मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १७६ ते १८०

पंचीकरण - अभंग १७६ ते १८०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१७६॥
पुण्याचें माहेर साधकाचें घर ।
बहुतांचें छत्र स्वामी माझा ॥१॥
स्वामी माझा राम रायाचें मंडण ।
संसार खंडण महाभय ॥२॥
महाभय कैसें अभेदभक्तासी ।
रामीं रामदासीं धन्य बोला ॥३॥
॥१७७॥
धन्य सूर्यवंश पुण्यपरायण ।
सर्वही सगुण समुदाय ॥१॥
समुदाय काय सांगूं या रामाचा ।
अंतरीं कामाचा लेश नाहीं ॥२॥
लेश नाहीं मनीं तया भरतासी ।
सर्वहि राज्यासी त्यागियेलें ॥३॥
त्यागियेलें अन्न केलें उपोषण ।
धन्य लक्षुमण ब्रह्मचारी ॥४॥
ब्रह्मचारी धन्य मारुति सेवक ।
श्रीरामीं सार्थक धन्य केलें ॥५॥
धन्य केला जन्म वाल्मीकि ऋषीनें ।
धन्य तीं वचनें भविष्याचीं ॥६॥
भविष्य पाहात धन्य बिभीषण ।
राघवीं शरण सर्वभावें ॥७॥
सर्वभावें रामीं सर्वहि वानर ।
शरण अवतार विबुघांचें ॥८॥
विबुधमंडळीं राम सर्वगुण ।
अनन्यशरण रामदास ॥९॥
॥१७८॥
मनुष्याची आशा तेचि पैं निराशा ।
एका जगदीशावांचुनियां ॥१॥
वांचुनियां राम सर्वहि विराम ।
नव्हे पूर्ण काम रामेविण ॥२॥
रामेविण नव्हे हे कोणी कोणाचे ।
सर्वहि मायेचें जायजणें ॥३॥
जायजणें ऐसें कोणासि नेणवे ।
वेळेसी जाणवे संकटींच्या ॥४॥
संकटाचे वेळे निजाचा सांगाती ।
राम आदिअंतीं रामदासी ॥५॥
॥१७९॥
काय ते करावे संपत्तीचे लोक ।
जानकीनायक जेथें नाहीं ॥१॥
जेथें नाहीं माझा श्रीराम समर्थ ।
त्याचें जिणें व्यर्थ कोटीगुणें ॥२॥
कोटीगुणें उणें जिणें त्या नराचें ।
जानकीवराचें नाम नाहीं ॥३॥
नाम नाहीं मनीं नाहीं जो कीर्तनीं ।
तया कां जननी प्रसवली ॥४॥
प्रसवली जरी झाला भूमिभार ।
दुस्तर संसार उल्लंघेना ।\५॥
उल्लंघेना एका रामनामावीण ।
रामदासीं खूण प्रेमभावें ॥६॥
॥१८०॥
दासाची संपत्ति राम सीतापति ।
जीवाचा सांगाती राम एक ॥१॥
राम एक माता राम एक पिता ।
राम एक भ्राता सहोदर ॥२॥
सहोदर विद्या वैभव कांचन ।
सर्वहि स्वजन राम एक ॥३॥
राम एक ज्ञान राम एक ध्यान ।
राम समाधान रामदासीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP