मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
दर्शनासि योग्य

पद - दर्शनासि योग्य

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : प्रीतिस पात्र कोण. )
आई, तुझ्या मी दर्शनासि योग्य नाहीं कां ?
रेणुके, तूं दीनांची नससि माय का ॥धृ०॥
जवळ आलियासि म्हणसि हो पलीकडे
लागलि ही संवय तुला कां अलीकडे
कोणाचि आस धरुन जाउं मी कुणीकडे
श्रुतिपदास लाविसि तरि व्यर्थ शाई कां ॥ आई० ॥१॥
हा भवानि म्यां तुलाचि देह अर्पिला
त्यजुनि अन्नपाणि रानिं निंब वर्पिला
अपमान, मान, राग, लोभ, सर्व निर्पिला
अझुनि कां न भेट देसि लपसि बाइ, कां ॥ आई० ॥२॥
कां अझून सुप्रसन्न चित्त होइ ना
कां अझून या दिनाचि कींव येइ ना
कां अझून ऊर उलुनि जीव जाइ ना
शिर फुटोनि होइनाचि राइ राइ कां ॥ आई० ॥३॥
काय म्हणावें अवतारकृत्य संपलें
काय म्हणावें शितळ चंद्रबिंब तापलें
काय म्हणावें दुष्ट नष्ट दैव आपुलें
काय म्हणावें जगविताचि वांझ गाइ कां ॥ आई० ॥४॥
पापिष्ट दुष्ट मरतो त्यासि काय मारणें
पुण्यश्लोक तरती त्यासि काय तारणें
त्रिदोष दोषियांसि जहर काय चारणें
यांत आहे तरि सुजाणे, भलि भलाइ का ॥ आई० ॥५॥
माझे अपराध कांहीं आठवूं नको
अपुलें तूं सदय ह्रदय बाटवूं नको
व्याघ्रमंदिरासि वत्स पाठवूं नको
विष्णुदास म्हणे न येच ऐकुं कांहीं का ॥ आई० ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP