मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
हा गांव नाहीं ग भला

पद - हा गांव नाहीं ग भला

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : कबिरी )
हा गांव नाहीं ग भला । रेणुके, सत्वर मुळ ये मला ।
हात जोडितें तुला ॥धृ०॥
या सासरचे साजण साजणी दिवसा घालिति घाला
पति धड स्त्री ना पुरुष निघाला । हा गांव नाहिं ग भला ॥१॥
रात्रंदिन हा घट घुसळीतां तक्र न ये साराला
धाड पडो या संसाराला । हा गांव नाहिं ग भला ॥२॥
सडा, सारवण, दळण, कांडण, करितां स्वयंपाकाला
खचित आला जिव नाकाला । हा गांव नाहिं ग भला ॥३॥
घरच्या धन्यानें घरधनि केलें सवतीच्या पोराला
कुळपाटीलकी दिली चोराला । हा गांव नाहिं ग भला ॥४॥
प्रपंच लटका, न मिळे फुटका, कुत्र्याचा गलबला
डाका पडला म्हणति बोंबला । हा गांव नाहिं ग भला ॥५॥
कम अकलेचे, लुच्चे बच्चे, सुरकाविति दारुला
भिऊनि राहातें मी अब्रूला । हा गांव नाहिं ग भला ॥६॥
व्याघ्र लांडगे, मेले दांडगे, बळें झोंबिती अंगाला
वाचित जोशी पंचांगाला । हा गांव नाहिं ग भला ॥७॥
पडल्या दरड्या बरड्या वाहुनि पुर नवतीचा गेला
आडांत पडुनी ब्राह्मण मेला ! हा गांव नाहिं ग भला ॥८॥
चोरट्याच्या वाड्या माड्या काड्यांचा बंगला
चहूंकडूनि पहाड पेटला । हा गांव नाहिं ग भला ॥९॥
मंद बुद्धिचा निर्बळ राजा, प्रधान भेकड मेला
इथें बकासुर काळ सोकला । हा गांव नाहिं ग भला ॥१०॥
दशमद्वारीं शकुन पिंगळा पिंगळीला बोलिला
विष्णुदास म्हणे अनुभव आला । हा गांव नाहिं ग भला ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP