मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
मजला मुळ धाडी

पद - मजला मुळ धाडी

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : विनंति करुनि चित्त वळवा )
रेणुके ! मजला मुळ धाडी । आतां या दुःखांतुन काढी ॥ध्रु०॥
तुझ्याविण मी तिळ - तिळ तुटतें । कठिण दिन कांट्यावर कंठितें
भेटिच्यासाठीं उरिं फुटतें । पडे ना चैन मला कुठं तें
निरोधुनि मन, डोळे मिटते । घडोघडिं दचकुन परि उठतें
पडिलें भव चिंतेच्या पहाडीं । आतां या दुःखांतुनि काढी ॥१॥
पती येऊं देइना शेजारीं । फजिती करीतो बाजारीं
सवतिनें गांजियलें भारी । ऐकिलें अससिल परभारीं
मंडळी सासरची सारी । मला सुख देति न संसारीं
अटकलें मेल्यांचे दाढीं । आतां या दूःखांतुनि काढी ॥२॥
भेटतां भार्गवरामासी । पावतिल प्राण आरामासी
जोगवा मागिन सुखवासी । अथवा राहिन उपवासी
परि मी येइन तुजपाशीं । वांचवी अथवा दे फांसी
वल्कलें अथवा दे साडी । आतां या दुःखातुनि काढी ॥३॥
वाटते लटकी कां घाई । नव्हे ही लटकी कांगाई
धाडिते सांगुनि सूचना ही । उपेक्षा करणें बरें नाहीं !
खचित मी बाई, तुझ्यापायीं । टाकितें उडि गंगा - डोहीं
पडो या जगण्यावर धाडी । आतां या दुःखातुनि काढी ॥४॥
शुभासनिं आश्विन मासाची । स्थापना घटि नव दिवसांची
विलोकिन यात्रा वर्षाची । तोरणें येतिल नवसाचीं
परम दिनदयाळ तूं साची । माउली विष्णुदासाची
वसशी मृगराज - पहाडीं । आतां या दुःखातुनि काढी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP