मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग ४१ ते ४५

पंचीकरण - अभंग ४१ ते ४५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥४१॥
स्वरूप सांडोनि देह मीच भावी ।
तो जीव रौरवीम बुडवील ॥१॥
बुडवील नरकीं देहाचे संबंधें ।
सज्जनाच्या बोधें सांडवले ॥२॥
सांडोनि विवेक भेद महावाक्य ।
जीवशिवऐक्य जयाचेनी ॥३॥
जयाचेनि तुटे संसारबंधन ।
तयाचेम वचन दृढ धरा ॥४॥
दृढ धरा मनीं अहंब्रह्म ऐसें ।
सांगतो विश्वासें रामदास ॥५॥
॥४२॥
मुक्त नि:संदेहो बाधतो संदेहो ।
संदेहाचा देहो कामा नये ॥१॥
कामा नये चित्त दुश्चित सर्वदा ।
लागती आपदा संशयाच्या ॥२॥
संशयाच्या संगें समाधान भंगें ।
खेद आंगीं लागे अकस्मात ॥३॥
अकस्मात सुखीं दु:ख कालवलें ।
साधकासि केलें संदेहानें ॥४॥
संदेहाचा घात होय एकसरा ।
दास म्हणे करा निरूपण ॥५॥
॥४३॥
चारी देह पिंडीं चत्वार ब्रह्मांडीं ।
अष्टदेह प्रौढी बोलिजेल ॥१॥
बोलिजेल श्रोता सावधान व्हावें ।
दुश्चित नसावें निरूपणीं ॥२॥
निरूपणीं अष्ट देह ते कवण ।
स्थूळ लिंग जाण कारण तो ॥३॥
चौथा देह जाण तो महाकारण ।
पांचवें लक्षण विराटाचें ॥४॥
हिरण्यगर्भ हे आणि अव्याकृत ।
आठवी निश्चित मूळमाया ॥५॥
जन्म अष्ट देहीं साक्षी तो विदेही ।
रामदासा नाहीं जन्ममृत्यु ॥६॥
॥४४॥
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं ।
जाणावा चतुरीं चौथा देह ॥१॥
चौथा देह सर्वसाक्षी आणि अवस्था ।
ऐसी हे व्यवस्था चौदेहांची ॥२॥
चौदेहांची गांठी सुटतां सुटली ।
विवेकें तुटली देहबुद्धि ॥३॥
देहबुद्धि नाही स्वरूपीं पाहतां ।
चौथा देह आतां कोठें आहे ॥४॥
कोठें आहे अहं ब्रह्म ऐसा हेत ।
देहीं देहातीत रामदास ॥५॥
॥४५॥
कल्पनेचे पोटीं अष्टविधा सृष्टि ।
तेंचि आतां गोष्टी सांगईन ॥१॥
सांगईन गोष्टी एक काल्पनिक ।
दुजी ती शाब्दिक शब्दसृष्टि ॥२॥
शब्दसृष्टि दुजा तिजी ती प्रत्यक्ष ।
चौक्षी जाण लक्ष चित्रलेप ॥३॥
चित्रलेप चौथी पांचवी स्वप्रींची ।
सृष्टि गंधर्वाची साहावी ते ॥४॥
साहावी ती सृष्टि गंधर्वनगर ।
सातवी नवज्वर सृष्टि जाणा ॥५॥
सृष्टि जाणा दृष्टिबंधन आठवी ।
सर्वहि मानवी काल्पनिक ॥६॥
काल्पनिक - अष्टसृष्टीचें स्वरूप ।
शुद्ध सत्स्वरूप निर्विकल्प ॥७॥
निर्विकल्प देह कल्पनरेहित ।
जाणिजे स्वहित तेंचि बापा ॥८॥
तेंचि बापा तुझे संतांचे संगतीं ।
चुके अधोगति दास म्हणे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP