मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १०६ ते ११०

पंचीकरण - अभंग १०६ ते ११०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१०६॥
निरूपणें निज लाभे सर्व काहीं ।
दुजें ऐसें नाहीं पाहीं जातां ॥१॥
साराचेंहि सार मना अगोचर ।
तें लाभे साचार निरूपणें ॥२॥
दाखवितां नये बोलिलें न जाय ।
त्याची कळे सोय निरूपणें ॥३॥
मनासी न कळे मीपणा नाढळे ।
तें गुज निवळे निरूपणें ॥४॥
व्युत्पत्तीचें कोडें तर्काचें सांकडें ।
तें जोडे रोकडे निरूपणें ॥५॥
मन हें चंचळ तें होय निश्चळ ।
साधनाचें फळ दास म्हणे ॥६॥
॥१०७॥
केलेचि करावें पुन्हां निरूपण ।
तरी बाणे खूण कांहींएक ॥१॥
कांहीं-एक काळ निरूपणें गेला ।
तोचि एक भला समाधानी ॥२॥
समाधानी भला निरूपणीं राहे ।
पाहिलेचि पाहे निरूपणें ॥३॥
निरूपणें पाहे श्रवण मनन ।
होय समाधान निजध्यास ॥४॥
निजध्यास निजवस्तूचा धरावा ।
संसार तरावा दास म्हणे ॥५॥
॥१०८॥
एकदा जेवितां नव्हे समाधान ।
प्रतिदिनीं अन्न खाणें लागे ॥१॥
तैसें निरूपण केलेंचि करावें ।
परा न करावे उदासीन ॥२॥
प्रतिदिनीं अन्न प्रत्यहीं जीवन ।
देहसंरक्षण करावया ॥३॥
प्रत्यहीं संसारीं बोलावें लागतें ।
कांहींकेलिया तें सुटेना कीं ॥४॥
प्रतिदिनीं देह पाळावा लागतो ।
शुद्ध करावा तो रात्रंदिवस ॥५॥
प्रत्यहीं देहाने भोगिलें भोगावें ।
त्यागिलें त्यागावें दास म्हणे ॥६॥
॥१०९॥
आपुल्या भोजनीं पोट हें भरेना ।
लागे उपार्जना दुसर्‍याची ॥१॥
दुसर्‍याची सेवा करितां वेतन ।
पविजे तें अन्न लोकांमध्यें ॥२॥
लोकांमध्ये उपासितां देह दारा ।
मागावा मुशारा कोणापाशीं ॥३॥
कोणापाशीं कोणें काय हे सांगावें ।
कैसोंनि मागावे वेतनासी ॥४॥
वेतनासी जनीं तरीच पाविजे ।
जरी सेवा कीजे स्वामीयाची ॥५॥
स्वामीयाची सेवा करिताम उत्पन्न ।
स्वामी तो प्रसन्न होत असे ॥६॥
हेत असे देव संतुष्ट भजतां ।
मुक्ति सायुज्यता तेणें लाभे ॥७॥
लाभे नवविधा तेणें चतुर्विधा ।
पुसावें सुबद्धा सज्जनासी ॥८॥
सज्जनासी पूजा देहासी भजतां ।
भार भगवंता कैसा पडे ॥९॥
कैसा भार पडे देहाचे भजनें ।
भक्तीचेनि गुणें देव पावे ॥१०॥
देव पावतसे भजतां देवासी ।
सेवितां देहासी देव कैंचा ॥११॥
देव कैंचा देव सेविल्यावांचुनी ।
तत्त्वविवंचनीं दास म्हणे ॥१२॥
॥११०॥
शौच केलें तेणें सुचिर्भुत झाला ।
जळस्नानें गेला मळ त्याचा ॥१॥
मळ त्यागें झालें शरीर निर्मळ ।
अंतरींचा मळ कैसा जातो ॥२॥
कैसा जातो कामक्तोधलोभ-दंभ ।
नांदती स्वयंभ अंतर्यामीं ॥३॥
अंतयीमीं आधीं होईजे निर्भळ ।
तेणें तुटे मूळ संसाराचें ॥४॥
संसाराचें मूळ सूक्ष्मीं गुंतलें ॥
मनहि गुंतलें विभ्रमासी ॥५॥
विभ्रमासी बरें शोधोनि वहावें ।
अंतरीं रहावें निष्ठावंत ॥६॥
निष्ठावंत ज्ञान पूर्ण समाधान ।
मग संध्या स्नान सफळित ॥७॥
सफळित संध्या संदेह नसतां ।
नि:संदेह होतां समाधान ॥८॥
समाधान नाहीं स्नान संध्या कांहीं ।
लैलिककाचे ठांई लोकलाज ॥९॥
लोकलाजे सर्व कौकिकचि केला ।
देव दुरावला वरपणें ॥१०॥
वरपणें देव कदा सांपडेना ।
निष्ठेचा घडेना भक्तिभाव ॥११॥
भक्ति ते भावेंचि भाव तो जायांचा ।
कर्मलैकिकाचा खटाटोपें ॥१२॥
खटाटोपें देव कदा पाविजेना ।
निश्चय घडेना शाश्वताचा ॥१३॥
शाश्वताचा शोध अंतरीं असतां ।
सर्व कांहीं पहातां निरर्थक ॥१४॥
निरर्थक तीर्थे निरर्थक व्रतें ।
दास म्हणे जेथें ज्ञान नाहीं ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP