसतें ।
सत्यत्वें भास तें चराचर ॥९॥
चराचर सत्य हें कवीं घडेल ।
अंधारी बुडेल रविबिंब ॥१०॥
बिंबतें हें मने दिसतें लोचनीं ।
तें कैसें वचनीं मिथ्या होय ॥११॥
मिथ्या होय स्वप्र जागृति आलिया ।
तेंचि निजलिया सत्य वाटे ॥१२॥
सत्य वाटे मिथ्या मिथ्या वाटे सत्य ।
ऐसें आहे कृत्य अविद्येचें ॥१३॥
अविद्येचें कृत्य तुम्हीच सांगतां ।
मागुतें म्हणतां झालें नाहीं ॥१४॥
नाहीं झालें कांहीं दृष्टीचे बंधन ।
तैसें हे अज्ञान बाधितसे ॥१५॥
बाधितसे परी सर्वथा नाथिलें ।
कांहीं नाहीं झालें ज्ञानियांसी ॥१६॥
ज्ञानियांसी दृश्य दिसतें कीं नाहीं ।
देहींच विदेही कैसे झाले ॥१७॥
झालेती विदेही देहींच असतां ।
दिसतें पहातां परी मिथ्या ॥१८॥
मिथ्या हें सकळ मज कां वाटेना ।
संशय तुटेना अंतरींचा ॥१९॥
अंतरींचा संशय तुटे संतसंगें ।
कृपेचेनि योगें दास म्हणे ॥२०॥
॥२४॥
दश हे काशाचे कोणें उभारिले ।
मज निरोपिले पाहिजे हे ॥१॥
पाहिजे हे दश भूतपंचकाचे ।
उभारिले साचे मायादेवीं ॥२॥
मायादेवी कोण कैसी ओळखावी ।
जाणोनि त्यागावी ज्ञानबोधें ॥३॥
परी हे मायेची मिथ्या ओळखावी ।
आणि ती त्यागावी कोणेपरी ॥४॥
ज्ञानबोधें माया जाणोनि त्यागिली ।
परी नाहीं गेली काय कीजे ॥५॥
कीजे निरूपण संतांचे संगतीं ।
तेणें शुद्ध मति होत असे ॥६॥
होत असे परी तैसीच असेना ।
निश्चल वसेना मनामध्यें ॥७॥
मनामध्यें सदा विवेक धरावा ।
निश्चय करावा येणें रीतीं ॥८॥
रीती विवेकाची पाहतां घडीची ।
जातसे सवेंचि निघोनियां ॥९॥
निघोनियां जाय विवेक आघवा ।
तो संग त्यागावा साधकानें ॥१०॥
साधकानें संग कोणाचा त्यागावा ।
दृढ तो धरावा कोण संग ॥११॥
संग हा आदरें धरी सज्जनाचा ।
त्यागीं दुर्जनाचा दास म्हणे ॥१२॥
॥२५॥
कुमारीच्या पोटा ब्रह्मचारी आला ।
विचारता झाला बाप तिचा ॥१॥
वापचि पुरुष ते तों माया राणीं ।
शब्द विचक्षणीं विचारावा ॥२॥
विचारितां होय नातुहि जामातु ।
प्रपिताही मातू मिथ्या नोहे ॥३॥
मिथ्या नव्हे कदा हा देहसंबंधु ।
विस्तारे विविधु सोयरीका ॥४॥
सोयरे संबंधु नाहीं त्या निर्गुणा ।
शाश्वताच्या खुणा दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP